ज्या गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, म्हणजे तिथे नवा इतिहास घडवण्यासाठी भरपूर वाव. गडावर फारसे अवशेष नाही, पण तरीही अर्धा ग्लास रिकामा म्हणून दु:ख करण्यापेक्षा आहेत ते अवशेष बघण्यात, जपण्यात आणि सांगण्यात काय हरकत आहे? साताऱ्याजवळचा वैराटगड हा काहीसा असाच!
वैराटगडसाठी सातारा जिल्हय़ातील वाईजवळच्या व्याजवाडी या पायथ्याच्या गावी यावे. या गावी येण्यासाठी वाई, साताऱ्यातून बससेवा आहे. फक्त या बस सकाळी, संध्याकाळी आहेत. कडेगावातूनही गडाकडे जाता येते. कडेगाव हे २६/११च्या हल्ल्यात..नव्हे विजयात शहीद झालेल्या जयवंत पाटील यांचे गाव आहे. हे सांगताना गावाला अभिमान वाटतो. कडेगावापासून गडाच्या दिशेने निघालो, की शेतातील पिकांमधले वैविध्य दिसते. या पिकांमुळे आणि अनेक फुलांमुळे रंगीबेरंगी पक्षीही आपल्यासोबत पायथ्यापर्यंत येतात. गावाच्या या ‘खऱ्या’ श्रीमंतीचे कारण असलेला कालवा ओलांडल्यानंतर गडाकडे जाणारा रस्ता विचारून घ्यावा. पावसाळय़ात सर्वच झाकलेले तर उन्हाळात सर्वच ओसाड, त्यामुळे नेमकी वाट समजणे आणि तीच वाट योग्य आहे असे सांगणेही अवघड आहे. पण माथ्यावर पोहोचायचेच असेल तर अडथळय़ांना लक्षात कोण घेतो? जागोजागीचा ढीगभर पालापाचोळा तुडवताना एखादा मोठा दगड लागणार नाही याची काळजी घेत होतो. एखाद्या पट्टय़ावर गवत नाही म्हणजे ती वाट असेल असे वाटून तपासूनही झाले. वृक्षांना पाने सोडून गेलेली, तरीही तेच आम्हाला आधार देत होते. डाव्या बाजूला ऊन अंगावर घेऊन उजव्या बाजूला गड ठेवून आमचे मार्गक्रमण चालू होते.
हा वैराटगड म्हणजे अकराव्या शतकात भोज राजाची निर्मिती तर विराट राजाने चक्क राजधानी म्हणून याची निवड केली. इतिहासाचा एवढाच धागा तो काय हाताशी. पण त्याला कवटाळून वर चढत होतो.
दीड-दोन तासांच्या चढाईनंतर गड टप्प्यात आला. बरेच बुरूज समोर एकत्र दिसू लागले. त्यासमोरील वाटेवरून वळणे घेत आपण गडाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. टिकून असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर पठारावर सुरुवातीला मारुतीचे मंदिर दिसते. तर बाहेरही एक मारुतीची मूर्ती दिसते. याचा अर्थ देव देवळाबाहेरसुद्धा आहे. ..फक्त देवळातल्या छोटय़ा चौकोनात राहणे त्याला शक्य नाही. गडाला तटबंदी फारशी नाही. पण आहे ती कडय़ावरून फेरफटका मारताना लक्षात येते. गडावर काही उद्ध्वस्त चौथरे दिसतात. वैराटेश्वर महादेवाचे मंदिर सुशोभित असून आत विजेचीही सोय आहे. मंडपात शिल्प कोरलेला एक दगड आहे. माथ्यावर एका मोठय़ा टाक्यातील पाणी आमरसासारखे होते, पण फक्त रंगाने. चव घेण्याची इच्छाही होत नव्हती. प्यायला पाणी हवे असेल तर गडाच्या पायऱ्या उतरून उजवीकडे सहा ते सात पाण्याच्या टाक्या आहेत. त्याचे पाणी प्यावे. इतर गडांप्रमाणे स्वच्छ, नितळ, चवदार. ही चव भटक्यांच्या ओळखीची. टाक्यांमधले हे पाणी प्यायले आणि उतरायला सुरुवात केली. वैराटगडाला फारसा इतिहास नाही. भूगोलही फारसा नाही. पण जे होते ते ऐन उन्हाळय़ात पाहतानाही
वेगळे वाटत होते. विराण वैराटगडही गुंतवत होता.