४२ हजारांपैकी सात हजार रुपये परत
बदलापूर पश्चिमेकडे राहणाऱ्या राधेश्याम गुप्ता (६०) यांना एका अनोळखी महिलेने त्यांचे बँक खाते व डेबिट कार्ड याची माहिती घेत त्यातून ४१ हजार ३४९ रुपये काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या रकमेची मागणी गुप्ता यांचा मुलगा राजेश गुप्ता (३५) याने सदर महिलेकडे केल्यावर महिलेने मुलगा राजेश याचेही बँक खाते व डेबिट कार्ड याची माहिती घेत त्यातूनही १ हजार ४०० रुपये काढत त्याचीही फसवणूक केली आहे. यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे या पैशाची मागणी पुन्हा संबंधित महिलेकडे केल्यावर त्या महिलेने सात हजार रुपये परत गुप्ता यांच्या खात्यात भरले आहेत. उर्वरित रक्कम न देत फसवणूक केल्याने या महिले विरोधात गुप्ता पिता-पुत्राविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राधेश्याम गुप्ता यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठाणे येथील शाखेत खाते असून त्यांना २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी महिलेने अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन केला. यावेळी या महिलेने हिंदीतून मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे ते सुरू करण्यासाठी मला तुमचा एटीएम कार्ड क्रमांक द्या, अशी विनंती या महिलेने त्यांच्याकडे केली. बँकेतून दूरध्वनी आल्याचा समज झाल्याने गुप्ता यांनी या महिलेस एटीएम कार्डचा क्रमांक दिला. गुप्ता यांच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजवरील क्रमांक त्या महिलेने मागून घेतला व फोन बंद केला. यावेळी ही बाब गुप्ता यांनी आपल्या मुलास सांगितली. मुलगा राजेश यांनी वडिलांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता त्यातून ४१ हजार ३४९ रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले व त्यांनी वडिलांचे कार्ड तात्काळ बंद केले.
यानंतर मुलगा राजेश यांनी त्या महिलेस दूरध्वनी केला व वडिलांचे पैसे परत देण्यास सांगितले. तेव्हा अनोळखी महिलेने राजेश यांच्या खात्यात पैसे टाकते असे सांगून त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याची माहिती मागितली. ही माहिती राजेश यांनी देताच त्यांच्या खात्यातूनही या महिलेने १ हजार ४०० रुपये काढून घेतले. या महिलेशी पुन्हा गुप्ता पिता-पुत्रांनी संपर्क केला असता तिने ७ हजार रुपये परत केल्याचीही आश्चर्यकारक बाब घडली आहे. मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच गुप्ता पिता-पुत्रांनी ठाणे शहर सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली असून याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.