एखाद्या उजाड माळरानावर भटकताना नजरेला, शरीराला गारव्याची नितांत आवश्यकता असताना, अचानकच समोर भरपूर पाणी दिसावे, त्याला बघूनच नजर तृप्त व्हावी, सबाह्य़-अभ्यंतरी शीतलतेची जाणीव व्हावी. जरा दुर्मीळच वाटतंय ना..?
पण सध्याचा उन्हाळा बघता, बाहेर कुठेही बघा उजाडच वाटतंय. त्यात भर म्हणून पानगळसुद्धा झालीये. सोबत येणारे गरम हवेचे झोत. दुष्काळात तेरावा महिनाच. अशा वेळी कुठे बाहेर जाणे तर अगदीच दुरापास्त. मग एक सुचवू का?.. तारकर्ली.
हो तारकर्लीच. आपल्या कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा. त्यातल्या मालवणजवळचं हे ठिकाण. तसं बघितलं तर, कोकणात खरंच सगळंच बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं. निसर्गाचा तर प्रश्नच नाही. पण तिथली घरं, जेवण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथली माणसंसुद्धा. असं असूनही तारकर्लीनं आपलं वेगळेपण जपलंय.
मालवणपासून ८ कि.मी., रस्ता चांगला, राहण्याची-जेवणाची चांगली सोय असं सगळं एखाद्या आदर्शवत स्थळासारखं. मग वेगळेपण ते काय? मालवणातून बाहेर पडताना दुतर्फा असलेली गर्द झाडी पार अगदी तारकर्लीपर्यंत तुमची सोबत करतेय. अन् त्यात आहे काय.. काजू, फणस अन् आंबा. आंब्याचं हिरवेगारपण उन्हाळ्यातच अधिक उठून दिसतं, नजरेला जणू भुलवतंच. रस्ता संपूच नये असं वाटायला लावणारा.
तारकर्ली जवळ आल्यापासूनच ‘त्याची’ ती गंभीर गाज ऐकू यायला लागते, पण दर्शनाची आस लागून राहिली तरी ‘तो’ जरा वाटच बघायला लावतो. गाडीतून उतरताना कानावर त्याच्या हाका तर पडतच असतात, पण सोबत आता त्याने पाठवलेले ‘वायुदूत’सुद्धा तुमच्याशी लगट करू बघतात. या थंडगार, काहीशा दमट झुळकांनी तुम्ही निश्चितच सुखावाल, पण जरा थांबा. ही तर सुरुवातच. काही पावलांनंतर पाय रुतवणारी रेती तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. पण नका थांबू. समोर दिसणारी गर्द वनराई खुणावतेय. एखादी सैन्याची पलटण शिस्तीत उभी असल्यासारखी नारळाच्या झाडांची गर्दी. काही एकदम उंच सरळसोट, तर काही कुठे तरी वाकलेली.. वाकून काही तरी शोधत असल्यासारखी.
अन् अचानकच ‘तो’ दर्शन देतोय. खुणावतोय, बोलावतोय.. त्या जलधिच्या अशा समीपतेने तर आपण हरखूनच जातोय. काही क्षणातच तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाताय. कपडे, शरीर चिंब तर होतच आहेत, पण मनाचं काय? तेही सारी बंधन झुगारून कधीचंच सागरात सामावलंय. येणाऱ्या लाटा आपल्याशी मस्ती करताहेत. ढकलताहेत, उचलून पुन्हा आदळताहेत, हरवून गेलात ना स्वत:मध्ये! अजून काय हवंय. उन्हाळा आहे असं सांगूनही पटणार नाही. गरम हवेच्या झळ्या नाही, रखरखीतपणा नाही, घामाच्या धारा नाहीत. आहे फक्त एक अनामिक आनंद आणि आनंदाचा समुद्र!
जरा मागे वळून बघता का? पांढरा शुभ्र किनारा, त्या पाठीमागचं नारळाच्या झाडांचं सैन्य. वाऱ्याच्या झुळकांनी डोलणारी त्याची पानं अन् किनाऱ्यावरच्या वाळूत उमटलेली पण लाटांनी पुसट झालेली तुमचीच पावलं. कसं एखाद्या सुंदरश्या ‘कॅनव्हास’सारखं वाटतंय ना..!
लाटांशी मस्तपैकी खेळून झाल्यावर जरा बाहेर या. येता येता डाव्या हाताला नजर टाका. काय दिसतंय..? तो शिवलंका सिंधुदुर्ग. फेसाळत्या समुद्रात, काळ्या दगडांमधलं हे पुरातन ‘शिल्प’ खरंच मनोहर वाटतं.
अशा या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर, सुंदर नितळ पाण्यात, पांढऱ्या शुभ्र रेतीवर हिरव्यागार मांडांच्या वनात. बघा तुम्ही स्वत:लाच सापडताय का..? मावळतीकडे निघालेल्या सूर्याला बघताना, त्याची लांबत जाणारी समुद्रातली प्रत्ििबबेसुद्धा तेवढीच भावतात. पश्चिमेचे बदलते रंग. हळूहळू गहिरे होतात, माडांच्या वनात आता अंधार चोरपावलाने येऊ घातलाय. समुद्राची गाज मात्र आहे तशीच येतेय. वाऱ्याचं गाणंसुद्धा अव्याहतपणे चालू आहे. एवढय़ा वेळात एकदा तरी उन्हाळा आठवलाय?
समुद्राच्या लाटांचं गाणं, वाऱ्याचं गाणं, सोबतीला आपल्या मनातले आपल्याही नकळत उमटू लागणारे सूर. या सर्वातून एक वेगळंच गीत बनलंय.. प्रत्यक्ष गात नसूनसुद्धा आपणही त्याचा एक भाग होतोय. अन् हळूवारपणे उन्हाळ्यातल्या या एका संध्याकाळी, आयुष्याचे एक नवे सूर आपल्याला गवसताहेत. ..आयुष्यच जणू गाणं होतंय..!