‘‘नव्याने तयार केलेले जुने कपडे बाजारात विकून उपजीविका करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या तीस वर्षांपासून हा व्यवसाय करत आहोत, पण अद्याप रस्त्यावरच आहोत. स्वकष्टावर जिवंत राहू शकतो, पण विकास होत नाही, अशी आमची परिस्थिती आहे.’’ जुन्या कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या काशी कापडी या भटक्या जमातीविषयी.

‘‘गा वोगाव आणि घरोघर फिरून नवीन भांडी व इतर संसारोपयोगी वस्तू देऊन जुने-फाटके कपडे गोळा करणे, त्या कपडय़ांची फेरशिलाई करणे, त्यांची धुलाई करणे, त्यांना रंग देणे, त्याला इस्त्री करणे आणि अशा प्रकारे नव्याने तयार झालेले जुने कपडे बाजारात विकून आपली उपजीविका करणे हा आमचा पिढय़ान्पिढय़ापासून चालत आलेला परंपरागत व्यवसाय आहे. हा कच्चा माल शहरांसह जरी खेडय़ापाडय़ांतून गोळा केला जात असला तरी त्याचा पक्का माल तयार करून व त्याची विक्री करण्याचे काम मात्र शहरातच करावे लागते, कारण गिऱ्हाईक शहरातच जास्त मिळते. फक्त या व्यवसायासाठीच निदान दोन खोल्या एवढय़ा जागेची गरज असते. शिवाय पक्का माल विक्री करण्यासाठी बाजारात दुकानाची किंवा रिकाम्या जागेची गरज असते. तरच धंदा चांगला करता येतो.  शहरात आम्हा लोकांकडे हक्काचे घर नाही, हक्काची जागा नाही. दरमहा तीन ते चार हजार रुपये भाडे देऊन एका खोलीत कुटुंबासह राहायचे व त्याच जागेत पक्का माल तयार करण्याचे काम करायचे अशी आमची अवस्था आहे. घराचे भाडे परवडत नाही म्हणून आमच्यापैकी बरेच जण कच्च्या घरात किंवा झोपडीत राहातात. त्यामुळे जेवढे करू शकतो त्यापेक्षा कमी काम होते. पक्का माल विक्रीसाठी आम्ही रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसतो. नगरपालिकांतर्फे किंवा पोलिसांकडून आम्हाला वारंवार उठविणे, आमचा माल जप्त करणे वगैरे घटनांना नेहमीच तोंड द्यावे लागते. जागेअभावी पावसाळ्यात माल भिजून नुकसान होते, काम वाढते. शिवाय केवळ एक महिला करू शकेल असा हा व्यवसाय नाही. घरचे इतर लोकही यात गुंतलेले असतात. बाजारातले दुकानदार त्यांच्या दुकानापुढे आम्हाला माल विक्रीसाठी बसू देत नाहीत. दुरुस्त व स्वच्छ केलेले जुने कपडे खरेदी करणारे आमचे गिऱ्हाईक मुळात गरीब लोकच असतात. त्यामुळे कष्टाच्या मानाने फायदा कमी असा हा आमचा व्यवसाय आहे. गेल्या तीस वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत, पण रस्त्यावरच आहोत. बेघरपणा व भूमिहीनता कमी झालेली नाही. स्वकष्टावर जिवंत राहू शकतो, पण विकास होत नाही अशी आमची परिस्थिती आहे.’’ असा आपला अनुभव व विचार प्रकट करत होत्या जळगाव शहरातल्या दानाबाजार येथे जुन्या कपडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या ‘काशी कापडी’ या भटक्या जमातीच्या चंद्रकलाबाई लोणकरकर, राधाबाई गंगारे, शोभाबाई वाडेकर, पर्वताबाई लोणकरकर, अनिता तेलकर, मंगलाबाई गंगारे, कलाबाई लोणकरकर.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

