‘‘चालू आर्थिक वर्षांत मला आमच्या ‘अस्पायर’ कंपनीच्या शाखांचं शतक गाठायचंय आणि २५ हजार स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्यासह ५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं माझं ध्येय आहे.’ं’ मोतीलाल ओसवाल समूहातील अ‍ॅस्पायर फायनान्सच्या ‘माला’ (महिला आवास लोन)च्या प्रमुख दीपाली शिंदे यांचा भविष्यातील हा रोडमॅपच आहे..

उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्वरित नोकरी मिळेल, वेगळं करिअर होईल म्हणून त्या ‘हॉटेल मॅनेजमेंट’कडे वळल्या. घरची परिस्थितीही आर्थिकदृष्टय़ा हालाखीची होती, त्याला मिळवत्या हाताने आधार मिळाला असता. पण जेव्हा प्रत्यक्ष ‘हॉटेल मॅनेजमेंट’ सुरू झालं तेव्हा मात्र हे क्षेत्र काही फारसं आव्हानात्मक वाटेना. काही तरी वेगळं केलं पाहिजे, भरीव केलं पाहिजे या इच्छेतून त्यांनी निवडलं होम फायनान्सचं क्षेत्र आणि हळूहळू त्यातल्या यशानं त्यांना आपला हाच मार्ग असल्याची खात्री पटली. आज वित्तक्षेत्रातील ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ ला त्यांच्या नेतृत्वाखाली मिळत असलेलं यश हे त्याचंच द्योतक आहे. त्या दीपाली शिंदे. मोतीलाल ओसवालमधील ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ या गृह कर्ज वितरण क्षेत्रातील त्याचं नेतृत्व महत्त्वाचं ठरतंय.

‘हॉटेल मॅनेजमेंट’ला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी आपल्या वित्तक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली ती ‘डीएचएफएल’मध्ये आणि आता त्या ‘अ‍ॅस्पायर होम फायनान्स’ कंपनीत आपल्या अनुभवाचा फायदा कष्टकरी वर्गाला कसा करून देता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. मोतीलाल ओसवाल हा भांडवली बाजारात अप्रत्यक्ष व्यवहार करणारा, या विषयीचे मार्गदर्शन करणारा समूह. गृह वित्तपुरवठासारख्या क्षेत्रात त्याने नुकताच प्रवेश केला असून बिगर बँकिंग वित्त क्षेत्रातील त्यांची ही नवीन कंपनी आहे. या कंपनीचं नेतृत्व दीपाली यांच्याकडे सोपवलं गेलं आणि त्यांनी या ‘कॉर्पोरेट’ला ग्रामीण अंगणात उतरवलं.

आपल्या वेगवान करिअरच्या सुरुवातीच्या प्रवासाविषयी दीपाली सांगतात, ‘‘मी मुंबईकरच. गोरेगावमध्येच बारावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला गेले. तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी सुरुवातीची काही र्वष पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केलं. मुंबईतील जेडब्ल्यू मेरिएट, आयटीसी आदी प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये मी काम करत होते. तिथे वेळेचं मोठं आव्हान होतं. आदरातिथ्य क्षेत्र असल्याने अगदी रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं. वेळापत्रक असं काही नव्हतंच. पण तिथे काम केल्यानंतर लक्षात आलं, हे क्षेत्र काही फार आव्हानात्मक नाही. म्हणून मी ते क्षेत्रच सोडून दिलं. २००८ मी गृह वित्त क्षेत्रात आले. एकूणच हा विषय तसा माझ्यासाठी कठीण होता. पण विक्री क्षेत्रात असल्यानं मी थेट ग्राहकांशी जोडले गेले. मी तेव्हा ‘डीएचएफएल’मध्ये होते. व्यवस्थापकपदापर्यंत मी तिथं काम केलं. मग २०१४ मध्ये मी इथे आले. मोतीलाल समूहाची ‘अ‍ॅस्पायर’ तेव्हा नुकतीच स्थापन झाली होती. सारा व्यवसायच नवा होता. त्यामुळे प्रगतीला वाव होता. कंपनीनेही मला इथं मोठी जबाबदारी दिली. ‘माला’ (महिला आवास लोन) सारख्या नव्या योजनांची आखणी झाली आणि त्याचं प्रमुखपद माझ्याकडे आलं. त्यात यशही मिळालं. गृह वित्त क्षेत्रात अशी आव्हानं माझ्यासाठी आहेत, असं आजही वाटतं. त्यात नवीन कंपनी म्हणून ते अधिक महत्त्वाचं ठरतं. पण आम्ही अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्यांबरोबर काम करतो आहोत. त्याचबरोबर लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील ‘लिज्जत पापड’सारख्या कंपन्यांबरोबर जोडलो गेलो आहोत. अर्थात या साऱ्यासाठी माझ्या वरिष्ठ मार्गदर्शकचा अनुभवही मोलाचा ठरतो आहे. मी पाहिलंय, या क्षेत्रात असलेला वर्ग हा कष्टकरी आहे. आर्थिक साक्षरतेबाबत तो काहीसा मागे पडत असला तरी त्याला मार्गदर्शन केल्यास या क्षेत्रात तो नक्कीच यश संपादन करू शकतो. मोठय़ा कर्जबुडव्यांपेक्षा अशा वर्गात प्रामाणिकपणा अधिक आहे. आमच्या दृष्टीने या क्षेत्रात थोडीशी जोखीम आहे; पण तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं तर आर्थिक यशही तेवढंच शक्य आहे.’’
अनोख्या क्षेत्रात रुळलेल्या दीपाली करिअर आणि आयुष्याबाबत सांगतात की, ‘‘आव्हाने ही प्रत्येकासाठी असतातच. त्याला तुम्ही कसे सामोरे जाता हे जास्त महत्त्वाचं आहे. आव्हानांवर मात करणं यातच खरं यश आहे. स्त्रीवर्गाने तर वेगळी अशी क्षेत्रं जोपासायला हरकत नाही. आजकाल या वर्गाला घरातून, पुरुष मंडळीकडूनही खूप सहकार्य मिळतं. तेव्हा तुम्हाला जे करायचंय ते निश्चित केलं की त्या दिशने मार्गक्रमण करत राहा.’’

