19‘वॉव! तू प्रत्यक्ष एव्हरेस्ट बघणार आहेस!’ माझ्या मैत्रिणीच्या या प्रश्नाला आता मी ठामपणे ‘हो’ असे उत्तर देऊ शकत होते. कारण ‘गिरिप्रेमी’ने आयोजित केलेल्या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक’ला माझे जायचे नक्की झाले होते. वयाच्या सहाव्या वर्षांपासून सह्याद्रीत गिर्यारोहण करत असल्याने १३ वर्षांची असूनसुद्धा मला या ट्रेकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. हा निर्णय होताच वेगवेगळ्या प्रकारची तयारी सुरू झाली. शारीरिक क्षमता वाढावी म्हणून मी पाठीवर सामान घेऊन टेकडी चढणे, उतरणे सुरू केले तसेच ‘जंक फूड’ खाणे पूर्ण बंद केले. मानसिक कणखरता वाढावी यासाठी प्रसिद्ध गिर्यारोहकांची भाषणे ऐकली. त्यांचे ‘ब्लॉग्ज’ वाचले व भेटी घेऊन तेथील हवामान, परिस्थिती व आव्हानांची माहिती घेतली. यामुळे माझ्या मनातील सर्व शंका, भीती दूर होऊन मी नव्या आत्मविश्वासाने ‘एव्हरेस्ट बेस कँम्प’ची वाटेवर निघाले.

काठमांडूतील पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन आम्ही या मोहिमेला प्रारंभ केला. आमची १३ ते ७५ या वयोगटातील २१ जणांची तुकडी होती. यामध्ये माझ्यासह असिम दीक्षित, आर्य अगस्ती, अमेय डेंग आणि समृद्धी भूतकर ही माझ्या वयाची आणखी मुले होती. आमचा ट्रेक लुक्ला या गावापासून सुरू झाला. हे गाव ९३८० फूट उंचीवर वसलेले आहे. या गावातील विमानतळाची धावपट्टी डोंगर उतारावर बांधल्यामुळे इथून निघणारे विमान दरीत पडल्यासारखे खाली जाऊन जोरात आकाशात झेपावते. हा थरार अनुभवताना खूप मजा आली.
अचानक अतिउंचीवर गेल्यामुळे शरीर त्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही. हवेतील प्राणवायूची पातळी कमी झालेली असल्याने डोके दुखणे, उलटय़ा होणे, मळमळणे, अन्न नकोसे होणे इत्यादी त्रास सुरू होतात. याला ‘हाय अल्टिटय़ूड सिकनेस’(एचएएस) म्हणतात. वातावरणात कमी झालेल्या या प्राणवायूुचा आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही काही उंचीवर जात पुन्हा काही अंतर खाली उतरत फाकडिंग (उंची ८५७३ फूट) गावी मुक्काम केला. दूधकोसी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाकडे जाण्याचा रस्ता उताराचा असल्याने सोपा होता.
दुसऱ्या दिवशीचा टप्पा हा ७ तासांच्या चढाईचा होता. हवामान अतीथंड होते आणि रस्ता अंगावर येणाऱ्या चढाईचा होता. एवढेच काय तर नेपाळचे राष्ट्रीय फूल असलेल्या ‘रोडोडेन्ड्रम’च्या झाडांनी हा सारा रस्ता बहरला होता. २६८० फुटांची चढाई करून आम्ही बशीसारखा आकार असलेल्या नामचे बझार (११,२८६ फूट) या गावी पोहोचलो. योग्य खबरदारी घेतल्याने आम्हा कोणालाही ‘एचएएस’चा त्रास झाला नाही. या नामचे बझारला पोहोचलो आणि आम्हाला पहिल्यांदा ‘माऊंट एव्हरेस्ट’चे दर्शन झाले. हा अनुभव खूपच विलक्षण व आनंददायी होता.
