मंगळावर काही काळ उबदार वातावरण होते व तेव्हा तेथे पाणी वाहात होते पण हा परिणाम तेथे काही वर्षेच टिकून राहिला असे मत नवीन संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे. नवीन संशोधनानुसार, मंगळावरील ज्वालामुखी व हरितगृह वायूंमुळे मंगळ उबदार ग्रह बनला, पण ही स्थिती दहा ते शंभर वर्षे होती. तेथे नद्या, नाले, तळी होती, त्यावरून मंगळ हा उबदार होता. ब्राऊन विद्यापीठ व वेधमान इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, मंगळावरील पाणी तात्कालिक होते व त्याचा संबंध ज्वालामुखी व हरितगृह वायूंशी होता त्यात सल्फर डायॉक्साइडचा समावेश होता. मंगळाच्या वातावरणाची नवीन प्रारूपे तयार करण्यात आली असून त्यानुसार तेथे दहा ते शंभर वर्षेच पाणी होते.
सूर्य अब्जावधी वर्षांपूर्वी फार प्रखर नव्हता व त्यामुळे मंगळ हा उबदार ग्रह असल्याची पूर्वीची छायाचित्रे संशय निर्माण करणारी आहेत. जेम्स डब्ल्यू हेड यांच्या मते तेथे बर्फ होते व नंतर पाणी वाहून तळी व झरे निर्माण झाल्याचेही पुरावे आहेत. ज्वालामुखीच्या क्रियेमुळे तेथे पाणी होते. ३.७ अब्ज वर्षांपूर्वी तेथे ज्वालामुखीचा स्फोट होऊन उष्णता निर्माण होऊन तो ग्रह उबदार बनला व त्यामुळे पाणी वाहू लागले. सल्फर डायॉक्साइडमुळे तेथे हरितगृह परिणाम बनला असावा त्यामुळे मंगळाच्या विषुववृत्तावर उष्णता निर्माण झाली व त्यामुळे पाणी वाहिले असावे असे या शोधनिबंधात म्हटले आहे. नेचर जिओसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.