जगाच्या कानोकोपऱ्यातले झाडून सारेजण शाकाहारी झाले, तर शेकडो वर्षांपासून अभ्यासक-संशोधक-आहारतज्ज्ञ आणि आहारसंवेदक फॅशनग्रस्तांकडून पोटतिडकिने सांगितले जात असलेले शाकाहाराचे शारीरफायदे सर्वाना मिळतील. पण काय उत्पादित केले जाणारे अपुरे धान्य-भाज्या त्या सर्व शाकाहारी बनलेल्या जगाला पुरे पडू शकेल? पट्टीचे मांस खाणारे आहेत, म्हणून तुलनेने स्वस्त आणि मस्त शाकाहार चंगळ सुरू आहे. अन्यथा उपासमार आणि कंदमुळांसाठीच्या लढाया अटळ झाल्या असत्या. योगविद्या, शाकाहार आणि स्मीतहास्य या सहजस्फूर्त भारतीय प्रवृत्तींचे जगाला सध्या प्रचंड वेड आहे. एकीकडे विशिष्ट सणानिमित्ताने बैलांची कत्तल करण्याची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात संमिश्र भावना उमटल्या असतानाच, दुसरीकडे गुजरातमध्ये पशूहत्येविरोधात तेथील साधू-महंतांनी दंड थोपटले. शहरात पशूहत्या करण्यास बंदी घातली जावी, या मागणीसाठी तेथे सार्वजनिक उपोषण करण्यात आले. अखेर प्रशासनाने त्यांच्या मागणीपुढे नमते घेत ‘पालीठाणा’ या शहराला मांसमुक्त शहर घोषित केले. ‘जगातील पहिले अधिकृत शाकाहारी शहर’ म्हणून त्याची नोंद झाली आहे. या शाकाहारहट्टाच्या वृत्तानिमित्ताने एकूण आजच्या बदललेल्या आहारगाथेचा आढावा..

पालीठाणाची अजब कहाणी
स्थानिक प्रशासनाच्या निर्णयामुळे जगातील पहिले संपूर्ण शाकाहारी शहर अस्तित्वात येण्याचा मान भारताला मिळाला आहे. मात्र या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शहरातील नागरिकांचा आहार काय असावा, हे ठरविण्याचा अधिकार सरकारला आहे काय, मांसयुक्त शहर जाहीर करताना स्थानिक प्रशासनाने अन्य धर्मीय आहार-विहारांचा वा खाद्यसंस्कृतीचा विचार केला काय, असे निर्णय न्यायालयीन कसोटय़ांवर टीकू शकतील काय. सुदैवाने या प्रश्नांनी आणि या वृत्तानेही अद्याप उग्र रुप धारण केलेले नाही. यात आग्रह, सक्तीऐवजी धर्म हा महत्त्वाचा भाग आहे. जैन धर्म हा जगातील प्राचीनतम धर्मापैकी एक मानला जातो. अहिंसा, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, अस्तेय आणि सत्य ही या धर्माची पंचसूत्री मानली जाते. सध्या भारतातील सुमारे ५० लाखांहून अधिक लोक या धर्माचे अनुयायी आहेत. जैन धर्मगुरु विराट सागर यांच्यामते जगातील प्रत्येक जीव, मग तो प्राणी असो वा मनुष्य अथवा सुक्ष्मजीव, त्या जीवाला जगण्याचा अधिकार ईश्वरानेच दिला आहे. मग अशा जीवांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. प्राणीमात्रांबद्दल भूतदया बाळगावी अशी शिकवण सर्वच धर्म देतात. जैन धर्माचीही तीच शिकवण आहे त्यामुळे पशूहत्येस विरोध करणे अन्याय्य नाही, असे विराट सागर महाराज मानतात. यात तत्वज्ञानाच्या पाश्र्वभूमीवर पालीठाणा येथे अभूतपूर्व घटना घडली. या शहराला संपूर्ण शाकाहारी शहराचा दर्जा दिला जावा, या मागणीने जोर पकडला. गुजरातमधील पालीठाणा हा डोंगराळ प्रदेश, पण जैन अनुयायांची संख्या मोठी. त्यामुळे आपल्या शहरात पशूहत्या होऊ नये, अशी इच्छा असलेल्यांची संख्याही मोठीच. म्हणूनच शहरात पशूहत्या बंदी करण्याची मागणी करीत २०० साधू महंत आंदोलनास बसले. हे आंदोलन साधेसुधे नव्हते, तर प्रशासनाने असा निर्णय न घेतल्यास प्राणांतिक उपोषणाची धमकी आंदोलनकर्त्यांनी दिली.
या शहरात मांसभक्षण केले जात होते आणि अनेक वर्षे मांस विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र पालीठाणासारख्या पवित्र शहरात अशी विक्री होणे योग्य नाही, म्हणून तेथे मांसविक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी भूमिका सर्व साधू-संतांनी घेतली. अखेर जैन धर्मीयांची बाजू प्रशासनाने उचलून धरली. १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस पालीठाणा शहर मांसमुक्त प्रदेश असल्याचे गुजरातमध्ये जाहीर करण्यात आले. शहराच्या सीमांतर्गत मांस, अंडी यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून शहरहद्दीत कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. शाकाहारी व्यक्ती या निर्णयामुळे सुखावल्या आहेत. मात्र अनेकांची या निर्णयांमुळे निराशा झाली आहे.पालीठाणामध्ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे २५ ते ३० टक्के मांसाहार करणारे आहेत. या निर्णयाने शहरातील खाटिक, मच्छीमार यांच्या पोटावर पाय आला आहे.  मत्स्यव्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आम्ही आता कोणता व्यवसाय करावा, असा सवाल ते प्रशासनाला विचारत आहेत, मात्र ना प्रशासनाकडे उत्तर आहे, ना पर्याय.  मत्स्यव्यवसायिकांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने असा निर्णय कसा घेतला याचा खुलासा करण्याचे न्यायालयानेही सरकारला सांगितले आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानंतरच आता यावर अंतिम निर्णय होणार आहे, मात्र तोवर शाकाहारसक्तीचे बळी अनेक कुटुंबांना व्हावे लागणार आहे .

