प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! जगप्रसिद्ध चॉकलेट ट्रफल केकविषयी आजच्या लेखात..

घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजूनच यश पदरात पडणार असेल तर आजच्या धावत्या जगात ‘शॉर्टकट्स’ या शब्दाला तशी काहीच किंमत उरत नाही, असं माझं ठाम मत आहे; पण.. कटुसत्य हे आहे की आजच्या आधुनिक जगात ‘शॉर्टकट्स’ शोधणारे पैशाला पासरी भेटतील. तेच आज ‘यशस्वी’ व्यावसायिक वा कलाकार म्हणून बातम्या, टीव्हीमधून झळकत आहेत! परंतु चॉकलेट व्यवसायातील १५ वर्षांच्या मेहनती कारकीर्दीला स्मरून सांगतो की, केवळ कामच काम करून नव्हे तर, तन-मन-धन अर्पण करूनच चॉकलेटमधल्या ‘अधिकार’पदावर मला विराजमान होता आलं. ‘गॉडफादर’ हा प्रत्येकाच्याच नशिबी लिहिलेला नसतो!  ही झाली तत्त्वचर्चा. आता खाद्यचर्चेकडे वळू या का?

आता एखाद्या खाद्यपदार्थाचंच घ्या. तो तयार होऊन प्रसिद्धीपदास पोहोचण्यास असा कितीसा कालावधी लागत असावा, असा तुमचा अंदाज आहे. पाच, दहा.. फार तर २० वर्षे. मला वाटतं, अनेकांच्या अटकळींच्या या उडय़ा यापासून पाऊल, दीडपाऊलच पडण्याची शक्यता अधिक आहे. पण आपल्या सगळ्यांच्या आवडत्या, आता जगप्रसिद्ध झालेल्या चॉकलेट केकच्या जन्माची कहाणी ऐकली तर अटकळ चुकेल तुमची. ऐकायचीय? सांगतो तर मग! १७६४ मध्ये डॉ. जेम्स बेकर यांनी पहिल्यांदा ट्रफल किंवा चॉकलेट क्रीम रूपात कोको बियांचा वापर केला. त्यानंतर तो इतरांनी वापरण्यास सुरुवात केली. पण चॉकलेट ट्रफल केकला आजचं वैभव प्राप्त व्हायला शतकाहून अधिक जावं लागलं. आज हा चॉकलेट केक जगभरात अनेक सोहळ्यांचा महत्त्वाचा भाग बनून राहिला आहे. लग्नापासून बर्थ डे पार्टीपर्यंत आणि ख्रिसमसपासून ते लहान-थोरांच्या गेट टुगेदपर्यंत अगदी घराघरांतून आणि बडय़ांच्या सोफिस्टिकेटेड जेवणावळींमधून चॉकलेट केक सगळीकडे दिसतो. पण या चॉकलेट ट्रफल केकला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यास इतका दीर्घ कालावधी लागला. १८७९ साली रूडॉल्फ लिण्ड्ट यांनी बेकर यांच्या ट्रफलमध्ये भर घालीत ‘बेक्ड चॉकलेट केक’ची अप्रतिम रेसिपी तयार केली. कारण त्याआधी चॉकलेट पेय म्हणूनच जास्त प्रसिद्ध होतं. अमेरिकेत ‘चॉकलेट डिकेडन्स केक’ प्रसिद्ध झाले आणि यामुळेच जगभर सॉफ्ट, लुसलुशीत आणि थोडासा चिकट अशा केक्सचा ट्रेण्ड आला. तुम्ही ‘लाव्हा केक’विषयी ऐकलं असेलच. अमेरिकेतील क्लासिक केकमधील लाव्हा केक हा एक. बघता क्षणी प्रेमात पडावं अशी ही पाककृती. अमेरिकन क्लासिक्समध्ये मोडणारी पण छोटय़ा ‘पेस्ट्री’च्या फॉर्ममधली. पण आजकाल हेल्दी ऑप्शन्सकडे वळताहेत. त्यातूनच वीगन, डेअरी फ्री, ग्लुटेन फ्री, एगलेस, पिठाचा अंश नसलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑरगॅनिक हे शब्द ट्रेण्डिंग आहेत. पण तरीही मला सांगावंसं वाटतं, या जुन्या अभिजात पाककृतींना सोडू नका. त्यांचा आस्वाद घेणंही मी तितकंच महत्त्वाचं मानतो. चॉकलेट केक हे माझं आवडतं डेझर्ट आहे. अगदी लहानपणापासून.

त्यावरून मला लहानपणाचा एक किस्सा आठवतोय. अंदाजे १९९६ ची ही गोष्ट. मी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये असताना सेंट मदर तेरेसा शेजारच्या मिशनरीमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. अर्थात मदरविषयी भरपूर ऐकून आणि काहीसं वाचूनही होतो. त्या शाळेच्या भेटीवर आल्याने मला प्रत्यक्षात भेटणार या कल्पनेनेच माझा आनंद द्विगुणित झाला. त्यांच्याभोवती अनुयायी आणि इतर मंडळींचा गराडा पडलेला होता. त्यातून वाट काढीत मदर यांच्यापाशी पोहोचलो. माझ्या हातात चॉकलेट होतं. ते मी त्यांना देऊ केलं, तर त्यांनी अतिशय प्रेमाने माझ्या हनुवटीला कुरवाळत विचारलं, तुला कसं काय ठाऊक की मला चॉकलेट्स आवडतात? मी उत्तरलो की, मी कुठे तरी वाचलं होतं. मदर तेरेसांची ती भेट माझे सर्वात मोठे संचित आहे. त्या माझ्याशी बोलल्या ही त्या दिवशीची सर्वात आनंददायी गोष्ट होती. घरी आल्यावर हा आनंद साजरा करायला बाबांनी चॉकलेट ट्रफल केक आणलेलाच होता. सोने पे सुहागा. चॉकलेट्ससोबत चॉकलेट केक हा माझा सर्वात आवडता आहे, अगदी लहानपणापासून. लहानपणी तो ट्रफलवाला आहे की नाही हे माझ्यालेखी महत्त्वाचं नव्हतं, चॉकलेट केक असल्याशी कारण. अजूनही चॉकलेट केक हा माझा आवडता गोड पदार्थ आहे. चॉकलेट ट्रफलमध्ये सँडवीच केलेला चॉकलेट स्पाँज माझा फेव्हरेट. चॉकलेट गोडगट्टम मिल्क चॉकलेट असू दे नाही तर थोडं कडवट डार्क चॉकलेट. हल्ली मी चॉकलेट केक एन्जॉय करायची मी एक वेगळी पद्धत शोधून काढली आहे. मी फ्रीजमधून काढलेला चॉकलेट केक थेट न खाता तो मायक्रोवेव्ह फक्त १५ सेकंदांसाठी ठेवतो आणि मग क्लासिक व्हॅनिला आइस्क्रीमसोबत त्याचा स्वाद घेतो. स्वर्गीय स्वाद की काय तो हाच असावा! आनंदाची चवही अशीच लागत असणार.

वरुण इनामदार

(अनुवाद – गोविंद डेगवेकर)