शिवाजी चौकातील पुतळ्याची नित्यनेमाने साफसफाई
कल्याणचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजी चौकातील शिवपुतळ्याची आराधना गेल्या दोन वर्षांपासून शहरातील काही तरुण मंडळी करीत आहेत. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असलेले हे तरुण दररोज नित्यनेमाने शिवछत्रपतींच्या पुतळ्याची देखभाल ठेवत आहेत. महाराजांच्या पुतळ्याला स्नान आणि मेघडंबरी परिसराची साफसफाई अशी या तरुणांची दिनचर्या आहे. गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीमध्ये रममाण होणाऱ्या या तरुणांनी गेल्या दोन वर्षांपासून अव्याहतपणे हा उपक्रम सुरू ठेवला आहे.
कल्याणातील शिवसह्य़ाद्री युवा संस्थेमार्फत हे कार्य सुरू आहे. शिवसह्य़ाद्री युवा संस्थेतील तरुणांना लहानपणापासूनच गड, किल्ले भ्रमंतीची आवड आहे. २००८ मध्ये रायगडावरील होळीच्या माळावर कराडच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे काही सदस्य महाराजांचा पुतळा धुवून स्वच्छ करताना या तरुणांना आढळले. अशा प्रकारचे कार्य आपणही आपल्या शहरात करावे या हेतूने अभिषेक आंबुर्ले, अनंता घरत, प्रदीप खिलारे, राहुल जवळकर, अभिजीत जाधव, तुषार फडके, गोपाळ ठाकूर हे युवक एकत्र आले आणि त्यांनी संस्थेची स्थापना केली. त्यांनी २०१३ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लागलीच अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली. कल्याणचा शिवाजी चौक परिसर अत्यंत वर्दळीचा. दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची येथे ये-जा असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर धुरळाही येथे उडत असतो. चौकातील महाराजांचा पुतळ्यावर धुळीचे थर बसतात. त्यामुळे नित्यनेमाने या पुतळ्याची देखभाल राखावी, या उद्देशाने ही जबाबदारी या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
दररोज सकाळी पहाटे पाच ते साडेसहाच्या दरम्यान संस्थेचा एक सदस्य शिवाजी चौकातील पुतळ्याजवळ पोहोचतो. सर्वप्रथम महाराजांना वाहण्यात आलेला जुना पुष्पहार काढण्यात येतो. त्यानंतर पुतळ्याजवळील नळाच्या पाण्याच्या साहाय्याने मेघडंबरी, महाराजांचा पुतळा आणि अन्य परिसर स्वच्छ केला जातो. महाराजांच्या पुतळ्याला स्नान घालून नवीन पुष्पहार चढविण्यात येतो. ही दिनचर्या दररोज सुरू असते. दररोज वेगवेगळ्या युवकांना ही जबाबदारी सोपविण्यात येते, असे संस्थेचे सदस्य राहुल जवळकर यांनी स्पष्ट केले. शिवकार्याचा हा उपक्रम सर्वाचा असल्याने यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केले. शिवपूजा झाल्यानंतर हे तरुण आपापल्या कामास निघून जातात. शिवसह्य़ाद्री संस्थेच्या या उपक्रमात वय वर्ष १६ ते ३५ अशा विविध वयोगटांतील तरुणांचा समावेश आहे.