डोंबिवली पश्चिमेला ‘ह’ प्रभागाच्या हद्दीत एकूण २५ विभाग आहेत. या भागात चाळींची संख्या अधिक आहेच; पण बेकायदा बांधकामांचे प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या ‘कृपे’ने उभ्या राहिलेल्या या नवीन वस्तीला मलनिस्सारणाची स्वतंत्र अशी सुविधा नाही. त्यामुळे शौचालयांच्या टाक्या जागोजागी तुंबल्या आहेत. टाक्यांमधील मैलाचा त्यामुळे योग्य निचरा होत नाही. म्हणूनच या टाक्या रिकाम्या करण्यासाठी यावर पालिका मलनिस्सारण विभागातील कर्मचाऱ्यांनी नामी युक्ती आखली आहे. तीन महिन्यांपासून हा मैला पश्चिमेतील गोपीनाथ चौकातील
लोकवस्तीत आणून टाकला जात आहे.   ‘एमएच-०५-एन-९’ या क्रमांकाचे सक्शन युनिटचे पालिकेचे वाहन शौचालयातील तुंबलेला मैला खेचून तो पडीक जागेवर टाकते. पालिकेच्या या वाहनावरील चालक, मुकादम शौचालयातील तुंबलेला मैला उचलून तो गोपीनाथ चौकातील चाळी, इमारती असलेल्या भागात आणून टाकत आहे. नव्याने विकसित झालेल्या या वस्तीकडे लोकांची वर्दळ नाही. त्यामुळे या पालिका कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मैला टाकू नका, म्हणून सांगण्यास कोणी नाही. अलीकडे या मैलाची दरुगधी पसरत असल्याने नागरिकांचा श्वास अक्षरश: कोंडला आहे. मैला टाकण्यात येणारी जमीन खासगी मालकाची आहे. स्थानिक नगरसेविकेला अंधारात ठेवून मलनिस्सारण विभागातील कर्मचारी हा मैला सोडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू अशा साथीच्या आजाराने शहर परिसरातील नागरिक हैराण आहेत. सार्वजनिक स्वच्छता बाळगा म्हणून पालिकेकडून आवाहने केली जात आहेत.
या पाश्र्वभूमीवर शौचालय टाकीतील मैला सार्वजनिक ठिकाणी, नागरी वस्तीत सोडून पालिका काय साध्य करीत आहे, असे प्रश्न लोकांकडून केले जात आहेत.