‘इंडोको रेमिडीज’, देशातील नावाजलेली औषध उत्पादन कंपनी. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून अस्तित्वात असलेली. गेल्या जवळपास सात दशकांमध्ये ‘इंडोको रेमिडीज’च्या तिसऱ्या पिढीचं एक स्त्री म्हणून नेतृत्व करताना व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर या घर, कंपनी याचबरोबर कलेविषयीची आवडही जोपासतात. परंपरेने मिळालेला आहे म्हणून व्यवसाय आहे तसा करण्याऐवजी भविष्यातील आव्हानांना कसा पुरून उरेल यासाठी परिस्थितीनुरूप बदलण्याची मानसिकता अंगी बाळगणाऱ्या अदिती यांच्या केबिनमधून..

मुंबईतल्या वरळीतील एका चित्रप्रदर्शनाचा एक ई-मेल मला आला. नजर टाकली तर प्रदर्शनातील उपस्थितांमध्ये एका औषध कंपनीच्या मालकिणीचं छायाचित्र पाहून थबकणं झालंच. वाटलं, प्रमुख पाहुण्या असाव्यात किंवा प्रदर्शनातल्या एखाद्या आर्टिस्टनं त्यांना फोटोसाठी आग्रह केला असावा; पण पुढे सारंच स्पष्ट होत गेलं. दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित वरळीतील चित्रप्रदर्शनादरम्यानची त्यांची ती उपस्थिती होती, आणि ती केवळ बिझनेस वुमन म्हणून नव्हे; तर स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी दीनानाथ दलाल अर्थात आजोबांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ‘इंडोको रेमिडीज’च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून अदिती कारे-पाणंदीकर यांच्या कर्तृत्वाचा हा वेगळा रंग होता.
अदिती यांच्या वडिलांचे वडील गोविंद रामनाथ कारे यांनी १९४५ च्या सुमारास गोव्यातून औषधविक्रीचा व्यवसाय केला. १९४७ च्या सुमारास ‘इंडोको रेमिडीज’ची नोंदणी मुंबईत झाली. या व्यवसायाची जबाबदारी मग अदिती यांचे वडील
सुरेश कारे यांच्यावर सोपवली गेली आणि त्यांनी ती मोठय़ा मुलीच्या नात्याने सोपवली अदिती यांच्यावर. सुरेशराव २३ वर्षांचे असताना कंपनीची विक्री २.५ लाख रुपयांची होती. १९९९ मध्ये ती १०० कोटींवर गेली. ती आज ७०० कोटी रुपयांच्या पल्याड गेली आहे. आता चालू आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना ती १,००० कोटी रुपयांवर होईल, असा विश्वास अदिती व्यक्त करतात.
‘‘माझा जन्म मुंबईतलाच. शिक्षणही इथलच. सुट्टीत मी आवर्जून कंपनीच्या फॅक्टरीत जायचे. पुढे घरातल्या व्यवसायातच करिअर करायचं ठरवलं. औषधनिर्माण शास्त्रातलंच व्यावसायिक शिक्षण परदेशात घेतलं. अमेरिकेतल्या ओहिओ युनिव्हर्सिटीतून फार्मास्युटिकल्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्समधली मास्टर्स मिळवली. पेटंट कायदे अन् त्यांची अंमलबजावणी यातलं सखोल शिक्षण घेतलं.’’ अदितींनी आपल्या व्यवसायातल्या प्रवेशाची अशी जाणीवपूर्वक आखणी केली.
शिक्षण ते करिअर प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, ‘‘१९९३ मध्ये ‘इंडोको’तच ज्युनियर मॅनेजर म्हणून काम सुरू केलं. या वेळी माझ्याकडे लॉजिस्टिक्सची जबाबदारी होती. पण वडिलांना मला सारं यायला हवं असं वाटायचं. त्यानंतर कंपनीतील मॅन्युफॅक्चिरग, मार्केटिंग अशा साऱ्या विभागांशी संबंध येऊ लागला. आजही एचआरशी संबंधित किंवा संशोधन विभागावर माझी अधिक देखरेख असते.’’
तांत्रिक, गुणवत्ता आणि संशोधन याच बरोबर एचआरचंही काम अदिती यांनी हाताळलं आहे. त्या म्हणतात, ‘‘कंपनीच्या आर्थिक बाजू सांभाळण्यापेक्षा माझा कल अशा अन्य विभागांकडे अधिक राहिला. आणि नंतर २०११-१२ च्या सुमारास मी कंपनीची व्यवस्थापकीय संचालक झाले. तत्पूर्वी दशकभरापूर्वीच कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली होती.’’
९० च्या दशकात ‘इंडोको’तलं तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करताना अदिती यांचं शैक्षणिक, व्यावसायिक ध्येय अगदी स्पष्ट होतं आणि त्याला त्यांनी आकारही दिला. ‘इंडोको’तील निर्णयक्षमतेबाबत त्या नमूद करतात, ‘इंडोको’त आल्यापासून पहिली दहा वर्षे मी निर्मिती विषयकगोष्टींवरच भर दिला. २००३ च्या दरम्यान कंपनीची औषधं निर्यात होऊ लागली. ब्रिटनमध्ये कंपनीची औषधं जाऊ लागली. व्यवसाय जुना होता पण क्षेत्र नवं होतं. आपण, आपला व्यवसाय आणि उत्पादित वस्तू याबाबात आपण सतत बदलतं असलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जायला हवं या हेतूने मग मीही काम सुरू केलं. त्याच सुमारास मग कंपनीची सूचिबद्धता भांडवली बाजारातही झाली.
