सर्वोच्च ‘माउंट एव्हरेस्ट’च्या परिवारातील ते एक उत्तुंग शिखर. उंची २१,००० फूट! भल्या पहाटेच आम्ही ही उंची सर करण्यासाठी शेवटची चढाई सुरू केली. सर्वत्र अंधार होता. पण त्या अंधारातही समोरचा बर्फ चमकत, भीती दाखवत होता. ‘हेड टॉर्च’च्या उजेडात वरवर जाऊ लागलो, तोच हिमवृष्टी सुरू झाली. अगोदरच ढगाळ वातावरण आणि त्यात आता ही हिमवृष्टी यामुळे समोरचे दिसणे बंद झाले. या साऱ्या आव्हानांचा सामना करतही आमच्या जिगरबाज गिर्यारोहकांनी दोर बांधले आणि बरोबर १३ एप्रिलच्या सकाळी पावणेनऊ वाजता शिखर सर झाले. माऊंट आयलंडवर तिरंगा फडकला.
पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या नव्या दमाच्या तुकडीने संपादन केलेले यश; ज्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला. ‘आयलंड’च्या या यशातून या गिर्यारोहकांनी मकालूसाठी शुभेच्छा दिल्या.
सुरेश हावरे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत विशाल कडूसकर, अमित हावरे, अनिकेत हावरे, रिया हावरे, विजय शेंडे, प्रदीप सोनावणे, जयन मेनन या आठ गिर्यारोहकांनी भाग घेतला. ३० एप्रिल रोजी या मोहिमेला आम्ही सुरुवात केली. या दिवशी आम्ही काठमांडू येथून लहान विमानाने लुक्ला (उंची ९००० फूट) येथे पोहोचलो. इथून पुढचा प्रवास पायी करावा लागणार होता. फाकडिंग- नामचे बाजार- तेंगबोचे- डिंगबोचे असा ९ दिवसांचा खडतर प्रवास करत ९ रोजी आम्ही चुखुंग गावी पोहोचलो. ‘अॅक्लमटायझेशन’साठी म्हणजेच वातावरणाशी मिळते-जुळते होण्यासाठी वाटेत दोन वेळा आम्ही सुमारे १३००० ते १४००० फुटांपर्यंत चढाई-उतराई केली. चुखुंग (उंची-१५,५१८ फूट) मध्ये आम्हाला खराब वातावरणाला सामोरे जावे लागले. सतत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे आमच्या चुखुंग येथील मुक्काम एक दिवसाने लांबला. वातावरण निवळल्यानंतर १० रोजी चुखुंगपासून सुमारे ४ तासांच्या पायपिटीनंतर सर्व जण ‘बेस कॅम्प’वर (उंची- १६६९० फूट) पोहोचले. माउंट आयलंड ज्याचे स्थानिक नाव ‘इम्जा त्से’ असे आहे. हे शिखर एव्हरेस्ट परिसरातील अतिशय प्रसिद्ध असे शिखर आहे. बर्फाच्या विशाल सागरात दिसणाऱ्या बेटासारखे ते भासते म्हणून प्रसिद्ध गिर्यारोहक ‘एरिक शिफ्टन’च्या संघाने १९५१ साली या शिखराचे ‘आयलंड’ असे नामकरण केले. १९५६ सालच्या स्विस मोहिमेने एव्हरेस्ट आणि ल्होत्से चढाईची पूर्वतयारी म्हणून हे शिखर पहिल्यांदा सर केले. एव्हरेस्ट चढणारे बहुतेक गिर्यारोहक हे शिखर आधी सर करतात. पण आता त्यांच्याशिवाय इतरही हौशी गिर्यारोहकांसाठी ‘आयलंड’ हे एक आकर्षण ठरलंय. आयलंडची चढाई मध्यम श्रेणीतील कठीण चढाई मानली जाते. त्यामुळे शिखारचढाईसाठी तांत्रिक साधनसामग्रीची आवश्यकता भासते. ११ रोजी सतत बर्फवृष्टी सुरू राहिल्याने आम्हाला तंबूत बसून राहण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशीही पहाटेपर्यंत बर्फवृष्टी चालूच होती. आज तरी पुढची वाटचाल होईल अथवा नाही या विचारात असतानाच सकाळी ८ च्या सुमारास बर्फवृष्टी थांबली. सर्व आयुधांनिशी सज्ज होऊन आम्ही ‘बेस