धार्मिक हेतूने वेगवेगळ्या मंदिरांना भेट देणं हा अनेकांचा नित्याचा कार्यक्रम. पण आम्हाला स्थापत्य कलेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ठिकठिकाणची मंदिरं तर बघायची होतीच शिवाय जास्तीत जास्त बाइक राइड करण्याची आमची हौसही भागवून घ्यायची होती.

तशी तब्बल वीस दिवसांची पदरात पाडून घेतली होती. एक जंगी बाइक राइड करण्याचा प्लान शिजला. किमान हजार किलोमीटर तरी राइड करायचीच या दृष्टीने मी आणि धृ्रवने प्लान आखायला सुरुवात केली. आम्हा दोघांचाही कॉमन इंटरेस्ट म्हणजे जुनी मंदिरे, त्यांची बांधणी, मूर्ती धुंडाळीत जमेल तसे त्यांचे कोडे उलगडत बसणे. या महत्त्वाकांक्षी आणि ऑफबीट राइड प्लानसाठी बाइक्सचे सव्‍‌र्हिसिंग, हेल्मेट्स, राइडिंग जॅकेट्स, सॅडलबॅग, तंबू अशी तयारी आधीच करून ठेवली होती.

ठाण्याहूनच सुरू होणारा प्लान आखला. पहिल्या दिवशी ठाणे-घोटी-अकोले सिद्धेश्वर आणि मुक्काम असा इरादा होता. ठाणे सोडायला संध्याकाळचे साडेचार झाले होते. म्हणजे आमचा आज सिद्धेश्वर मंदिर पाहून मुक्काम करण्याचा बेत फसला होता. अकोल्याच्या आधीच कुठेतरी मुक्काम ठोकावा असा विचार करतच ठाण्याच्या बाहेर पडलो. ठाणे-नाशिक रस्ता तसा चांगला असल्याने व्यवस्थित ८० किमी प्रतितासाच्या वेगाने कूच करता येत होते. घोटीत पोचता-पोचता नारायणराव टाटा म्हणाले आणि हायवेवर असतानाच आकाशात संध्याकाळचा लालिमा पसरला. घोटी नाक्यावर थोडा वेळ चहाब्रेक घेऊन आम्ही घाट चढायला सुरुवात केली. रात्र पडल्याने अंधारात हेडलाइटच्या प्रकाशात सावधानतेने घाटांच्या वळणांशी लगट करत आम्ही बारीला पोचलो. भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरलाच तंबू लावावा असे ठरवले. त्यानुसार साडेआठच्या सुमारास शेंडीला पोचलो. रात्री अंधारात जेवणाची सोय शोधली, अर्थातच कोंबडी सोबत होती, पण ती ताटात. जेवण झाल्यावर मुक्कामाची जागा नक्की करून सामान सोडले. अर्धा पाऊण तास फिरून जलाशयाच्या काठावर ताणून दिली.

सकाळी पक्ष्यांच्या आवाजानेच जाग आली. जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर सूर्योदय आणि सकाळचा लालिमा नभी पसरला होता. आजचा टप्पाही तसा मोठाच होता. अकोले, ताहाकारी, सिन्नर एवढे सगळे पाहून कोपरगावशेजारील कोकमठाण इथे पोचायचे होते. आमचा फक्त बाइक चालवण्याचा निर्धार आणि अनोळखी गाव म्हणजे मुक्कामाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सूर्यास्तापूर्वीच पोचणे आवश्यक होते. ‘शंभो’ची गोळी घेऊन तोंडं खंगाळून निघालो. शेंडी गावातल्या एसटी स्टॅण्डजवळील प्रसिद्ध गवती चहा घेऊन बाइकला टांग मारली. पुढील टप्पा होता अकोले, अहमदनगर जिल्ह्य़ातील तालुक्याचे एक गाव.