‘‘सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय खूप मर्यादित स्वरूपात होता. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तसं तांत्रिकदृष्टय़ाही तो स्तर गाठणं अनिवार्य होऊन बसलंच. भारतीय औषधनिर्माण उद्योग हा खऱ्या अर्थाने खरेदी-विक्री आणि निर्मिती उद्योग म्हणून ओळखला जातो. पण संशोधन, विकास, नवीन शोध त्याचबरोबर नफा, गुंतवणुकीतील परतावा आदी व्यावसायिक बाबीही आता या उद्योगाच्या जोडीने येऊ लागल्या आहेत. पुढील ८-१० र्वष डोळ्यासमोर ठेवून हा व्यवसाय करावा लागतो. एखादं औषध तयार करायचं तर त्याचा अभ्यास, प्रयोग यासाठी दोन-तीन र्वष सहज निघून जातात. पुढचा तेवढाच आणखी काळ अमेरिका आदी नियामकांची परवानगी आदींसाठी.’’ अदिती सांगत होत्या. पण तुम्हाला निश्चित ध्येय समोर ठेवूनच कामं करावी लागतात. मग यश येतच.
स्वत:च्या ‘बॉस’ म्हणून असलेल्या भूमिके विषयी त्या म्हणतात, ‘सगळं मी करते असं म्हणून चालत नाही. तुमच्या हातून टीम घडायला हवी. त्यासाठी समोरच्याला स्वातंत्र्य द्यायला हवं. आमच्या क्षेत्रात जोखीम आहे. पण ती लगेच दिसत नाही. पण त्याचा ताण आधीपासून येत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठय़ा पदावर असता तेव्हा थोडा अहंभाव (स्मॉलेस्ट ईगो) जोपासायला हरकत नाही. इतरांना सोबत घेऊन काम करणं खरंच खूपच आव्हानात्मक असतं. आपल्या बरोबरीच्याचा हेतू वाईट कधीच नसतो. त्यांच्या दृष्टीने त्यांनी मांडलेली बाजू योग्यही असते. मात्र कंपनीचं हित म्हणून माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. यासाठी मग समतोल साधावा लागतो. ’’
‘‘एक मात्र नक्की की उद्योग, व्यवसाय क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांना, स्त्रीवर्गाला संधी आहे. मात्र त्यासाठी खूप शिकणं आणि त्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. ईझी मनीच्या सध्याच्या युगात कमी वयात अधिक वेतन वगैरे सर्व मान्य. पण त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणता येणार नाही. अल्प कालावधीसाठी ते सारं ठीक. सुरुवातीला ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ धोरण योग्य वाटतं. पण ते दीर्घ कालावधीसाठीचं नसतं. पेशन्स तर हवेच. शिवाय नव्याने करण्याची ऊर्मीही हवीच.’’
अदिती यांच्या आईचे वडील दीनानाथ दलाल मोठे चित्रकार! घरात सांस्कृतिक वातावरण होतं. कुटुंबीयांकडून ‘दीपावली’ विशेषांकही प्रकाशित होई. तर दुसरीकडे व्यावसायिक वातावरण. कला आईच्या माहेरून आलेली तर आजोबांनी सुरू केलेल्या व्यवसायाची आता सर्व जबाबदारीच अदिती यांच्यावर आहे. रेडिओलॉजिस्ट पती डॉ. मििलद पाणंदीकर यांचं पाल्र्यात डायग्नोस्टिक्स सेंटर आहे. मुलगी महिका व मुलगा मेघ दोघेही शाळेत जातात. वडिलांच्या वडिलांकडून आलेला परंपरागत व्यवसाय व आईच्या वडिलांकडून आलेली कला या दोन्ही आघाडय़ांवर अदिती तेवढाच वेळ देतात. ‘मी अदिती कारे नाही. तर अदिती दलाल-कारे-पाणंदीकर आहे’, असं त्या आवर्जून सांगतात.
औषध कंपनीसारख्या व्यस्त अशा व्यवसायाची धुरा वाहताना केवळ आवड म्हणून कलेविषयीची नाळ त्या तोडू शकत नाहीत. त्या अन् त्यांची बहीण मावशीच्या पुण्यानजीकच्या शिल्पकलेच्या स्टुडिओसाठीही कामाच्या व्यस्ततेतूनही वेळ काढतातच. म्हणूनच कुल्र्यावरून सांताक्रूझकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘इंडोको रेमिडीज’च्या कॉर्पोरेट कार्यालयातील प्रत्येक मजल्यावरील सजावटीतून त्यांच्या कलेविषयीची दृष्टी डोकावत राहते.
आयुष्यही वैविध्यपूर्ण, रंगबिरंगी जगणाऱ्या अदिती यांच्या केबिनच्याही दोन छटा आपल्याला नक्कीच लक्ष वेधून घेतात. एकीकडे टेबल, खुर्ची, लॅपटॉप तर दुसरीकडे चित्र आणि शिल्पकलेचा देखणा नमुना!