कॅम्प’ सोडला. आता इथून पुढे ‘हाय कॅम्प’वर (उंची- १८४०० फूट) एक मुक्काम करून सर्वोच्च शिखर गाठूनच परतायचे अशा निर्धाराने आमची वाटचाल सुरू झाली. हा पुढचा मार्ग खडकाळ आणि खडय़ा चढणीचा होता. त्यातच काल पडलेल्या बर्फाने सारा मार्ग निसरडा झाला होता. पायातले ‘स्नो शूज’ हे नेहमीच्या बुटांपेक्षा मोठे आणि जड असल्याने चालायचा वेगही मंदावला होता. टीम जसजशी वर जात होती तसा हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी कमी होत होते. वातावरणही ढगाळ झालेलं. त्यामुळे वरचा रस्ताही नीट समजत नव्हता. अशा सगळ्याच प्रतिकूलतेशी झगडत अखेर आम्ही पोहोचलो. इथे १८,००० फुटांवर पाणी मिळणे अशक्यच होते. त्यामुळे जवळपासचा बर्फ आणून तो वितळवून पाणी बनवण्याखेरीज पर्याय नव्हता. शेर्पा सहकाऱ्यांच्या मदतीने टीमने थोडासा उपमा आणि ज्यूस बनवले. हेच रात्रीचे जेवण होते. यातूनच ऊर्जा घेऊन पहाटे २.०० वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. आता शेवटची चढाई! ‘हेड टॉर्च’च्या प्रकाशात वाट काढत टीमने चढाई सुरू केली. थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता सलग ४ तास चढाई केल्यानंतर आम्ही सारे एका विशाल बर्फाच्छादित मैदानात येऊन पोहोचलो. समोर बर्फाचे विशाल मैदान होते. त्यात भेदक हिमभेगा होत्या. त्या पार केल्यानंतर सुमारे ५०० फूट उंचीची बर्फाची भिंत होती. ही भिंत चढून गेल्यावर आम्ही माथ्यावर पोहोचणार होतो. विशाल आणि दोरजी शेर्पा हे दोघे पुढे गेले. त्यांच्यामागे अनिकेत, प्रदीप व कर्मा शेर्पा आणि नंतरच्या फळीत मी, अमित, रिचा, जयन तर काही अंतरावर विजय शेंडे असा शिखरमाथ्याकडे प्रवास सुरू झाला. इथून पुढचा संपूर्ण प्रवास टणक बर्फावरून असल्याने सगळय़ांनी लोखंडी खिळ्यांचे बूट म्हणजेच ‘क्रॅम्पॉन्स’ चढवले. वाटेतील अकराळ-विकराळ हिमभेगा पार करताना एव्हरेस्टच्या ‘खुंबू आइसफॉल’ची आठवण झाली. सुमारे २ तास हे बर्फाचे मैदान तुडविल्यानंतर अखेर विशाल आणि दोरजी बर्फाच्या भिंतीच्या पायथ्याशी पोहोचले. ७० ते ७५ अंश कोनातील टणक बर्फावरची ५०० फूट चढाई करताना मात्र दोघांचाही अक्षरश: कस लागला. अखेर १३ एप्रिल रोजी सकाळी पावणेनऊ वाजता विशाल कडूसकर आयलंडच्या शिखरमाथ्यावर पोहोचला. त्याच्यापाठोपाठ अनिकेत हावरे याने शिखर गाठले. मागे राहिलेले अन्य सदस्य वाटेतील प्रयत्नांची पराकाष्ठा करत २०,००० फूट उंचीपर्यंत पोहोचले. इकडे शिखरावर पोहोचलेल्यांनी भारताचा तिरंगा, महाराष्ट्राचा भगवा आणि गिरिप्रेमींचा झेंडा माउंट आयलंडच्या माथ्यावर झळकवला.
या माथ्यावरून उत्तरेला दिसणारी ल्होत्सेची धार, पूर्व क्षितिजावर आभाळाला भिडणारं मकालू शिखर, दक्षिणेकडे दिसणारं अभेद्य आमा दब्लम ही सारी उत्तुंग शिखरे लक्ष वेधून घेत होती. त्यांचे रौद्र रूप आव्हान देत होते तर सौंदर्य डोळ्यात सामावत नव्हते. मन भरून त्यांना पाहत असतानाच वातावरण पुन्हा खराब होऊ लागले आणि आम्ही विजयी मुद्रेने तळाकडे परतलो. या यशात आमच्या विजयापेक्षाही मकालू मोहिमेच्या शुभेच्छा अधिक होत्या.