शेंडी-राजूर-अकोले असा वळणावळणांचा दुतर्फा सुबत्ता असलेल्या उसाच्या शेतांच्यामधून जाणारा घाटदार रस्ता आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरू झालेली लगबग. रानातून घुमणारे मोरांचे आवाज, सोनकोवळ्या उन्हाला बसलेली गावकरी मंडळी, आसपासच्या गोठय़ांमधून चाललेली धारा काढण्याची लगबग, घराबाहेरील चुलींमधून उठणारी धुराची वलये, गावच्या कट्टय़ावर दूधगाडीची वाट पाहत बसलेली मंडळी, त्यांचे अ‍ॅल्युमिनिअमचे आणि काही शेंदरी रंगाचे प्लास्टिकचे कॅन, राखुंडीने दात घासत बसलेली पोरंसोरं, असं सारं दृश्य डोळ्यांत साठवत आमच्या बाईक्स रस्ता कापत अकोल्याच्या दिशेने दौडत होत्या. त्यात आमचे रायडिंगचे पेहराव पाहून माना वळवून पाहणारे गावकरी आरशात दिसत होते. अकोल्यात पोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले असतील. नाश्त्याचा बेत थोडा पुढे ढकलत आधी सिद्धेश्वराचे मंदिर पाहण्याचा निर्णय झाला.

सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास विशेष सायास पडले नाहीत. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ  शकते. गाडय़ा नीट पार्क करून ठेवल्या. पुजारी आणि दर्शनाला आलेल्या भक्तगणांशी गप्पा मारून मंदिरात कुठे आणि काय काय आहे त्याची माहिती जाणून घेतली. मंदिर कुठेही ऑइलपेंटने न रंगवता आणि कॉंक्रीटचे आधार न लावता नीट जपले होते. मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू होता आणि सभामंडप कुलूप लावून बंद केला होता. खिडक्यांमधून डोकावले असता तिथे मोठा शिल्पखजिना आहे ते जाणवत होते. त्यामुळे काहीही करून कुलूप उघडून आत जायला मिळाले पाहिजेच, असे मनाशी ठरवले. मंदिराच्या पुजाऱ्याकडे चावी असते आणि ती कुणाच्या तरी शिफारशीवर मिळेल, अशी माहिती समजली. एक जरा गावात वजन आहे असे वाटणारी व्यक्ती दिसलीच. रासने मामा. त्यांना आमच्या दौऱ्याचा कार्यक्रम थोडक्यात सांगितला, आणि सभामंडपाच्या चावीचा विषय काढला. त्यांनीही तत्काळ पुजाऱ्याला कुलूप उघडून देण्यास सांगितले. आमच्यासोबत पुन्हा नव्या नजरेने सभामंडप पाहिला. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्य़भागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच तिथे दिसत होता. रासने मामांनी बोलता बोलता गावातील आणखी एका पुरातन गंगाधरेश्वर मंदिराचा उल्लेख केला. अधिक माहिती विचारून घेतली आणि त्यांनाच आम्हाला तिथे सोडण्याची गळ घातली. रासने मामा आम्हाला तिथे घेऊन गेले. गावातल्या अगदी लहानशा गल्लीत घरासारखा दिसेल असा दरवाजा असलेले मंदिर असले तरी आतमध्ये मात्र प्रशस्त होते. पुण्यातील पोतनीस कुटुंबाच्या खासगी मालकीचे असलेले हे मंदिर म्हणजे साधारण पेशवाईत बांधलेले आहे. अतिशय सुबक शिवलिंग, सभामंडप, गणेशमूर्ती, कमलदल कोरलेले खांब, प्राचीन काचेची झुंबरे, फरसबंदी प्रशस्त आवार यामुळे हे मंदिर अगदीच चुकवू नये असे.

गंगाधरेश्वरानंतर आता वेध लागले होते क्षुधेश्वराचे. त्यामुळे तडक मोर्चा अगस्ती कॉलेजसमोरच्या चौधरी मामांच्या ‘हाटेला’कडे वळवला. तिथे र्तीबाज मिसळपाव, डिसेंबराच्या थंडीत घाम काढणारा रस्सावडा असं चापले, वरून चहाचा तडका लावला. पुढचा टप्पा होता ताहाकारी जगदंबा मंदिर. देवठाणमार्गे ताहाकारीला जाणारा रस्ता तसा थोडा खराबच होता. देवठाण-सावरगावपाटच्या दरम्यान डावीकडे एक सुंदर जलाशय दिसला. हिवाळ्यात सोनेरी झालेली गवताळ कुरणे, काढणीला तयार असलेल्या गव्हाची शेते आणि त्यांच्या पलीकडे निळाशार जलाशय डोळे निववत होता. त्या जलाशयापासून वीसच मिनिटांवर ताहाकारी समोर दिसू लागले. मंदिर मोठे सुरेख. या मेगाराईडसाठी ध्रुवने जागाच अशा शोधून काढल्या होत्या की हरएक मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटावे. पण या मंदिरात मात्र तथाकथित जीर्णोद्धाराच्या नावाखाली गावातल्या प्रगतिशील (?) कारभाऱ्यांनी काँक्रीटचे खांब आणि वरून तसलेच घुमट उभारले होते. त्यामुळे गावात शिरताना ‘आढळा’ नदीच्या अलीकडून पाहूनही हीच ती मंदिरे अशी खात्री पटत नव्हती. आधी थंड पाण्याने शिणवटा घालवला आणि मंदिरात प्रवेशते झालो. मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले होते.

रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला म्हणून दंडकारण्याचा परिसर ओळखला जातो. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण चिऱ्यांनी बांधलेले आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिराला ७२ दगडी खांब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर जगदंबा मातेच्या उभ्या मूर्तीचे दर्शन घडते. मूर्ती संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मूर्तीला १८ हात आहेत आणि या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मूर्तीचे वैशिष्टय़ असे की, जगदंबा वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मूर्तीच्या पुढे तांदळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूस-पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मूर्ती आहेत. हे मंदिर यादवकालीन असल्याचे म्हटले जाते. एका ब्रिटिश छायाचित्रकाराने (हेन्री कौन्से) इ.स. १८८० मध्ये काढलेले मंदिराचे छायाचित्र संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंदिराचा मूळ कळस तोडून पाच नवीन कळस बांधल्याचे दिसते.

सभामंडपाच्या छताचा मी आजवर पाहिलेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरूपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेलं छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेलं आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. आजही उत्तम अवस्थेत आहे. सभामंडपाच्या बाह्य़भागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून मंदिरसमूहाच्या बाह्य़भिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली होती. कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची काँक्रीटची बेढब शिखरे चढवली गेली. मंदिराच्या भागातले ऑइलपेंटचे रंगकाम पदोपदी दाताखाली मिठाचा खडा चावला जावा असे नजरेत खुपते. परंतु सध्या पुरातत्त्व खात्याने मंदिर ताब्यात घेतल्याने पुढील काँक्रीटीकरण थांबले आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू समजायची.

ताहाकारीचे हे मंदिर पाहून आम्हाला पुढे पोचायचे होते सिन्नरला. प्रसिद्ध शिवपंचायतन बघायला. ताहाकारी-ठाणगाव-आशापूर-दुबेरे खिंड आणि सिन्नर हा रस्ता छान होता. बाइक्स पळवायला मज्जा आली. दुबेरे खिंडीत दुतर्फा वनविभागाने वृक्षारोपण केल्याने राइड एकदम सुसह्य़ झाली. पुढे दुबेरेच्या जवळच्या घाटात पाणी-ब्रेक आणि फोटोब्रेक घेऊन गाडय़ा बुंगवत आम्ही सिन्नरमध्ये पोचलो. हायवेवर वडापाव आणि चहा रिचवून आम्ही गोंदेश्वर मंदिर शोधण्याच्या कामी लागलो. मुख्य सिन्नर गावात पंचायत समिती ऑफिसजवळून एक रस्ता आतमध्ये दोनशे मीटरवर मंदिर आहे. दाराशीच गाडय़ा लावून ते मंदिर पाहावयास निघालो. एवढे भव्य मंदिर मी प्रथमच पाहत होतो.

गोंदेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य सप्तस्तरीय (म्हणजे सात वेगवेगळ्या थरांमध्ये असलेली रचना) मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. या मंदिराची रचना भूमिज शैलीत केलेली आहे. म्हणजेच मुख्य शिखराच्याच आकाराची लहान लहान शिखरे एकावर एक अशी रचना करत मंदिराचे शिखर बनवले जाते. मुख्य शिखर आणि त्याचे घटक असलेली उपशिखरे यांतील साम्य अतिशय लक्षवेधक असते. या रचनेलाच शिखर-शिखरी रचना असेही म्हणतात. सभामंडपातील खांब नक्षीने शिल्पालंकृत असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरात देखभालीचे काम चालू असल्याने तिथे वाळू-सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याचा राडा पडला होता. त्यामुळे आम्हाला ते व्यवस्थित पाहता आले नाही. आता खास त्यासाठी सिन्नरची वारी होईलच.

