गिर्यारोहण विश्वात ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे नाव सर्वत्रच आदराने घेतले जाते. ‘गिर्यारोहण’ त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि अशा व्यक्तिविकासातून समाजविकास, या सूत्राने गेली अनेक वर्षे ही संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘एव्हरेस्ट’, ‘ल्होत्से आणि मकालू या सारख्या मोठय़ा मोहिमांच्या यशातून संस्थेने ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले आहे. गिर्यारोहणातून समाज विकासाचे हेच ध्येय ठेवून संस्थेतर्फे लहान मुलांसाठी सुरू केलेला ‘आव्हान’ उपक्रम यंदा दहाव्या वर्षांत प्रवेश करत आहे.
गेल्या काही वर्षांत गिरिभ्रमण, गिर्यारोहण हा छंद समाजात मोठय़ा प्रमाणात रुजू लागला आहे. या विश्वात पावले टाकू पाहणाऱ्या नव्या मुलांना या विषयाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे, या क्षेत्राचे महत्त्व-मूल्ये कळावीत आणि अभ्यासू दृष्टीने त्यांनी या खेळाला एका उंचीवर पोहोचवावे या हेतूने ‘गिरिप्रेमी’ तर्फे ‘आव्हान’ उपक्रम सुरू केला आहे. गिर्यारोहणाची नवी पिढी आणि त्यातून एक सुदृढ समाज घडविला जात आहे.
शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, निसर्गाच्या सान्निध्यात विविध विषयांची आवड जोपासणे इथपासून ते व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण आणि सांघिक भावना रुजविणे अशा विविध ‘का आणि कारणां’ साठी भटकण्याचा छंद सर्वत्र सक्रिय कार्य करत असतो. या छंद-खेळातील गंमत, उपयुक्तता, नियम, पथ्ये, सराव आणि अभ्यास या साऱ्यांची लहान वयातच ओळख व्हावी, त्याचे संस्कार व्हावेत या हेतूतूनच ‘गिरिप्रेमी’ ने ‘आव्हान’ ला जन्म दिला.  १० ते १६ वयोगटातील लहान मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सह्य़ाद्रीतील गडकोटांपासून ते हिमालयातील उत्तुंग शिखरांपर्यत अनेक निसर्गवाटा तुडवल्या जातात. डोंगरवाटांवरील या प्रवासातच गिरिभ्रमणापासून ते गिर्यारोहणापर्यंतच्या विविध विषयांचे प्रशिक्षण इथे दिले जाते. काय असते या शिक्षणात, ..सॅक कशी भरायची, तंबू कसे लावायचे, डोंगर कसे चढायचे, उभ्या कडय़ा-सुळक्यांवर गिर्यारोहणाचे दोर कसे लावायचे, या दोरांना कुठल्या गाठी मारायच्या, अन्य साधनांचा वापर कसा करायचा हे सारे इथे शिकवले जाते. नकाशांपासून-जीपीएस तंत्रज्ञान, वेदर ट्रॅकर, अतिउंचीवरील संपर्क यंत्रणा, साधनांचा वापर इथे शिकवला जातो. भटकंतीच्या प्रत्येक वाटेवर त्या-त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग-पर्यावरणाची दखल या शिक्षणातून घेतली जाते. या शिक्षण-प्रशिक्षण आणि सरावातून तयार झालेली, सह्य़ाद्रीची ओळख झालेली, गिर्यारोहणासाठी सरावलेली पावले मग पुढे हिमालयातील उत्तुंग भटकंतीचा वेध घेऊ लागतात. आजवर या उपक्रमातून तयार झालेल्या मुलांपैकी अनेकांनी आता हिमालयातील अनेक शिखरांवर आपली पावले उमटवली आहेत.
‘गिरिप्रेमी’ ही गिर्यारोहण क्षेत्रातली जुनी, अनुभवी संस्था आहे. मार्गदर्शक, तज्ज्ञ मंडळी, आवश्यक साधनसामग्री आणि ग्रंथालय ही या संस्थेची जमेची बाजू आहे. आजवरच्या संस्थेच्या या अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्याच्या हेतूनेच नाममात्र खर्चात ‘आव्हान’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. कुठलाही छंद-खेळाची गोडी आणि त्याचे योग्य संस्कार लहान वयातच घडले तर त्याचा भविष्यात मोठा उपयोग होतो. ‘गिरिप्रेमी’ च्या ‘आव्हान’ चे यश इथेच कुठेतरी आहे. यंदा या ‘आव्हान’ चे दहावे पर्व सुरू होत आहे. यंदाच्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी नोंदणीही सुरू झाली आहे. तरी यासाठी इच्छुकांनी गिरीश चौधरी (८८०५७१६३००), श्रीपाद गोखले (९८५०२९५४२६) किंवा निरंजन पळसुले (९८५०५१४३८०)  यांच्याशी संपर्क साधावा.