मकरंदच्या खांद्यावरील ‘घोणसवाडी’ या टुमदार गावी पोहोचायलाच संध्याकाळ झाली. एक साधी काडी देखील सापडणार नाही असं सारवलेलं स्वच्छ अंगण, हवेत छान गारवा, बाजूला दिमाखदारपणे शेकडो वर्षे पाय रोवून उभा ठाकलेला मकरंदगड. पौर्णिमेचं सुंदर रूपडे ल्यालेला गोरापान चांदोमामा, साथीला चमचमणाऱ्या तारका, यांच्या संगतीत मस्त मटार उसळ रस्सा आणि गरमागरम भातावर ताव मारून त्या अथांग अवकाशाखाली पथाऱ्या पसरल्या. कोंडनाळीतून कोकणात उतरायचे म्हणजे ‘वर’ जाण्यासाठी, खाली उतरण्याचा मार्ग असंच म्हणावं लागेल. ‘या वाटेने बरेच वर्षांत कोणी गेलं नाही, तुम्हीपण जाणं टाळा’ असा उपदेशवजा सल्ला मिळाला. पण आम्ही पोरांनी ठरवलंच होतं. (चुलीत गेले असले निश्चय असं नंतर वाटलं म्हणा, पण आता कोणाला सांगता!) घळीच्या सुरुवातीलाच या मार्गाने देखील खाली उतरू शकतो हीच अतिशयोक्ती वाटली. पाच मिनिटांतच पुढे येणाऱ्या अकराळ विकराळ सह्य़ाद्रीचा अंदाज येऊ लागला. सह्याद्रीवरील प्रचंड श्रद्धा, नितांत प्रेम, निसर्गाची साथ, सोबत असलेले सहकारी, पाणी आणि ग्लुकॉन डी यांच्या जोरावरच प्रत्येकाला ही वाट पार करणं शक्य आहे. आम्ही घळीच्या तोंडापासून खाली उतरलो, नव्हे घरंगळलोच. समोर दिसणारा सह्याद्रीचा उत्तुंग कडा थेट आमच्या नजरेतसुद्धा मावत नव्हता. निसर्गाने आपल्या संपत्तीची मुक्त लयलूट केलेली होती. मधुमकरंदची कातळ भिंत पाठीमागे आम्हाला निरोप देत होती, दोन्ही बाजूंना थेट गगनाला भिडणारे उंच कातळकडे मानवाला जणू त्याच्या खुज्या उंचीचीच आठवण करून देत उभे ठाकले होते. पुढय़ात किर्र्र झाडी आणि मोठाले खडक स्वागताला तयारच होते. मोठमोठाले खडक चढून उतरताना कधी हातात हात धरून साखळी करून, कधी दोराने, तर कधी चक्क बसून घसरगुंडय़ा सुरूच होत्या. आठदहा फुटांचे ते खडक आता चांगलीच परीक्षा घेत होते. त्यातच ३-४ दिवसांचे कपडे, पाणी आणि शिध्याने पाठीवरच्या सॅक्स जड झाल्या होत्या. आता घामाच्या धारा लागल्या होत्या. प्रत्येक वळणावर पाणी कमी कमी होत चाललं होतं आणि वळणं मात्र वाढतच होती. मध्येच जंगली श्वापदांचा उग्र वास वातावरणात एक विचित्र उदासी आणत होता. वाटेत सापडणाऱ्या प्राण्यांच्या सांगाडय़ाला ओलांडून पुढे जातो तो, लालचुटूक खेकडय़ांची जत्राच भरलेले खडक दिसत होते. चिरतरुण असणाऱ्या सापांनी आपल्या वार्धक्याला मागे सारून पुरावा म्हणून ठेवलेल्या काती कपारीांधे सापडत होत्या, तर मधमाश्यांचा घोंगवणारा आवाज त्या नीरव शांततेला चिरून जात होता. सर्वाचेच पाय चांगलेच बोलायला लागले होते. छातीचे भाते देखील थकले होते. संध्याकाळ होत आली. सूर्यनारायणाने तर कधीच पाठ दाखवली होती. आकाशात ‘खग’ दिनचर्या आटपून पिल्लांच्या ओढीने परतीच्या प्रवासाला निघालेले होते. अंधार वाढत चालला होता तरी मोठ्ठाले खडक, असंख्य दगडगोटय़ांचं अफाट सैन्य आमची वाट अडवून सज्जच होते. शेवटी आम्ही शरणागती पत्करली, खालच्या गावात पोहचण्याचा अट्टहास सोडून मोहिमेला स्वल्पविराम देत, रात्रीचा मुक्काम वाटेतल्याच घळीत निसर्गाच्या कुशीत करायचा निर्णय घेतला. 

संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी – http://nileshwalimbe.blogspot.in/2013/01/blog-post.html