आता सिन्नर-कोपरगाव रस्त्याने निघालो. पाथरे गावाशी जिथे शिर्डी आणि पुण्याहून येणारे रस्ते एकत्र येतात तिथे बरीच हॉटेल्स दिसली. जरा बऱ्या दिसणाऱ्या हॉटेलवजा टपरीवर थांबून वडापाव पोटात ढकलून कोपरगावच्या दिशेने दौड मारली. कोपरगाव हे मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार. तिथूनच पुढे मराठवाडा आणि विदर्भात रस्ते जातात. गोदावरी नदीच्या तीराशी असलेले कोकमठाणचे शिवमंदिर हे कोपरगावपासून साधारण १३ किलोमीटरवर आहे. संध्याकाळ होत आल्याने आधी मंदिर गाठून मुक्कामाची सोय लावणे आणि मगच रात्रीच्या जेवणाकडे पाहणे असे ठरले. मंदिर परिसरात पोहोचलो तेव्हा किमान चाळीस जणांचा एक ग्रुप मंदिराच्या परिसरात ‘साइटसीइंग’ करीत होता. त्यामुळे आम्ही ते लोक जाईपर्यंत आवारातच बसकण मांडली. आवार तसे फरसबंदी. तंबू लावायला अत्यंत योग्य. म्हणून जागा हेरून ठेवली आणि त्या मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या संजय नावाच्या तरुणाला तशी कल्पना दिली. त्याने बाहेर नका झोपू, रात्री फार थंडी पडेल असा सल्ला दिला. आमचे तंबू आणि स्लीपिंग बॅग पुरतील असे सांगूनही शेवटी तो म्हणाला, जास्त थंडी वाजली तर दार उघडून मंदिरात जाऊन झोपा, मी कुलूप न लावता फक्त कडी घालून जाईन. बहुधा त्याला तिथल्या थंडीबद्दल जरा जास्तच खात्री होती.

अंधार पडला आणि आमच्या पोटात थंडी जरा जास्त थरथरू लागली. म्हणजेच आम्हाला भूक लागल्याचा साक्षात्कार घडला. खाण्याची बाब असल्याने एकमताचा प्रश्नच नव्हता. आसपास चौकशी करता असे समजले की, शिर्डी रोडवर स्वस्तिक पॅलेस नावाचे चांगले हॉटेल आहे. सॅडलबॅग गाडीलाच होत्या. तशाच मोटरसायकल पंधरा किलोमीटरवरच्या स्वस्तिककडे दामटल्या. त्या छोटय़ाशा प्रवासातही थंडीने आपले रंग दाखवले आणि मंदिरात झोपण्याबाबत आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले.

त्या रात्री स्वस्तिक पॅलेसमध्ये प्रत्येकी दोन कडक कॉफी, प्रत्येकी तीन-तीन रोटय़ा आणि काही तरी व्हेज भाज्या (व्हेज असल्याने आठवण्याचा संबंधच नाही) एवढे(च) खाल्ले. आमचे जेवण संपत आले तेव्हा सगळेच वेटर प्रत्येक टेबलवर पांढऱ्या रंगाची घमेली नेऊन ठेवताना दिसत होते. आणि चारेक लोक एक घमेले तोडून खात होते. त्याने आमचे कुतूहल चाळवले. वेटरला विचारता ती या हॉटेलची स्पेशालिटी रुमाली खाकरा असल्याची माहिती मिळाली आणि तद्सोबत वेटरला आधी न सांगितल्याबद्दल मनातून चार शिव्या. तर ते असो, त्या घमेल्यांसाठी कोपरगावला पुन्हा जावे लागणार.