काशी कापडी या भटक्या जमातीला अनेक वर्षांचा जुना इतिहास आहे. मुळातली ही जमात आंध्र प्रदेशातली आहे. खास करून हैदराबाद आणि वरंगल या शहरांच्या भोवतीच्या ग्रामीण प्रदेशातील ही जमात होय. या जमातीची मातृभाषा तेलगू आहे. त्या काळी या जमातीतील महिला डोक्यावरच्या टोपलीत दातवन, फणी, मणी, सागरगोटय़ा, कवडय़ा आदी वस्तू घेऊन घरोघर फिरायच्या आणि त्या वस्तूंच्या मोबदल्यात अन्न आणि धान्य स्वीकारायच्या. पुरुष खेडोपाडी जाऊन रामलीला सादर करून लोकांचे मनोरंजन करत असत. यासाठी त्यांना लोकांकडून अन्नधान्य, कपडे आणि काही प्रमाणात पैसेही मिळत. काही पुरुष देवळात राहून परिसर स्वच्छ ठेवणे, देवाच्या पूजाअर्चेच्या तयारीसाठी पुरोहितांना मदत करण्याचे कामही करत असत. या मोबदल्यात त्यांना देवळात भाविकांनी दानरूपाने दिलेल्या अन्नधान्य, कपडे व फळफळावळ यातला काही वाटा पुरोहिताच्या मर्जीनुसार दिला जायचा. म्हणून यांना तिथे ‘दासरोलू’ (सेवकजन) असेही संबोधले जायचे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आंध्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे, न मिटणाऱ्या भुकेने या ‘दासरोलू’ना गटागटाने महाराष्ट्रात ढकलले ते तीर्थक्षेत्राचे यात्रेकरू या रूपात. काही नेवासे या तीर्थस्थानी, काही पंढरपूर येथे, तर काही नाशिक येथे स्थिर झाले. व्यवसायाचा शोध घेताना त्यांनी सामाजिक गरजांचाही शोध घेतला. काशी या पवित्र तीर्थक्षेत्री वसलेले भगवान विश्वनाथांचा प्रसाद आणि तेथील गंगेचे पवित्र पाणी प्राशन करण्यास मिळाले तर सगळे आजार नष्ट होतात, माणूस पापमुक्त होतो व स्वर्गात जागा मिळते, अशी विश्वासपूर्ण लोकभावना होती. मात्र सामान्य जनास त्या काळी काशी यात्रा करणे सोयीचे व सोपे नव्हते. ती एक दिव्य यात्रा समजली जायची. लोकांची ही गरज भागविण्याचे लोकसेवेचे काम या ‘दासरोलू’ जमातीच्या लोकांनी स्वीकारले. भगवान विश्वनाथाचा प्रसाद आणि पवित्र गंगाजलाची कावड काशीहून आणून तो प्रसाद व ते गंगाजल गरजू लोकांना पुरवठा करण्याचे काम यांनी सुरू केले. म्हणून त्याना ‘काशी कावडी’ असे म्हटले जायचे. प्रसाद व गंगाजलवाटपप्रसंगी अंगात स्वच्छ व शुभ्र धोतर, गळ्यात जानवे, कपाळी अष्टगंध व खांद्यावर गंगाजलाची कावड असे त्यांचे सोवळे रूप असायचे. हे कावड घेऊन गावोगाव भटकायचे तेव्हा यांना खेडय़ापाडय़ांत सन्मानाने वागवले जायचे. या सेवेच्या मोबदल्यात ते अन्नधान्य, फळफळावळ, पैसा व कपडे स्वीकारीत असत. हेच त्यांचे उपजीविकेचे साधन बनले. वारंवार काशी यात्रा करणे शक्य नव्हते. वेळेवर लोकांची गरज तर भागवली पाहिजे, कारण त्यावर आपले पोट अवलंबून आहे. म्हणून या लोकांनी शक्कल लढवली. भोवतीच्या नदीच्या स्वच्छ पाण्यात रात्री थोडीशी तुरटी मिसळून ठेवायची. सकाळी ते गाळून घेतले की ते आणखी स्वच्छ दिसते आणि हेच पाणी गंगाजल म्हणून गरजू लोकांना पुरवायचे. श्रद्धाळू लोक भक्तिभावाने ते स्वीकारायचे आणि सढळ हस्ते शक्य त्या वस्तू यांना दान द्यायचे. यात या लोकांना जरुरीपेक्षा जास्त मिळालेल्या वस्तूंत कपडय़ांचे गाठोडे किंवा ढीग उठून दिसायचे. शिवाय यांनी गरजेपेक्षा जादा मिळालेले कपडे विकायला सुरुवात केली. या कारणाने मूळ नाव ‘काशी कावडी’चा अपभ्रंश ‘काशी कापडी’ असा झाला. आज तीच त्यांची जात/जमात ठरली. प्रवासाच्या साऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या आधुनिक काळात, पवित्र समजल्या जाणाऱ्या काशी, प्रयाग, हरिद्वार, हृषीकेश आदी तीर्थक्षेत्रांना भेट देऊन गंगास्नान व गंगाजलाचा लाभ घेणे आता पूर्वीसारखे दुर्लभ राहिलेले नाही. म्हणून काशी कापडी समाजाचा गंगाजलाचा हा व्यवसाय संपुष्टात आला.