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

शाकाहार का असावा?
उत्तम आरोग्यासाठी शाकाहार केला जावा, असे सर्वच म्हणत आले आहेत. मांसयुक्त पदार्थामध्ये जीवनसत्त्वे आणि कबरेदके यांची कमतरता असते. कृषी उत्पादनांमधील रसायनेही मांसयुक्त पदार्थामध्ये मिसळली असतात. मांसाहार पचायला वेळ घेतो. शाकाहार हा पर्यावरणस्नेही असतो, म्हणून . अहिंसा आणि प्राण्यांविषयी भूतदया ही मानवी मूल्ये आहेत. त्यामुळे उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी शाकाहारास प्राधान्य द्यावे. शाकाहार हा ताज्या फळे व भाज्यांचा असून मांसाहाराच्या तुलनेत स्वस्त असतो म्हणून शाकाहारी व्हावे अशी पारंपरिक समज पिढय़ानपिढय़ा प्रसरण पावत आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कृषी उत्पादनांमध्ये अधिक वृध्दी व्हावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम, रासायनिक खतांचा वापर अधिक होत आहे. जे शाकाहारी अन्न आपण खातो, त्यातून किती रसायने आपण पोटात घालतो, याची कल्पनाही आपल्याला नसते. हॉटेल असो वा घर, आपण खात असलेले शाकाहारी अन्न संपूर्ण शुद्ध असल्याचा विश्वास कुणीच देऊ शकत नाही, अशी सद्यस्थिती आहे. शाकाहार का असावा? याऐवजी शाकाहारच असावा का? असा प्रश्न आपण स्वत:ला विचारणे आवश्यक आहे.

मांसाहार का असावा?
शरीरातील बलवृद्धीसाठी व्यायामपटूंपासून ते क्रीडापटूंपर्यंत सर्वाना पर्याप्त प्रथिनांसाठी मांसाहार आवश्यक असतो. पण मांसाहारी असण्यासाठी क्रीडापटू किंवा व्यायामपटूच असायची आवश्यकता नसते. शाकाहारासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील ६४ टक्के कुटुंबांत मांसाहार केला जातो. दक्षिणेत हे प्रमाण ९२.२ असून, उत्तरेत ४०.४ इतके आहे. काही वर्षांपूर्वी देशाच्या आरोग्य संस्थेने केलेल्या पाहणीतील हे निष्कर्ष आहेत. समूद्रतट लाभलेल्या सर्व प्रदेशांतील नागरिकांमध्ये शाकाहाराऐवजी मांसाहाराला प्राधान्य दिल्याचे आढळते. १९५६ सालापासून गेल्यावर्षीपर्यंत सुरू असलेल्या एका प्रदीर्घ अमेरिकी संशोधनामध्ये पांढरे मांस म्हणजेच चिकन आणि मासे खाणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाची शक्यता सर्वात कमी असल्याचे म्हटले आहे. अभ्यास पाहणीद्वारे त्यांनी खानपान व्यवहाराची पाच दशकांहून अधिक काळ पाहणी करून हे निष्कर्ष काढले. पाहणीतील निष्कर्ष खरे की खोटे याचा विचार करण्याऐवजी, मांसाहारामुळे शरीराला मिळणारी पोषकतत्वे आपल्याला आवश्यक आहेत काय, याचा फक्त विचार व्हायला हवा. मांसाहार आणि शाकाहार यांच्यात सुवर्णमध्य काढल्यास योग्य त्या पातळीपर्यंत शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होईल, हे खरे.

काही उत्तम आहारविचार
पाहणीद्वारे आणि सांगोवांगीच्या गोष्टींद्वारे आहाराबाबत पथ्ये पाळण्याची कुणालाच इच्छा नसते. जीव्हांना सुखावणारे खाद्य शाकाहारी असो वा मांसाहारी त्यावर तुटून पडणे हा निसर्गनियम कुणाला चुकणार नाही. तरी काही गोष्टी निश्चित केल्या, तर कुठलाही आहार घेणारी व्यक्ती आरोग्यसंपन्न राहील. आहाराच्या वेळा पाळणे. गरजेपेक्षा अतिआहार पोटात ढकलणे टाळणे. दुपारी संपूर्ण आहार व रात्री हलका आहार. आहारात फळे आणि फळभाज्यांचे सॅलड राखणे. कडधान्य आणि पालेभाज्यांचा पर्याप्त डोस पोटात घालणे. दही व ताक यांचे सेवन करण्यापूर्वी कोणता आहार घेतोय, याकडे लक्ष ठेवावे.