बाहेर तद्दन भिकार क्वालिटीचे मघई पान रवंथ करताना स्वस्तिक हा पॅलेस निवासाचीही व्यवस्था करत असल्याचे वाचले आणि बाहेर जेवण झाल्यावर वाजणारी थंडी पाहून पुन्हा आमच्या दोघांच्याही मनात वेगवेगळे एकमत झाले आणि एकमेकांना स्माइल दिले. पुढच्या पाचव्या मिनिटाला आम्ही अतिशय किफायती असे डील ठरवून खोलीत तंगडय़ा वर करून टीव्हीसमोर लोळत पडलो होतो. दोन दिवस अंघोळ मिळाली नव्हती. त्याची खरं तर अजिबातच खंत नव्हती, पण उगाचच एकमेकांना त्रास नको म्हणून रात्री गरम पाणी आणि तेही शॉवरमधून उपलब्ध झाल्याने मस्त कडकडीत पाण्याने स्नान उरकून घेतले. ते झाल्यावर अंग असे काही मोकळे झाले की विचारायची सोय नाही. जी काही सुरेख झोप लागली ती एकदम सकाळीच जाग आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होते. सकाळी मंदिरापाशी पोचल्याबरोबर संजय कुठून तरी आला आणि काल रात्री न आल्याबद्दल चौकशी केली. रात्री बराच वेळ आमची वाट पाहिल्याचेही त्याने नमूद केले. त्याची माफी मागून त्याच्यासोबतच मंदिर पाहावयास सुरुवात केली. आम्ही मंदिर पाहत असताना त्याने मंदिराची आणि परिसराची झाडलोट केली, शिवलिंग पाण्याने धुऊन काढले आणि सुंदर ताज्या फुलांनी त्याची पूजा बांधली. छानसा अगरबत्तीचा दरवळ मंदिरात पसरला होता आणि आम्ही त्या वातावरणात तिथली शिल्पे निरखीत होतो. ताहाकारीच्या मंदिरासारखे या मंदिराचे छतही दगडात कोरलेल्या देठाला लगडलेल्या फुलांच्या आकाराच्या झुंबरांनी अलंकृत आहे. मंदिर भूमिजशैलीत बांधले असून शिखर विटांमध्ये रचलेले आहे. मुख्य सभामंडप, त्याला तीन दरवाजे आणि त्याच्या पुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गोदावरी नदीच्या अगदी तीरावरच असल्याने एखाद्या मोठय़ा पुराचा फटका बसला असावा, असे त्या परिसरातील लहान भग्न मंदिरे पाहून जाणवते. या मंदिराच्या मूळ बांधणीनंतर पडझड झालेली आणि त्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, याचे कारण म्हणजे मूळ दगडी मंदिरावर असलेले चुना आणि खडी यांचे मिश्रण असलेले बांधकाम. ते साधारण दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे असावे. पण त्या प्रयत्नांतही मूळ मंदिराचे सौंदर्य कायम राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आजच्या काळातील राज्यकर्त्यांना अशी सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना त्या शंभूमहादेवाजवळ करून आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला.

(अवांतर : या कोकमठाण गावाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दरवर्षी अक्षयतृतीयेला गोदावरीच्या पलीकडील संवत्सर नावाच्या गावाला शिव्या देण्याचा आणि गोफणीने दगडफेक करण्याचा रिवाज. या दिवशी दोन्ही तीरांवर त्या त्या गावांतील युवक एकत्र येऊन एकमेकांना यथेच्छ शिव्या देतात, एकमेकांवर दगडफेक करतात. दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच मुख्यत्वे भावना असते. नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून पाच दिवस दररोज सायंकाळी चार वाजता सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. हे युद्ध केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात होती. अलीकडच्या काळात दोन्ही गावांतील समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन ही शिव्यांची प्रथा अगदी उपचारापुरती सीमित केली असून गोफणगुंडा युद्ध पूर्णपणे बंद करवले आहे. व्हिडीओ –

