अतिसंपर्क सर्वात सुरुवातीला सुखावणारा असतो, काही कालावधीनंतर त्यातले सातत्याचे जवळ असणे खुपायला लागते आणि हळूहळू जवळकीच्या अंगाने नात्यांमधील आकर्षण-आदर-प्रेम आदी भावना नष्टीकरणाच्या प्रक्रियेनंतर तुटायला सुरुवात होते. आभासी जगामधील सुरुवातीच्या हॉटमेल, ऑरकुटबाबत सगळ्या नेटकर्त्यांनी हेच केले. उपग्रह वाहिन्या आल्यानंतर दूरदर्शनच्या दर्शकांनी ज्या पद्धतीने आपल्या दर्शनसवयी बदलल्या तशाच आभासी जगाच्या आगमनानंतर माणसांना आपल्या जगण्याच्या तंत्रशरण सवयी बदलाव्या लागल्या. लोक भावनाहीन, प्रेमहीन बनले आणि एकव्यक्ती प्रेमाचे व्रत हरवून बसले. ‘फेसबुक’ हे ‘ठेसबुक’ ठरू लागले आणि सोशल नेटवर्किंग नातेसंबंधांना अति जवळ नेऊन खूप लांब फेकू लागले. घटस्फोटाच्या कारणांमध्ये अलीकडे सोशल नेटवर्किंगची बाब वरचढ ठरत आहे. त्याबाबतचा खास आढावा..

निमित्त काय?
अलीकडेच सौदी अरेबियात घडलेली गोष्ट. एका पतिराजांनी त्यांच्या पत्नीला ती आपल्या ट्विटर संदेशांना बघूनही त्याला उत्तर देत नाही उलट मित्रमंडळींशी गप्पा मारत बसते म्हणून तलाक दिला. ट्विट ही मायक्रोब्लॉिगग साइट आहे, त्यामुळे त्यावर केवळ एकशेचाळीस वर्णाक्षरेच लिहिता येतात. आता इथे कुणी कुणाला तलाक दिला आहे हे महत्त्वाचे नाही व तो ट्विटरवर दिला की फेसबुकवर हेही तितके महत्त्वाचे नाही, कारण संशयकल्लोळ हा माणसाचा स्थायीभाव आहे. फक्त हा संशय बळावण्याची कारणे बदलली आहेत व त्याचे थेट पुरावे संदेश साठवले जात असल्याने मिळत आहेत. फार आधीपासून ट्विटर व फेसबुक ही घटस्फोटाची साधने बनली असल्याची टीका होते आहे. पण येथे पुन्हा तीच गोष्ट महत्त्वाची आहे की, आपण एकमेकांना गृहीत धरत असतो. ती विवाहित असली म्हणजे तिला मित्र नसावेत व तो विवाहित असला म्हणजे त्याला मत्रिणी नसाव्यात. इथे आपण एकमेकांचा अवकाश संपवत असतो. केवळ कुणी कुणाला संदेश पाठवला किंवा चॅट केले म्हणजे तो ऑनलाइन व्यभिचार होतो, असे अनेकांना वाटत असेल तर ते संशयी वृत्तीचे आहेत एवढाच त्याचा अर्थ होतो. स्मार्टफोनमुळे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर आपल्या अति जवळ आले अन्यथा डेस्कटॉप उघडून हे सगळे करीत बसायचा उरक कुणाला नव्हता. तंत्रज्ञानाचे मामुलीकरण (क्षुल्लकीकरण) झाल्याने अश्लील चित्रणे करण्यापासून ते घटस्फोटापर्यंत सर्व प्रकार हे समाजाच्या बहुतांश वर्गात भारतातही दिसून येते.