नेवासे, पंढरपूर, नाशिक या तीर्थक्षेत्री स्थिर झालेल्या या लोकांनी आणखी एक नवा व्यवसाय शोधला, तो म्हणजे तुळशीच्या किंवा इतर योग्य त्या लाकडापासून मण्या व त्या मण्यांपासून माळा तयार करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय. अनेक लोक वैयक्तिक पातळीवर हा व्यवसाय करायचे. तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या या भाविकांकडून या माळांना चांगली मागणी मिळत गेल्याने काही काळ हा व्यवसाय किफायतशीर ठरला, परंतु पुढे पुढे या व्यवसायात भांडवली गुंतवणूक आणि स्वयंचलित यंत्रे घुसली तेव्हा स्पर्धेत हे लोक फारच कमजोर ठरल्याने हा व्यवसाय त्यांच्या हातून निसटला. शेवटी जुन्या कपडय़ाच्या व्यवसायाला पर्याय उरला नाही.

मुलाबाळांच्या काळजीबरोबर प्रपंचाचा सारा गाडा सांभाळून, जुन्या कपडय़ांचा व्यवसाय पूर्वीपासून महिलाच सांभाळत आल्या आहेत. प्रापंचिक कार्यात आणि इतर सर्व घडामोडींत पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग असतो, किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त सहभाग असतो. बहुतांशी आर्थिक व्यवहार स्त्रियांच्या हातात असल्याने आर्थिकदृष्टय़ा हा स्त्रीप्रधान समाज आहे असे म्हणता येईल; परंतु सामाजिकदृष्टय़ा मात्र स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. जात पंचायतीत स्त्रियांना स्थान नाही. स्त्रियांनी सासर व माहेर या दोन्ही घराण्यांच्या प्रतिष्ठेसाठी सोसले- भोगले पाहिजे असा जमातीतला सामान्य विचार आहे. म्हणून घटस्फोटाची मागणी महिलांकडून होणे समाजमनाला मान्य न होणारी गोष्ट आहे. म्हणूनच की काय, जात पंचायत पोटगीच्या दाव्यावर विचार करत नाही. तो विषय आपल्या अधिकाराबाहेरचा आहे असे समजते. पोटगीबद्दल स्त्रीचा आग्रह असेलच, तर तिला कायदेशीर न्यायालयात जावे लागते. पुरुष मात्र घटस्फोट मागू शकतो. त्याच्या मागणीचा जात पंचायतीत विचार होतो. अनारोग्य, मूल न होणे, उद्धट वर्तणूक, आळशीपणा, असहकार्याची भूमिका आदींपैकी कारण देऊन पुरुष घटस्फोट मागू शकतो. जात पंचायत त्यावर विचारविनिमय करते. या जमातीत एकूणच घटस्फोटाचे प्रमाण फार कमी आहे. कुटुंबात मुलामुलीत भेदभाव करण्याची भूमिका वरचेवर कमी होत असली तरी अजून बऱ्याच प्रमाणात कायम आहे. सामान्यपणे जमातीच्या शैक्षणिक परिस्थितीचे निरीक्षण करता मुलांच्या शिक्षणावर जोर दिला जातो तेवढा जोर मुलींच्या शिक्षणावर दिला जात नाही असे स्पष्ट होते. जमातीला आंतरजातीय विवाह मान्य नाहीत.

