२ व ३ डिसेंबर दरम्यानची १९८४ मधील ती मध्यरात्र.. भोपाळ शहर शांतपणे निद्राधीन झालेले होते. सरोवरांच्या या शहराला गुलाबी थंडीत गोड स्वप्ने पडत होती, पण इकडे काली परेड ग्राऊंडवर शहरातील लोकांच्या विध्वंसाचे नेपथ्य रचले जात होते. मेथिल आयसोसायनेट या वायूच्या टाक्यांच्या नियंत्रण कक्षातील दाब ६१० स्पाईक इतका झाला. त्या वेळी टाक्क्यांमध्ये ४१ टन मेथिल आयसोसायटनेट वायू होता. ऑपरेटरला काँक्रिट तुटण्याचा आवाज आला. किमान ४ ते २० हजार लोक यात मरण पावले. नंतर युनियन कार्बाइडने ४७० दशलक्ष डॉलरची तडजोड केली, पण त्याने काहीच साध्य होणार नव्हते. नंतर ही कंपनी ५०.९ टक्के प्रमाणात विकली गेली व ती युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड झाली. सध्या नेहमी चच्रेत असलेल्या डाऊ कंपनीची ती उपकंपनी बनली. त्या न विसरल्या जाणाऱ्या घटनेचा नवा अन्वयार्थ..
तंत्रज्ञान फार दुधारी शस्त्र असते. ते होत्याचे नव्हते अन् नव्हत्याचे होते करू शकते. भोपाळमधील बेरसिया रोडच्या बाजूला असलेल्या काली परेड भागात बघता बघता कंपनीचा टॉवर पेटला व मेथिल आयसोसायनेट हा विषारी वायू हवेत मिसळला. उष्णताधर्मी अभिक्रियेने सारा आसमंत विषारी वायूच्या मेघांनी व्यापून गेला. कालिदासाने मेघदूतामार्फत प्रेयसीला संदेश पाठवला होता, येथे हे मेघ भोपाळवासीयांसाठी मृत्यू संदेश घेऊन आले होते. सुरुवातीला कोलकात्यात कार्बाइडचा पहिला कारखाना सुरू झाला, नंतर तो भोपाळला आला. तो कीटकनाशकांचा कारखाना होता. आजूबाजूच्या खेडय़ातील लोकांची चवळीची व इतर अनेक पिकांची शेती होती, पण कीटक ही शेती होऊच देत नव्हते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या वेळी हरित क्रांतीच्या नावाखाली कीटकनाशके व खते आणली. युनियन कार्बाइड ही अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनी व्हर्जििनयातून आयात केलेल्या मेथिल आयसोसायनेटच्या मदतीने कीटकनाशके बनवीत होती. त्याचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वॉरेन अँडरसन होते. ३ डिसेंबर १९८४ची ती काळरात्र अजून लोक विसरलेले नाहीत. पहाटेच्या साखरझोपेत असताना या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट (एमआयसी) वायूने अनेकांना जीवघेण्या जखमा दिल्या. हजारो लोकांचे प्राण घेतले. कंपनीचे अध्यक्ष अँडरसन तीन दिवसांनी भोपाळला आले व  अर्जुन सिंग यांनीच त्यांना येथून सुटून जाण्यास मदत केली होती. नाही म्हणायला आधीचे चित्र बघितले तर सर्व शेते सुजलाम सुफलाम झाली होती, रोजगारही थोडे वाढले होते, पण त्या तुलनेत एक पिढीच जनुकीय व इतर रोगांनी बरबाद झाली होती. भोपाळ दुर्घटना म्हटली की, आठवते ते रघू राय यांनी काढलेले एका लहान मुलाच्या कवटीचे छायाचित्र. त्या दुर्घटनेची भीषणता त्यापेक्षा कशानेच दाखवता येणार नाही इतके ते चित्र मानवी मनात राहिले. हरितक्रांतीत आपण वाढत्या तोंडांची सोय केली, पण त्यांना चांगले जीवनमान दिले नाही. आताही जनुकीय पिकांच्या बाबतीत तोच युक्तिवाद करावासा वाटतो. पिकांचे उत्पादन वाढेल पण आपण पिकात बॅसिलस थुिरजेनेसिस हा जनुक घालतो आहोत म्हणजे विषच घालतो आहोत. कीटकनाशके वरून फवारली जातात ती पोटॅशियम परमँगनेटनेच धुतली तरच जातात, साध्या पाण्याने जात नाहीत. जनुकीय पिकातले विष धुता येणार नाही याचे उत्तर कुणी दिलेले नाही. केवळ वाढत्या तोंडांना अन्न घालण्यासाठी आपण काहीही करायला तयार झालो आहोत. पंजाबमधली एक रेल्वेगाडी कॅन्सर एक्स्प्रेस नावाने ओळखली जाते ती कीटकनाशकांमुळे होणाऱ्या कर्करोगामुळे, त्याचे काय करायचे? हे थोडे विषयांतर आहे पण फार नाही. बीटी कापूस आपण खात नाही तिथपर्यंत जनुकीय तंत्र ठीक आहे, पण आज कापसाच्या उत्पादनात आपली स्थिती वाईट आहे. ‘पेड न्यूज’च्या नावाखाली कंपन्या उत्पादन वाढल्याचे दाखवतात पण खरे चित्र वेगळे आहे. आपण लोकसंख्या वाढवत राहायची अन् मग ते लोक जगले काय आणि मेले काय त्याने आपल्या देशात काही फरक पडत नाही.