तर आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला. आता कोपरगाव-वैजापूर-लासूर मार्गे औरंगाबादला पोचावयाचे होते. आम्ही आता मराठवाडय़ात प्रवेश केला होता. सकाळी थोडे ऊन सुसह्य़ होते. मिळेल तिथे आणि मिळेल ते आम्ही खात होतो, परंतु साऊथ इंडियन कुठेच मिळाले नाही. कोपरगाव सोडल्यापासून पुढे तर फक्त पाववडा (बेसन पिठात बुडवून तळलेला पाव) आणि कुठेतरी कळकट मिसळ एवढे सोडले तर काहीच उपलब्ध नव्हते. खूप तेलकट आणि बेसन खाऊन त्रास होऊ  नये म्हणून आम्ही चहा आणि बिस्किटांवर वेळा मारून नेत होतो. त्यात तशा आमच्या दोघांच्याही गाडय़ा नवीन असल्याने आणि ही मॉडेल्स या भागात जास्त पोचली नसल्याने प्रत्येक ब्रेकला आमच्या बाईक्सभोवती बघ्यांचे कोंडाळे तयार होई आणि उगाचच हे बटन दाब, तो दांडा ओढून बघ, गियरच टाकून बघ, गाडीवरच बस असले उद्योग केले जात. त्यात आमच्या सॅडलबॅगही गाडीलाच बांधलेल्या असत. त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात निर्मनुष्य चौक शोधून टपरी गाठायचो आणि तिथे खायला काही तयार नसे. ते तयार होईपर्यंत गाडय़ांभोवतीच्या गर्दीवर वॉच ठेवणे हाच एककलमी कार्यक्रम असे. हा रस्ता म्हणजे जीवघेणा होता. आमच्या बाजूचा औरंगाबादच्या दिशेने जाणारा अर्धा रस्ता चांगल्या गुळगुळीत अवस्थेत आणि अर्धा खडीकरण केलेला. त्यामुळे समोरून येणारी जड वाहनेही आणि कारदेखील आमच्याच लेनमधून भरधाव चालत. समोरून आलेली वाहने चुकवण्यासाठी रस्ता सोडून शोल्डरवरून शिताफीने बाईक खाली घेऊन साइडपट्टीवरून घ्यावी लागे. हे करण्यात थोडी जरी कुचराई झाली तरी समोरची गाडी बेफिकीरपणे आम्हाला घेऊन गेली असती. साधारण दुपारच्या सुमारास आम्ही डावीकडे दौलताबाद पाहत पाहत औरंगाबादेत प्रवेश केला. अडीच दिवसांत साडेसहाशे किलोमीटर प्रवास झालेला असल्याने माझ्या बाईकलाही भूक लागली होती. तिला भरपेट (टॅंकभर) खाऊ  घातले आणि ध्रुवच्या आतेबहिणीच्या घरी पोचलो. आम्ही आता दोन दिवस तिथे मुक्काम टाकून बेसकँप करणार होतो आणि औरंगाबाद-सिल्लोड-अन्वा आणि औरंगाबाद-लोणार असे दोन लॅप्स मारणार होतो.

काय करावे? आज जावे की नाही? आराम करावा का? असा विचार सुरू होता. जवळपास अर्धा दिवस शिल्लक होता आणि औरंगाबाद-अन्वा हे अंतर अंदाजे शंभर किलोमीटर होते. त्यात ते अजिंठा रोडवर असल्याने ती गर्दीही रस्त्यात असणार. तरीही थकलेल्या शरीराला फ्रेश करून पुनश्च घोडय़ावर बसवून आम्ही अन्वाच्या दिशेने निघालो. वाटेत औरंगाबाद शहराच्या बाहेर पडता पडता पोटपूजा उरकून घेतली. आता मराठवाडय़ाचे ऊन चांगलंच जाणवत होतं. फुलंब्री-सिल्लोड बायपास असे करत आम्ही गोळेगावनंतर अन्वा फाटय़ाला उजवीकडे वळालो. फाटय़ापासून अन्वा गाव अंदाजे दहा किलोमीटर. पण तसल्या रस्त्यावरून ते अंतर काटायला आम्हाला अर्धा तास लागला. गावात पोचलो तेव्हा मंदिर कुठे दिसेना. गावात अनेक चौकशा करत गल्लीबोळ-पेठा पार करून एकदाचे आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोचलो. मंदिराच्या अंगाखांद्यावर गावातली पोरं खेळत होती. त्या मंदिराचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. एकून मीटर-दीड मीटर उंचीच्या पीठावर आयताकृती सभामंडप आणि ५० खांबांनी तोलून धरलेले घुमटाकार छत. एवढे जटिल शिल्पकाम असलेले हे आमच्या ट्रिपमध्ये पाहिलेले दुसरे मंदिर (याआधी सिद्धेश्वर मंदिराचे खांब असे अतिशय जटिल (intricate) शिल्पांनी नटवले होते.) जरी हे मंदिर वैष्णव देवतांसाठीचे बनवले असले, तरी कालौघात त्यात बदल होऊन सद्य:स्थितीत तिथे शिवलिंग आहे. मंदिरात असलेली सारी शिल्पे विष्णुरूपातीलच आहेत. हे मंदिर पाहून आम्ही गोळेगावला परत आलो तेव्हा तिथल्या एका हातगाडीवर अंडाभजी नावाचा एक भारी पदार्थाचा शोध लागला. एका प्लेटमध्ये तीन उकडलेली अंडी अर्धी कापून बेसन पिठात बुडवून तळलेली. एकुणात पोटभरीचा आणि पौष्टिक नमुना. अशा दोन प्लेट आणि वर दोन अंडाभुर्जी-पाव असे हलकेच (?) खाऊन आम्ही औरंगाबादला परतीचा रस्ता धरला. सिल्लोडला पोचता पोचताच अंधार पडला आणि पुढील सिल्लोड-औरंगाबाद हा परतीचा प्रवास सिंगल लेन रोडने समोरून येणाऱ्या गाडय़ांच्या हेडलाइटचे बाण आमच्या डोळ्यांत खुपसून घेत, ट्राफिकच्या गर्दीतून मार्ग काढत काढत कसाबसा पूर्ण केला.