7उदाहरणे तरी किती..
स्मिता (नावे काल्पनिक) हिचा विवाह रितेश याच्याशी झालेला होता. जेव्हा ती स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, बाथरूममध्ये फोन वापरू लागली, तेव्हा रितेशला शंका आली. त्याने तिचे मेसेज तपासले. काही सापडले नाही मग डिलीट केलेले मेसेजेस काढणारे अ‍ॅप वापरले, तेव्हा कळले की तिचे शेजाऱ्याशीच प्रेमसंबंध जुळले होते, फक्त त्याला व तिलाही सामाजिक संकेतस्थळाने मोकळा श्वास घेण्याची संधी दिली होती. आता हुंडय़ाच्या कारणासाठी घटस्फोट घेण्याचे दिवस गेले आहेत, स्मार्टफोनने केवळ आयटीतल्या लोकांनाच व्यापलेले नाही तर समाजाच्या सर्व घटकांना व्यापले आहे. स्मार्टफोनच्या कि मती कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांकडे आता इंटरनेट एका बोटाचा खेळ आहे. एक उदाहरण तर सांगण्यासारखे नाही पण समस्येची गंभीरता कळण्यासाठी सांगणे गरजेचे आहे. एका पतीने वकिलाला असे सांगितले की, माझी पत्नी सेक्स करीत असतानाही व्हॉट्सअपवर असते. एका पतीने तर त्याच्या पत्नीचे संदेश हॅक करून तिचा मित्र कोण आहे ते शोधून काढले. अर्थात, या घटना दोन्ही बाजूने घडू शकतात. फेसबुक व ट्विटरमुळे घटस्फोटांचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी तरी वाढले आहे, असे या क्षेत्रातील वकील रेवती रोहिरा सांगतात. एकटय़ा बंगळुरूत गेल्या वर्षी अशी १२१३ प्रकरणे झाली. पूर्वी वर्षांला तीन ते चार हजार घटस्फोटाची प्रकरणे असायची. आता कौटुंबिक न्यायालयात महिन्याला १५०० ते २००० घटस्फोट प्रकरणे येतात, असे कर्नाटक उच्च न्यायालयातील वकील दयानंद हिरेमठ सांगतात. आता एसएमएस, एमएमएस व ईमेल हे पुरावे म्हणून दाखवले जातात. सध्या इलेक्ट्रॉनिक पुरावा भारतीय न्यायालयात ग्राह्य़ धरला जातो. भारतीय पुरावा कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक साहित्य हे कागदोपत्री पुराव्यासारखाच पुरावा मानला जातो. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर आता चॅटिंगशिवाय फ्लìटग वगरे सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्यासमोर अनेक राजकुमार किंवा राजकुमारी या आभासी जगात फेर धरून नाचत आहेत पण ते खोटेही असू शकतात, त्यामुळे तुमचा घटस्फोट झाला तर नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. वाटेल ती चित्रे अपलोड करण्याचे टाळा. शक्यतो पूर्वीची छायाचित्रे ही नातेसंबंधात मिठाचा खडा टाकू शकतात. जोडीदारांमध्ये सुज्ञता असेल तर मात्र किरकोळ कारणावरून असे घडणार नाही.

काडीमोडाचे प्रमाण?
गेल्या वर्षी किमान पाच हजारांहून अधिक घटस्फोटाचे दावे दाखल झाले. त्यापकी तीन हजार या तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे दाखल झालेले आहेत. मग हे दावे कुठल्या कारणास्तव असतात तर अश्लील संदेश पाठवणे, दुसऱ्याच मित्राशी किंवा मत्रिणीशी चॅटिंग करणे, फेसबुकवर नको ती छायाचित्रे पोस्ट करणे असे नानाविध प्रकार त्यात असतात. सेक्सविषयक जे चॅटिंग केले जाते, त्याला ‘सेिक्स्टग’ असा एक नवा शब्दही वापरात आला आहे. आता यात एखाद्या जोडीदाराने त्याने पाठवलेले मेसेजेस डिलीट केले, तरी ते पुन्हा काढण्यासाठीही अ‍ॅप्स आहेत. काही छायाचित्रांच्या आधारेही  जोडीदाराला रंगेहाथ पकडणे सोपे झाले आहे.

पाहणी अहवालांच्या जगात
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ लॉयर्सच्या हवाल्याने म्हटले आहे, की सामाजिक संकेतस्थळांच्या वापराने घटस्फोटांच्या संख्येत वाढ होत आहे. ब्रिटनच्या ‘डिव्होर्स ऑनलाइन’ या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार किमान एक तृतियांश घटस्फोट हे फेसबुक या शब्दाशिवाय पूर्ण होत नाहीत. अर्थात हे २०११ मधील निरीक्षण आहे. आता त्यात परिस्थिती आणखी बदलली असेल. भारतात बंगळुरू, हैदराबाद, पुणे यांसारख्या आयटी शहरांमध्ये स्मार्टफोनमुळे सामाजिक संकेतस्थळांचा वापर शहाणपणाने न केल्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे. एवढेच नव्हे तर ईमेल किंवा एसएमएस पाठवून घटस्फोट घेतले जात आहेत.