योगदान
अदिती यांचं कंपनीतील गेल्या दोन दशकांतील खरं योगदान म्हणजे त्यांनी सुरू केलेली कंपनीची स्वत:ची ‘आर अ‍ॅन्ड डी’ लॅब होय. अगदी १००-२०० चौरस फूट जागेत ही सुविधा होती. औषधनिर्मिती कंपनीची स्वत:ची अशी यंत्रणा असावी याकरिता त्यांनी केलेल्या आग्रहातून हे घडलं होतं आणि त्यात यशही आलं. व्यवस्थापकीय संचालकपदाच्या कारकीर्दीतील अदिती यांची ताजी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे स्पर्धक पिरामलचा क्लिनिकल रिसर्च विभाग ताब्यात घेणं होय. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही व्यवसाय खरेदीची तयारीही त्यांनी दाखविली आहे.

‘इंडोको’
‘इंडोको’ रेमिडीज ही खऱ्या अर्थाने पुरेशी रोकड असलेली कंपनी. म्हणजे कंपनीवर कर्जाचा भार नाही. म्हणूनच पुढच्या संशोधन व विकास या टप्प्याकरिता मोठय़ा प्रमाणात कंपनी वेळोवेळी गुंतवणूक करू शकते. मुंबईस्थित मुख्यालय असलेल्या ‘इंडोको रेमिडीज’चे भारतात विविध आठ निर्मिती प्रकल्प आहेत. ५,५०० कर्मचारी आणि ३०० कुशल शास्त्रज्ञ असणाऱ्या कंपनीचे ५५ देशांमध्ये अस्तित्व आहे. एकूण व्यवसायापैकी कंपनीचा ५० टक्के हिस्सा देशांतर्गत आहे. तर निर्यातीच्या दृष्टीने कंपनीकरिता अमेरिका, ब्रिटन आदी देश महत्त्वाचे आहेत. अमेरिकेत व्ॉटसन, दक्षिण आफ्रिकेत एस्पेन, ताज्या डच कंपनीबरोबर विदेशी व्यवसाय भागीदारी आहे.

आयुष्याचा मूलमंत्र
* वैयक्तिक आयुष्यात मूल्य कधीही सोडू नका.
* कठोर परिश्रम आणि नैतिकतेला पर्याय नाही.

करिअरचा मूलमंत्र
* शिस्त बाळगा, ती स्वत:च घालून घ्या.
* यशासाठी कधीही शॉर्टकट स्वीकारू नका.

veerendra.talegaonkar@expressindia.com