औरंगाबाद बेस कँपला (म्हणजे घरी) पोचलो तेव्हा मुस्तफाची खास मटण दम बिर्याणी आमची वाट पाहत होती. कडक पाण्याने अंघोळ केल्यानंतर बिर्याणीचा फडशा पाडला. अभू (म्हणजे ध्रुवचा भाऊ) सोबत रात्री गप्पा मारत मारत, त्याच्या अल्टोतून केलेल्या रेड-दि-हिमालयच्या आणि इतर ड्राइव्हच्या गोष्टी ऐकत मध्यरात्र कधी सरली समजलेच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजले होते. आजचा प्लान लोणारचा होता. तसा बराच लांबचा टप्पा. अंतरापेक्षा जास्त टेन्शन रस्त्याच्या क्वालिटीचे. जालन्यापर्यंत चार लेन्सचा, दुभाजक असलेला सुंदर रस्ता आणि त्यानंतर नसलेला रस्ता सिंदखेडराजापर्यंत. पुढे परत दोन लेनचा समोरून अंगावर वाहने येणारा रस्ता. जालन्यात पोचताना बायपास घेण्यास चुकला आणि आम्ही जरा लांबचा साऱ्या जालना शहराला वळसा घालून सिंदखेडराजाच्या दिशेने निघालो. अतिशय वाईट चवीचा नाश्ता केला, तसाच अतिशय वाईट रस्ता पुढे सामोरा आला. दोन फुटावर दोन फूट खोल खड्डे, खडी, धूळ, अंगावर उलट येणारी वाहने. कधी एकदा असा रस्ता संपतोय असे झाले होते. त्यात उन्हानेही वैताग आला होता. कसेबसे सिंदखेडराजाला पोचलो, एक चहा मारून आम्ही लोणारच्या दिशेने सुटलो. हो हो. सुटलोच. कारण एकेरी रस्ता असला तरी जरा बरा होता. बाइक बुंगवता येत होत्या. लोणारच्या एसटी स्टँड आणि आजूबाजूची गर्दी चुकवत मधुसूदन मंदिराची चौकशी केली. अगदी गावात असलेले मंदिर, गल्लय़ांमधून वाट काढत एकदाचे आम्ही मंदिराशी पोचलो. मंदिर मात्र सुरेख होते. परिसर स्वच्छ ठेवलेला. प्रांगणात गरुडस्तंभाचे काही अवशेष पडले होते. मंदिरात कुणीच नव्हते, म्हणजेच एका अर्थी बरेच झाले. निवांतपणे आम्ही आमच्या पद्धतीने मंदिर पाहून घेतले. एक राऊंड मारून झाला आणी आता फोटो काढावेत असा विचार करत असताना एक आवाज आला.

एक्सक्युज मी! मी आता मंदिराबद्दल काही माहिती सांगणार आहे. तुम्हाला ऐकायचे असेल तर ऐकू शकता. औरंगाबादचा आनंद मिश्रा हा मराठी (होय मराठीच) पुरातत्त्व अभ्यासक त्याच्या मित्रांसाठी मंदिराची माहिती सांगणार होता. आमची मंदिर पाहण्याची पद्धत पाहून आम्हालाही त्याने सहभागी करून घेतले. पुढील दीड तास आम्ही त्याच्या तोंडून मंदिर, स्थापत्यशास्त्र, तेथील शिल्पे, अलंकार, मूर्तीचे विविध पैलू, भावभावना, शस्त्रे आदीसंदर्भात ज्ञानामृत प्राशन करत होतो.