डिटेक्टिव्ह सेवा (गुप्तहेर)
आता कोण काय करील काही सांगता येत नाही. पार्टनर शोधण्यासाठी तुम्हाला कुणाच्या बेडरूममध्ये घुसण्याची गरज नाही. इंटरनेटने तुमच्या पार्टनरला जवळ आणले आहे. त्यामुळे शेरलॉक होम्स व व्योमकेश बक्षी सारख्या जासूस (हेर) लोकांची चलती आहे. समाजात ऑनलाइन व्यभिचार वाढला आहे पण तो आभासी आहे. पण हा व्यभिचारही काही कमी नाही. एक महिला दिल्लीतील एका डिटेक्टिव्ह संस्थेकडे आली. तिचा पती बँकॉकला होता. मग पुढचे खरे तर सांगायला नको पण तिला संशय यायचा तो आला. तिने या संस्थेला त्याच्या लफडय़ाची पाळेमुळे शोधायला सांगितली. त्यांनी त्याचा संगणक हॅक करून त्याच्या प्रेमप्रकरणाचे पुरावेच तिच्या हाती दिले. अनेकदा परदेशी स्त्रिया इंटरनेटच्या महाजालात तुम्हाला संदेश टाकून प्रेमपाशात अडकवतात, काही वेळा पुरुषही तसे करतात, प्रत्यक्षात ते विवाहित असतात. सुखी समाधानी नसलेली कुटुंबे असतात, त्यांना आता इंटरनेटवरील सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जरासं मोकळं व्हायला मिळतंय, भले ते आभासी का असेना. काही जण त्या आभासी नातेसंबंधातही सुखी असतात. चॅटिंगचे व्यसन लागले की तुमची गाडी रुळावरून घसरते आहे असे समजायला हरकत नाही, असे सायबरतज्ज्ञ पवन दुग्गल सांगतात. भारतात अगदी स्त्रिया व पुरुषही या आभासी जगात इतके बुडून जातात, की त्यांना कुटुंबाचे भान राहत नाही, असे दुग्गल सांगतात. त्यांचा सल्ला असा, की आभासी जगातील असल्या नसलेल्या स्त्री-पुरुषांशी नात्यांचे इमले बांधले, तरी काही उपयोग नसतो. त्यापेक्षा खरा विवाह जो आहे तो टिकवा त्यात आनंद फुलवा.

निष्कर्ष व गफलती
अमेरिकेतील मिसुरी विद्यापीठाचा पत्रकारितेचा विद्यार्थी रसेल क्लेटन याने ‘सायबर सायकॉलॉजी बिहॅवियर अ‍ॅण्ड सोशल नेटवìकग’ या शीर्षकाखाली एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्याच्या मते ट्विटरमुळे ऑनलाइन व्यभिचार वाढतो व त्यामुळे घटस्फोट होतात. पण नंतर हे संशोधन त्याच्या शोध प्रक्रियेच्या आधारे खोडून काढण्यात आले. जे लोक ट्विटर वापरतात व वापरत नाहीत त्यांच्यातील घटस्फोटांच्या संख्येची तुलना यात करणे अपेक्षित आहे पण काही वेळा चुकीचे निकष, अपुऱ्या नमुन्यामुळे निष्कर्ष, चुकीच्या प्रश्नावली यामुळे उत्तर चुकीचे मिळते. निदान सामाजिक संशोधनात तरी कुठलेही निष्कर्ष काढताना संशोधन पद्धती खूप अचूक हवी. माजी मंत्री शशी थरूर व त्यांची संशयास्पदरीत्या मृत्यू पावलेली पत्नी सुनंदा थरूर यांच्यातील नातेसंबंधांत पाकिस्तानी पत्रकार महिलेमुळे ट्विटरवर संशयकल्लोळ झाला. ‘प्यू’ अभ्यास अहवालात मात्र असे म्हटले आहे, की सामाजिक संकेतस्थळांमुळे ७४ टक्केनेटीझन्सच्या मते सकारात्मक, २० टक्के नेटीझन्सच्या नकारात्मक व ४ टक्के नेटीझन्सच्या मते बरेवाईट परिणाम होतात.