पुन्हा विषयाकडे येऊ या. त्या युनियन कार्बाइड कंपनीत वर्षांला पाच हजार टन एमआयसीची निर्मिती होत असे. तर त्या दिवशी म्हणजे २ व ३ डिसेंबरच्या मधल्या रात्री मेथिल आयसोसायनेट हा विषारी वायू हवेत सुटला व थंडी असल्याने तो हवेच्या खालच्या थरातच राहून झोपलेल्या लोकांच्या, कामावरील कामगारांच्या थेट श्वसनात आला. त्यामुळे हजारो बळी गेले. सरकारी संख्या सांगणे हे हास्यास्पद असते. त्यामुळे ते येथे टाळत आहे. जगातील सर्वात मोठय़ा औद्योगिक दुर्घटनेला आता तीस वष्रे लोटली आहेत. अँडरसन महाशयच अमेरिकेत पळून गेले होते. ते तिकडे सर्व सुखोपभोग घेऊन निवर्तले, ते याच वर्षी. कंपनीने यात कुठलीच जबाबदारी घेतली नाही. सेव्हिन नावाचे कीटकनाशक तिथे तयार होत असे त्याचे अंश अजूनही तिथे सापडतात, तसेच माणसांचेही जखमांनी भरलेले देह अजूनही त्या थंडीतील दाहकतेची साक्ष देतात. तेव्हाही आतासारखे मेणबत्ती मोच्रे स्वयंसेवी संस्थांनी काढले, पण त्या काजळीत त्यांचे काजवेसुद्धा चमकले नाहीत. खरेतर एखादा हिरा तयार करण्याचा कारखाना असो की, आणखी काही रसायन करण्याचा कारखाना असो त्यातील घातक परिणाम व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय सांगणे बंधनकारक होते पण तसे काहीच करण्यात आले नव्हते. त्यामुळे जेव्हा रात्रीच्या वेळी रुग्ण जे. पी. नगर येथील दवाखान्यांमध्ये कधी न पाहिलेल्या तक्रारी घेऊन येऊ लागले, तेव्हा ओपीडीतले डॉक्टर्सही भांबावून गेले. सकाळचे एक, दोन, नंतर तीन असे पहाटेपर्यंत अगदी सकाळपर्यंत हे तांडव सुरूच होते. भोपाळ वायू दुर्घटनेने भोपाळची एक पिढी बरबाद केली, तिच्या भळभळत्या जखमा आता कशानेच भरणार नाहीत. या दुर्घटनेनंतर कोर्टकचेऱ्यांचे अनेक सोपस्कार झाले पण त्यातून काही साध्य झाले नाही. श्रीमंतांना गुन्हे माफ असतात. इतरांना पोलीस स्टेशनमध्ये आणून कुत्र्यासारखे बडवले जाते. इथे आपली न्यायदेवता, पोलीस यंत्रणा गप्पगार झाली. अशी घटना अमेरिकेत घडती, तर त्याचे किती आकांडतांडव करून किती भरपाई दिली गेली असती याची कल्पनाच केलेली बरी. येथे ते तर सोडाच पण अजूनही आपण पुन्हा एकदा साखरझोपेत आहोत. ती उडवायला पुन्हा एकदा अशी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहायची का, हाच खरा प्रश्न आहे..