लवणासूर नावाच्या दैत्याचा विष्णूने इथे वध केला म्हणून ओळखले जाणारे लोणारचे दैत्यसुदन मंदिर निजामाच्या राजवटीत धर्माध रझाकारांच्या विध्वंसापासून वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी एका प्रचंड मातीच्या टेकडीखाली गाडून टाकले होते, म्हणून तिथली शिल्पं सद्य:स्थितीत शिल्लक राहिली आहेत. परंतु या उपद्व्यापात मंदिराचे दगडी शिखर कोसळले. रझाकारानंतरच्या काळात त्याची डागडुजी करण्याचा जेव्हा घाट घातला गेला, तेव्हा उपलब्ध साहित्य (विटा आणि चुना), तत्कालीन स्थानिक (निजामाच्या राजवटीतील मराठवाडा) कौशल्य म्हणजे फक्त मशिदी बांधण्याचा अनुभव. म्हणून नंतरच्या विटांच्या बांधकामात दरवाजांवरून महिरपी आणि कमानी यांमध्ये मुस्लीम स्थापत्यशैलीची छाप दिसून येते. मंदिराच्या शिल्पांत तत्कालीन व्यापार, श्रद्धा आणि इराणी संस्कृतीशी असलेले आपले संबंध दिसून येतात. मंदिरातील दैत्यसुदन विष्णूची मूर्ती एका वेगळ्याच पाषाणाची बनवली असून, त्यात चुंबकीय गुणधर्म असलेल्या धातूचा अंश आढळून येतो. बोटांच्या साहाय्याने ती मूर्ती वाजवल्यास तिच्यातून घंटेप्रमाणे नाद घुमतो. गर्भगृहाबाहेरच्या खोलीच्या छतावर विजेरीच्या (टॉर्चच्या) उजेडात आपल्या पुराणकथा मूर्तिरूपात चित्रित केलेल्या दिसतात. या अप्रतिम मूर्तीमध्ये आपल्याला कंस-कृष्ण, नरसिंह-कश्यप, रासक्रीडा, लवणासूर वध अशा अनेक कथा पाहायला मिळतात. या मुख्य मंदिराच्या शेजारी ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवतांचे एक छोटे देऊळ आहे. या देवळातील प्राचीन महेशाची मूर्ती चोरीला गेल्याने, तिथे सध्या गरुडाची मूर्ती आहे.

हे मंदिर पाहता पाहताच दुपार झाल्याने ऊन बरेच चढले होते. लोणार सरोवराच्या परिघावर बरीच प्राचीन मंदिरे आहेत. पण वेळेअभावी आम्ही ती न पाहता परतण्याचा निर्णय घेतला. परतीच्या वाटेवर जालन्यात सकाळी हुकलेला बायपास शोधून घेतला. नंतर का घेतला याचा पश्चात्ताप केला. अख्खी बाइक गिळंकृत करतील असे मोठे खड्डे आणि त्यातून संध्याकाळच्या अंधारात वाट काढत आम्ही जालन्याच्या बाहेर हायवेवर चहा घेण्यासाठी टपरीवर थांबलो. तिथे दोन पोलीस उभे होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरात धार्मिक तणाव निर्माण करणारी काहीतरी घटना घडली होती आणि म्हणून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर जालना शहर सोडण्याचा सल्ला दिला. आम्हीही पटकन घोडय़ांना टाच मारून (म्हणजे गाडीला किक) तासाभरात औरंगाबादेत पोचलो.

चार-पाच दिवस राइड करून आम्ही खरे तर थकलो होतो. त्या रात्री औरंगाबादच्या तारा पानवाल्याच्या समोर उभे राहून ध्रुवने ओंकारला फोन करून अंतुर किल्लय़ाची माहितीही मिळवली. पण शरीराचे उसासे ऐकून मी अहमदनगरला गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि ध्रुव एकटा दुसऱ्या दिवशी जवळचा दौलताबाद किल्ला पाहून आला.

ध्रुव आणि माझ्यातले राइड को-ऑर्डिनेशन सुधरवणारी ही एकूण १५०० किलोमीटरची राइड बरेच काही देऊन गेली. फक्त नजरेने एकमेकांना संमती देणे, खाण्याच्या बाबतीत एकमत होणे, बाइकचे संगीत ऐकणे, वर्षअखेरीस एक मोठा ब्रेक मिळणे, दूरवर बाइकवर असतानादेखील कुटुंबाची आठवण येणे.. आणि असेच बरेच काही मिळाले. काही गोष्टी पाहण्याचे राहून गेले. त्यासाठी परत तेथे जाण्याचा योग घडवायचा असतो. कारण अपूर्णतेतच मजा असते.
पंकज झरेकर – response.lokprabha@expressindia.com