सध्या जमातीत वरदक्षिणा किंवा वधूदक्षिणा देण्याची पद्धत नाही. लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी वाटून घेतला जातो. लग्न हिंदू धर्मपद्धतीने केले जाते. पितृप्रधान समाजव्यवस्था असून पितृवंशीय लोक आहेत. महिलांची राहणी सामान्य महाराष्ट्रीय मराठी महिलांसारखीच आहे. त्यांना वेगळे ओळखता येत नाही. बहुतेक महिला सहावारी साडी नेसतात.

‘भटकी जमात’ या नात्याने शासकीय सोयीसवलतींचा लाभ घेण्यास पात्र असूनसुद्धा या जमातीचे लोक तो लाभ घेऊ  शकत नाहीत, कारण यांचा रहिवासी दाखला नाही, सरकारी दफ्तरात किंवा शाळेच्या दफ्तरात यांच्या वडीलधाऱ्यांची व त्यांच्या जातीची नोंद नाही आणि १९६० च्या आधीपासून महाराष्ट्रात राहात असल्याचा कागदोपत्री पुरावा नाही. म्हणून यांच्या मुलामुलींना जातीचा दाखला मिळत नाही. जळगाव शहरातील सुमारे ७० काशी कापडी मुलामुलींना गेल्या पाच वर्षांपासून याच कारणाने जातीचे दाखले मिळत नव्हते. ‘अखिल भारतीय काशी कापडी समाज युवा मंचच्या’ सातत्यपूर्ण प्रयत्नातून सारी अडचण जेव्हा वरिष्ठांच्या व जिल्हाप्रमुखांच्या कानावर घातली गेली तेव्हा त्यांच्याकडून तातडीने व सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून आठ दिवसांपूर्वीच त्या सर्वाना जातीचे दाखले देण्यात आले आहेत; पण महाराष्ट्रात सर्वदूर असे घडताना दिसत नाही. सध्या पंढरपूर, नाशिक, नेवासे, पुणे, मुंबई, जुन्नर, संगमनेर, सोलापूर, इगतपुरी, अहमदनगर, श्रीरामपूर, बारामती इ. भागांत मोठय़ा प्रमाणात स्थिरावलेला समाज मिळून महाराष्ट्रात या जमातीची लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे.

हा समाज रूढीप्रिय व अंधश्रद्ध असला तरी कष्टकरी व स्वाभिमानी आहे, इतरांच्या दु:खाबाबत संवेदनशील आहे. एक गोष्ट आनंददायी व आशा पल्लवित करणारी आहे ‘अखिल भारतीय काशी कापडी समाज’ आणि ‘अ.भा.का.का.स. युवा मंच’ अशा एकमेकांस पूरक असलेल्या दोन सामाजिक संघटना या जमातीत चालतात. अनेक कारणांनी शासकीय सोयीसवलतीचा आवश्यक तेवढा लाभ जमातीला मिळत नाही. या विषयावर चिंतन होते, उपायही शोधले जातात. शासकीय यंत्रणा हलत नाही म्हणून या संघटना रडगाणे गात बसत नाहीत. लोकांची अस्मिता जागवून, स्वबळावर, प्रसंगी काटकसर करून मुलामुलींना शाळेत घालण्याचा आग्रह प्रत्येक कुटुंबाला अनेक वर्षांपासून केला जात आहे. आज त्याचा दृश्य परिणाम असा दिसतो आहे की, जमातीतील आजच्या युवा पिढीतील ८० टक्क्यांपेक्षा जास्त मुलेमुली सुशिक्षित झालेली आहेत. इतर भटक्या जमातींच्या मानाने हे प्रमाण फार मोठे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना प्राधान्य, जात पंचायतीत सुधारणा, स्पर्धेत भाग घेण्याची युवक-युवतींची क्षमतावृद्धी, माहिती केंद्र आदी विषयांवर संघटनात्मक कार्य करण्यात समाजातले ज्येष्ठ रमेश कुंदूर, संजय भिंगारे, बंडुआण्णा आंदेकर, विलास वाडेकर, जोती बद्दूरकर, गीता कुंदूर, अतुल भिंगारे सातत्याने कार्यरत आहेत.

– अ‍ॅड.पल्लवी रेणके
pallavi.renke@gmail.com