नातेसंबंधातील बळकटी?
फेसबुक या सामाजिक संकेतस्थळामुळे कौटुंबिक नाती कमकुवत नव्हे तर उलट मजबूत होतात, असे कॉनकॉíडया विद्यापीठातील संशोधक मिया कोनसाल्वो यांनी म्हटले आहे. सोशल नेटवर्क गेम्स (एसएनजी)मुळे कुटुंब चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. अनेकदा नातेवाईक देशविदेशात असतात तरी ते या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. भौगोलिक सीमा ओलांडण्याचा तो एक स्वस्त मार्ग आहे. ऑनलाइन गेममुळे कुटुंबातील सदस्यांना संभाषणासाठी समान विषय मिळतो व ते त्यांचा महत्त्वाचा वेळ एकत्र घालवतात. प्रत्यक्षात एसएनजीचा थेट संज्ञापनाशी संबंध नसतो. जुनी हरवलेली नातीही काही वेळा फेसबुकमुळे सापडू शकतात. कँडी क्रश या गेममुळे पारंपरिक
क्लू या बोर्ड गेमची आठवण येते. एसएनजीमुळे सामाजिक संज्ञापन होते, यात मित्र, अनोळखी लोकही एकत्र खेळू शकतात. विशीतल्या मुलांपासून आजोबांपर्यंत कुणीही अगदी आई-मुलेसुद्धा गेम खेळू शकतात, असे ब्रिटनमधील ब्रुनेल विद्यापीठाच्या गेम स्टडीज विषयाचे प्राध्यापक बोड्रीयू यांनी म्हटले आहे.

मग चुकते कोठे..
पूर्वीही विवाह होत असत. ते बरे-वाईट चालत असत. भारतात विवाह पद्धती ही फार भक्कम आहे असे म्हटले जाते, पण दोन्ही बाजूने काहींच्या मते एकाच बाजूने त्या यज्ञात अपूर्णतेची आहुती पडत असते. स्थिती बदललेली नाही, मंच बदलला आहे. व्यभिचार पूर्वीही होता, आता तो ऑनलाइन झाला आहे. चारचौघांत आला आहे. आता कुणी कुणाला उल्लू बनवू शकत नाही. अन्यथा उल्लू बनािवग ही जाहिरात सगळ्यांनी बघितली आहे. मांजर डोळे मिटून दूध पित असले तरी जग पाहात असते. तुमचा डेटा तुमची सगळी कुंडली मांडत असतो. ती कुंडली मांडणारे नवे तांत्रिक तज्ज्ञ उपलब्ध आहेत, तुमच्यावर लक्ष ठेवायला हेर आहेत. तुमच्या देहबोलीवरून तुमचे चालचलन ओळखणारे तज्ज्ञ आहेत. जे विवाह जमतात पण छत्तीसच्या आकडय़ाच्या दिशेने वाटचाल करतात, तेथे बाहेर कुठेतरी भावनिक आसरा शोधला जातो. तो विवाह तुटायला आणि ट्विटरवरची तुमची टिवटिव त्याला किंवा तिला समजायला एकच गाठ पडते अन् सात फेऱ्यांच्या वेळी घेतलेल्या

आणाभाका विसरून आभासी जगातील त्याचे किंवा तिचे वागणेच आपल्या भोवती फेर धरू लागते. संशयकल्लोळ पूर्वीप्रमाणेच आहे, मार्ग बदलला आहे. जिथे एकमेकांची मने बांधली गेली आहेत, नाते घट्ट आहे, तिथे तुम्ही सातासमुद्रापार असाल तरी नजर ठेवण्याची गरज नाही. पण नातेच कमकुवत आधारावर असेल, तर ट्विटरची १४० वर्णाक्षरेही क्षणार्धात डाव अध्र्यावरती मोडून टाकतात.

पुन्हा तारेचा जमाना
फेसबुकने नुकतीच प्रेमिकांसाठी प्लॅटनिम डे ऑफ लव्ह फेसबुक ही मोहिम सुरू केली असून त्यात प्लॅटिनम टेलेग्राम ऑफ लव्ह अ‍ॅप्लिकेशन देण्यात आले आहे. https://apps.facebook.com/pttelegramoflove/https://apps.facebook.com/pttelegramoflove यात टेलिग्रामच्या अक्षरांचा आभास निर्माण करून संदेश तुमच्या टाइमलाइनवर टाकला जाणार आहे तर हा आहे डिजिटल युगातील प्रेम व्यक्त करण्याचा नवा मार्ग.