‘अ‍ॅस्पायर’च्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या यशाच्या जोरावर त्या कंपनीच्या भविष्यातील प्रवासाबाबत त्या फारच उत्सुकतेने बोलतात. ‘‘चालू आर्थिक वर्षांत मला कंपनीच्या शाखांचं शतक गाठायचंय आणि हो, २५ हजार स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्यासह ५,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं माझं ध्येय आहे.’’ दीपाली भविष्यातील रोडमॅपच सादर करतात. आई ‘अन्नपूर्णा’ आणि वडील रिक्षाचालक अशी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या दीपाली यांचे दोन्ही लहान भाऊ हे खासगी कंपनीत कार्यरत आहेत. दीपाली यांच्या आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव चाखून अनेकांची रसना तृप्त झाली आहे. राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडीच्या पदार्थाची मागणी आजही आवर्जून करतात आणि त्याही हौसेने ती पूर्ण करतात. आजीच्या घरामुळे त्यांचा नवीन घरासाठी आग्रह नव्हता पण आता कामाच्या निमित्तानं कष्टकऱ्यांचं स्वत:चं घर होण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी ठोस करावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यातूनच कष्टकरी बेघरांना निवारा मिळवून देण्याचं ध्येय दीपाली यांनी गाठीशी बांधलं आहे. स्वप्न खूप आहेत, मार्गही दिसतो आहे.. झेपावणारे पंख अधिकाधिक उंच न्यायचे आहेत. इतकंच.

व्यवसायाचा मूलमंत्र
पुढाकार घ्या. चर्चा करा. अनेक अडथळ्यांवर मात करताना सामंजस्याने, शांततेने निर्णय घ्या. तुम्ही ज्या भागात, क्षेत्रात कार्य करता त्यात झोकून देऊन काम करा. यश नक्कीच मिळेल. जोखीम ही प्रत्येक क्षेत्रात आहेच. ती जाणून घेऊन पुढे जायला हवं.
आयुष्याचा मूलमंत्र
करिअरप्रमाणेच आयुष्यातही प्रत्येक दिवस वेगळा असतो. तुम्हाला नेहमी वेगळी माणसं भेटत असतात. त्यांच्या सहवासात आयुष्य अधिक आनंददायी बनवा. महिला या स्वंतत्र आहेत त्यांनी स्वत:चं अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करावं. भविष्याची चिंता न करता वर्तमानात आनंदाने जगा.

दीपाली शिंदे
दीपाली यांच्या नेतृत्वाखाली स्थापनेच्या पहिल्या १० महिन्यांत ३८० कोटी रुपयांचं कर्ज वितरण करणारी ‘अ‍ॅस्पायर’ ही ६७ वी बिगर बँकिंग वित्त कंपन्यांमधली पहिली कंपनी ठरली आहे. वित्त सेवा योगदान ग्रामीण पातळीवर जास्तीत जास्त पोहोचविण्यात दीपाली यांचे मार्गदर्शन उपयोगी पडले आहे.

अ‍ॅस्पायर होम फायनान्स
अस्पायर होम फायनान्स ही मोतीलाल ओसवाल समूहातील गृह वित्त वितरण क्षेत्रातील नवउद्यमी. अवघ्या दीड वर्षांत कंपनीने ११ हजार कर्जदारांना २,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित केले आहे. कंपनी तिच्या देशभरातील ५५ शाखांमार्फत वार्षिक १२.५ टक्के दराप्रमाणे २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्जवाटप करते.

 

– वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com