नौदलाच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीवरील आपली वहिवाट कायम राहावी, यासाठी गुरुवारी हिंसक आंदोलन करणाऱ्या नेवाळी येथील ग्रामस्थांनी जाळपोळ, दगडफेकीबरोबरच महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  विनयभंग झाल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दुजोरा दिला आहे.

नौदलाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर शेतीस मज्जाव केल्याने नेवाळी आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी हिंसक आंदोलन केले होते. या वेळी पोलिसांवरही आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. या धुमश्चक्रीत एकूण १२ पोलीस जखमी झाले होते. त्यात चार महिला पोलिसांचाही समावेश होता. हिंसक जमावाने या वेळी पोलिसांच्या वाहनांनाही पेटवून दिले होते. दरम्यान या वेळी महिला आंदोलकांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर असल्याने पोलिसांच्या तुकडीत महिला पोलीसही मोठय़ा संख्येने होते. जमावाने पोलिसांवर लाठय़ा, काठय़ा आणि दगडांनी हल्ला केल्यानंतर यात अनेक पोलीस जखमी झाले होते. मात्र याच वेळी तीन ते चार महिला पोलिसांचा विनयभंगही झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतो आहे.  विनयभंगाच्या गुन्ह्य़ासह साहाय्यक पोलीस आयुक्तांसह १२ पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

गावकऱ्यांची चर्चा सुरूच

आंदोलनाची धग शांत झाली असून गावकऱ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी पूर्वीसारखेच त्यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली आहे. सध्या नेवाळी आणि आसपासच्या परिसरांतील वातावरण शांत असून जनजीवन सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘स्थानिक नेत्यांचे अपयश’

शेतकऱ्यांनी केलेले हिंसक आंदोलन म्हणजे येथील स्थानिक नेत्यांचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून येथे असलेले नेते हे प्रश्न सोडवण्याऐवजी सहानुभूती दाखवत असल्याची टीकाही विखे पाटील यांनी केली. त्यांनी नेवाळी परिसर आणि रुग्णालयाला भेट दिली.