‘दुर्ग साहित्य संमेलन’ हा निव्वळ सोहळा नाहीतर ते एक जागरण आहे, समाजाचे आणि दुर्गाचे! अंधार आणि उपेक्षेत गेलेल्या या आमच्या गतवैभवाला, वारशाला उर्जितावस्था, नवा प्रकाश, नवी दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान सिंहगड पायथ्याशी होत असलेल्या पाचव्या दुर्गसाहित्य संमेलनाच्यानिमित्ताने.

दरवर्षी डिसेंबर महिना उजाडला, की राज्यभरातील दुर्गप्रेमींकडून विचारणा सुरू होते, ‘यंदाचे संमेलन कुठल्या किल्ल्यावर!’ हळुहळू संवाद वाढत जातो. संमेलनस्थळ असलेला दुर्ग ठरतो. त्याच्यावरचे किल्लेदार, गडकरी असलेले अध्यक्ष, स्वागताध्यक्ष ठरतात आणि ‘दुर्ग संमेलन’ वारीची तयारी सुरू होते. दुर्गवारक ऱ्यांची धावपळ सुरू होते. आयोजन, कार्यक्रम, दिशा, विषय, अभ्यासक, वक्ते, श्रोते सारे काही ठरत जाते आणि मग बरोबर ठरल्या दिवशी राज्यभरातून शेकडो दुर्ग वारकरी ठरल्या जागी छावणी करतात. तीन दिवस एका दुर्गाच्या सान्निध्यात, त्याच्या दाराअंगणात, त्याच्याशी हितगुज करत, त्याच्या अन्य भावंडांबद्दल चर्चा करण्यात हे दुर्गप्रेमी रंगून जातात. दुर्गाचे विविधांगी महत्त्व सादर होते; नवा विचार, संशोधन मांडले जाते; ज्ञान, माहिती, मार्गदर्शन आणि अनुभवांचे आदान-प्रदान होते; त्याच्या अस्तित्वाबद्दल काही कृती कार्यक्रम ठरतो आणि भविष्याच्या दिशा घेऊन मंडळी पुन्हा आपआपल्या गावी परततात. अगदी नांदेडजवळील कंधारपासून ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियापर्यंत! पुन्हा नव्या गडाची, नव्या दुर्ग संमेलनाची स्वप्ने रंगवत! ..गेल्या चार वर्षांचा हा अनुभव! इथे या दुर्गसंमेलनात येणाऱ्या प्रत्येकाचाच! यंदा देखील ही वारी अवतरली आहे, दुर्ग सिंहगडावर! २०, २१, २२ फेब्रुवारीचा मुहूर्त घेऊन!
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा प्रदेश! या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, स्थापत्य, कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान, पर्यावरण, संरक्षण, स्थानिक समाज आणि चालीरीती अशा विविध अंगांनी हे किल्ले गेली अनेक शतके आमच्या जीवनाशी जोडले गेलेले आहेत. यामुळे महाराष्ट्र धर्म, संस्कृती आणि त्याची जडणघडण यांचा ज्या-ज्या वेळी विचार होतो, त्या-त्या वेळी या गडकोटांची वाट चढावी लागते.
खरेतर जगभर जिथे-जिथे इतिहासाने आपल्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत, तिथे-तिथे किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रातही हे किल्ले मोठय़ा संख्येने आहेत. पण इथले त्यांचे अस्तित्व हे केवळ वास्तू-वास्तव यापुरते नाही, तर त्याला एक भावनिक वलयही आहे. हे वलय आहे, छत्रपती शिवरायांचे! त्यांनी इथला हा भूगोल, त्यांचे अंगभूत सामथ्र्य, त्यातील दुर्गमता आणि आक्रमकता याचा अतिशय योग्य उपयोग करत गडकोटांची साखळी निर्माण केली आणि या दुर्गाच्या आधारे पुढे स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या या गडकोटांना यामुळेच ऐतिहासिक स्मारकांच्याही पलीकडे एखाद्या धारातीर्थाचे महत्त्व आले.
गडांवर जाण्याची, ते पाहण्याची, त्यांच्याकडून स्फूर्ती घेण्याची संस्कृती आमच्याकडे यातूनच रुजली. अगदी स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांपासून ते आजच्या पदभ्रमण-गिर्यारोहण करणाऱ्या युवकांपर्यंत असा हा भला मोठा प्रवास आहे. मराठी मनाचे किल्ल्यांशी असलेल्या या अद्वैतातूनच शेकडो-हजारो लोक एखाद्या मंदिरी किंवा तीर्थक्षेत्री जावे तसे या गडकोटांवर सश्रद्ध भावनेने जात असतात. महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या गडकोटांचे समाजाशी असलेले हे ऋणानुबंध अधिक घट्ट, निकोप आणि मुख्य म्हणजे अभ्यासू, विधायक करण्याच्या हेतूनेच ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना झाली आहे.
गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे दुर्गप्रेम आणि अभ्यास साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. अभ्यासू, शोधक पण तितक्याच प्रेमळ नजरेने त्यांनी केलेले आणि अन्य लोकांना घडवलेले दुर्गदर्शन, त्यांचे किल्लेविषयक लेखन, उपक्रम या साऱ्यांनीच महाराष्ट्राला खरेतर दुर्ग पाहायला, वाचायला शिकवले. अशा या ‘गोनीदां’च्या नावाने सुरू झालेल्या या दुर्गप्रेमी मंडळामध्ये महाराष्ट्रभरातील दुर्ग अभ्यासक, निसर्ग अभ्यासक, इतिहास संशोधक, साहित्यिक, कलाकार आणि असंख्य असे निव्वळ दुर्गप्रेमी सहभागी झालेले आहेत. या मंडळाकडून अन्य उपक्रमांबरोबरच दरवर्षी एका दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रात दुर्ग पाहण्याची संस्कृती रुजून आता बरीच वष्रे लोटली आहेत. सुरुवातीच्या काळात इतिहास प्रेमाने, शिवकाळाने भारावून जात लोक या गडांवर जात होते. आज ही दोन मुख्य कारणे आहेतच, पण याशिवाय गिर्यारोहण-भटकंतीच्या ओढीने; इतिहास, भूगोल, पर्यावरणाच्या अभ्यासासाठी; व्यायामाच्या हेतूने, छायाचित्रण-चित्रकला आदी सर्जनशीलतेच्या ओढीने; तर कुणी तणावमुक्ती आणि मनशांतीसाठीदेखील या गडकोटांवर जात आहेत. दुर्ग आणि त्यांच्याभोवती वावरणाऱ्या याच संस्कृतीला एक व्यासपीठ मिळवून देणे, तिला पाठबळ देणे, दिशादर्शन करणे या हेतूने दुर्गसाहित्य संमेलनाच्या या उपक्रमाला प्रारंभ झाला.
दोन दिवस कुठल्यातरी दुर्गाच्या परिसरात महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमींना एकत्र करत, दुर्गाच्या या नानाविध विषयांवर चर्चा करत हे संमेलन रंगते. तज्ज्ञ-अभ्यासकांची व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, स्लाईड शो, माहितीपट, साहित्य अभिवाचन, प्रकाशन, प्रश्नमंजूषा, खुली चर्चा आणि प्रत्यक्ष दुर्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांमधून हा सोहळा रंगत जातो. यातील पहिले साहित्य संमेलन २००९ साली राजमाची किल्ल्यावर, दुसरे २०१२ साली कर्नाळा किल्ल्यावर, तिसरे २०१३ विजयदुर्गवर, तर चौथे २०१४ साली सज्जनगडावर  पार पडले. आता दुर्गसाहित्याचा हा मेळा पाचव्या अध्यायासाठी सिंहगडावर जमत आहे.
संमेलनाच्या या प्रत्येक नव्या पावलाबरोबर नवनवे दुर्ग आणि दुर्गप्रेमी जोडले जात आहेत. दुर्गप्रेमींचा समाज बांधला जात आहे. हे दुर्ग कसे पाहायचे, कसे वाचायचे, ते कसे जगवायचे इथपासून ते त्याच्या हृदयातील दुर्गगोष्टी जाणून घेण्याचे काम या संमेलनातून घडते. इतिहासापासून स्थापत्यापर्यंत, संवर्धनापासून पर्यटन विकासापर्यंत आणि साहित्य-कलांपासून ते जैवविविधतेपर्यंत अशा अनेक विषयांचे दरवाजे इथे उघडले जातात. या संमेलनानंतर अनेक गडांवर संवर्धनाचे कार्य सुरू झाले, दुर्ग साहित्य निर्मितीला चालना मिळाली, नृत्यापासून कीर्तनापर्यंत आणि चित्रकलेपासून छायाचित्रणापर्यंत असे अनेक कलाविष्कार दुर्गाशी जोडले गेले. आमचेच दुर्ग आम्हाला नव्याने कळायला लागले.
दुर्ग आणि स्थापत्य, दुर्ग आणि शिल्पकला, दुर्ग आणि लेणी, दुर्ग आणि अर्थ-व्यापार, दुर्ग आणि भूगर्भशास्त्र, दुर्ग आणि छायाचित्रण, दुर्गावरील जलसंधारण, दुर्गावरील वनस्पती, दुर्ग आणि पक्षी, दुर्ग आणि संरक्षण व्यवस्था हे आणि असे कितीतरी नवनव्या अभ्यासांचे, शोधांचे विषय या संमेलनातून पुढे आले. ज्याने या दुर्गाभोवतीचे अवघे अवकाश उघडले.
चार दिवसांच्या या सोहळय़ातून गडाभोवतीच्या गावांमध्ये हालचाल निर्माण होते. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. स्थलप्रसिद्धीतून भविष्यात स्थानिकांसाठी पर्यटन व्यवसायाच्या चार संधी निर्माण होतात. एकाचवेळी दुर्ग जागरण आणि स्थानिकांना रोजगार या दोन्ही गोष्टींची या संमेलनातून उत्तम सांगड घातली जाते. यातून आमचे उपेक्षित किल्ले पुन्हा जिवंत होतात आणि या साऱ्यांतून मग या दुर्गाच्या जतन-विकासासाठी काही पावलेही पडू लागतात. आजवरच्या चारही संमेलनाचा हा अनुभव आहे आणि त्याचे यशही इथेच कुठेतरी आहे.
छत्तीस जिल्हे आणि त्यामध्ये तब्बल पाचशे तीस किल्ले अशी संपत्ती असलेल्या या महाराष्ट्रातील सिंहगड हे यंदाचे पाचवे पाऊल आहे. दुर्ग संमेलनाची ही वारी उत्तरोत्तर अशीच या ‘दुर्गाच्या देशा’त बहरत जाईल, तिच्या या वेलीवर शिवनेरी, देवगिरी, रायगड, प्रतापगड, कुलाबा, कंधार अशी नवनवी फुले उमलत राहतील आणि त्यातूनच मग आज्ञापत्रात सांगितलेले ‘स्वराज्याचे सार’ही समाजाला उमगत जाईल!