पुढच्या चढाईत तेंगबोचे (उंची १३,०७४ फूट), डिंगबोचे (उंची १४,८०० फूट) ही गावे लागली. या प्रवासात अचानक झालेली हिमवृष्टी मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवली. या हिमवृष्टीतून चालताना खूप धमाल आली. यापुढे ट्रेक अजून अवघड होत चालला होता. याचा सामना करण्यासाठी तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही जवळची एक उंच टेकडी चढण्याचा सराव केला. या सरावामुळेच आम्ही लोबूचे (१६,९१० फूट)ला विनासायास पोहोचलो. तेथे आम्हाला एक भन्नाट अनुभव आला. सगळीकडे हिमवृष्टीचा पांढरा पाऊस पडत होता व ढग इतके खालून जात होते, की काही वेळ आम्हाला १० फुटांवरचेही नीट दिसत नव्हते.
आता हा या ट्रेकमधला अखेरचा टप्पा होता. या दिवशी सलग ८-९ तास आम्हाला चालावे लागणार होते. पहाटेपासूनच हिमवृष्टी सुरू होती. हवा अतिशय खराब होती. चालताना बर्फ आणि वारा सतत आमच्या तोंडावर आपटत होता. त्यामुळे श्वास घेणही अवघड होते. अंगावर कपडय़ांचे ४ थर असूनसुद्धा थंडी वाजत होती.
चालताना उजव्या बाजूला ‘खुंबू ग्लेशियर’ दिसत होते. जेवायच्या वेळेपर्यंत आम्ही गोरक्षेप या गावी पोहोचलो. या ट्रेकमधील हे सर्वात शेवटचे आणि उंचीवरचे गाव. उंची १६,८६० फूट! गोरक्षेपमध्ये ‘गिरिप्रेमी’ने ‘एव्हरेस्ट २०१२’ मोहिमेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला आहे. जगातील सर्वोच्च जागी स्थापन केलेला हा महाराजांचा पुतळा. शिवरायांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या अंतिम उद्दिष्टाकडे निघालो. यापुढचे चालणे हे सपाट जमिनीवरचे होते. पण बर्फामुळे सर्वत्र मातीचा चिखल आणि दलदल झाली होती. यामुळे आम्हाला मोठय़ा दगडांवरून चढ-उतार करत जावे लागत होते. यामुळे खूप दमायला झाले. आता आम्ही १७,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर पोहोचलो होतो. या वेळी हवेतील प्राणवायूचे प्रमाण खूपच कमी झाले होते. त्यामुळे थोडे चालले तरी दम लागत होता.
‘बेस कॅम्प’पासून सुमारे ५० मीटर अलीकडे असताना आम्ही प्रचंड मोठा आवाज ऐकला. तो हिमप्रपाताचा होता. यामुळे आम्हाला एप्रिल-२०१४ च्या ‘खुंबू ग्लेशियर’मधील भयानक मोठय़ा अपघाताची आठवण झाली. शेर्पाकडून आम्हाला असे कळले, की हा अतिशय छोटा हिमप्रपात असून, हे असे रोजच होत असतात. यामुळे ‘खुंबू ग्लेशियर’मध्ये झालेल्या त्या प्रचंड हिमप्रपाताची केवळ कल्पना करूनही अंगावर काटा उभा राहिला.
आम्ही पुढे चढू लागलो आणि तेवढय़ात आम्हाला नेपाळी श्लोक लिहिलेल्या पताका दिसायला लागल्या. त्या आमच्या साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद पसरला. हा-हा म्हणता आम्ही त्या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी पोहोचलो आणि शेवटी त्या ठरलेल्या ‘एव्हरेस्ट बेसकॅम्प रॉक’पाशी आलो आणि साऱ्यांनी मिळून एकच जल्लोष केला. १७,५९८ फूट उंचीवरच्या आमच्या त्या पावलाने आमच्या आयुष्यात एक नवा अध्याय जोडला होता! गेले अनेक दिवस ठरवलेल्या मोहिमेची यशस्वी सांगता झाली होती. ‘एव्हरेस्ट’च्या पायथ्याशी पोहोचूनही एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद आम्हा सर्वाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. या आनंदी क्षणांना आम्ही कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एव्हरेस्टला मनात साठवत परतीच्या वाटेला लागलो.