गोवा म्हटले, की डोळय़ांसमोर समुद्रकिनारे येतात. पण याच गोव्यात भगवान महावीर आणि महादाई अभयारण्यांसारखी संपन्न जंगले येतात. या जंगलातील भ्रमंती निसर्गाच्या आणि साहसाच्या वेगळय़ाच विश्वात घेऊन जाते.
गोवा! निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली भूमी. समुद्रकिनारे, फेणी, काजू, मासे, सुशेगात असणारी माणसे, पोर्तुगिजांचा ठसा उमटलेली गावे. बहुतेक सर्वाच्या मनात गोव्याची अशीच ओळख असते. पण आम्हा निसर्गवेडय़ांसाठी गोवा आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथली जंगले आणि त्यातली ती वेड लावणारी भ्रमंती. गोवा, कर्नाटक आणि काही प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेवर असणारी ही भगवान महावीर आणि महादाई अभयारण्यातील भटकंती केवळ अविस्मरणीय ठरते.
साधारण ऑक्टोबर हा या भटकंतीसाठी चांगला हंगाम. आम्हीदेखील मागील वर्षी याच दिवसांत पुण्याच्या ‘झेप’ संस्थेबरोबर या ट्रेकवर गेलो होतो. या संस्थेतर्फे या ट्रेकचे गेली पंधरा वर्षे आयोजन केले जात आहे. सहा दिवसांच्या या दोन्ही जंगलातील भ्रमंतीस कर्नाटकातील कॅसलरॉक या रेल्वे स्थानकावरून सुरुवात होते. आमचा पहिला टप्पा होता कॅसलरॉक ते दूधसागर. हे अंतर होते अंदाजे १४ किलोमीटरचे. ही सारी जंगलाची वाट हे वेगळे सांगायला नको. घनदाट जंगलातील हे सौंदर्य पाहात निघालो. वन्यजीवन पाहतानाच जळवांना रक्तदान करण्याचे पुण्यही पदरात पडत होते. अखेर दिवस संपता-संपता दूधसागर धबधब्याजवळ पोहोचलो. मांडवी नदीच्या उगमस्थळावर असलेला हा धबधबा. याच्याशेजारीच दूधसागर रेल्वेस्थानकही आहे. छोटेसेच. अगदी आपल्या ‘मंकी हिल’ एवढे. धबधब्याची ती घनगंभीर गर्जना ऐकत इथेच एका शेडमध्ये आम्ही आमचा मुक्काम थाटला.
दुसरा दिवस दूधसागर ते कोलेम! कोलेमचा स्थानिक उच्चार कुळे. हे जंगलातील पदभ्रमण पुन्हा १५ किलोमीटरचे. हे अंतर तुडवताना दूधसागरजवळ उगम पावलेली मांडवी नदी वाटेत दोनदा ओलांडावी लागली. तिच्या त्या पाण्यातून वाट काढत नदी ओलांडणे साहसाची मोठी कसोटीच ठरते. साहसाची हीच अनुभूती घेत राक्षसमळीकेश्वरच्या कोरीव मंदिरात आम्ही आमचा दुसरा मुक्काम लावला.
तिसऱ्या दिवशी आम्ही कोलेम जवळील मोलेम येथील वनखात्याचे संग्रहालय पाहून पुढच्या प्रवासाला लागलो. आजचा टप्पा होता १३ किलोमीरचा. पुन्हा जंगलची वाट पकडत आम्ही वाटेतील धारगे गावातील देवळाजवळ मुक्काम ठोकला. हा मुक्काम ऐन जंगलातील होता. इथेच एका नदीकिनारी तंबू लावत केलेला हा मुक्काम विसरता येणे शक्यच नाही.
चौथ्या दिवशी आमचा टप्पा होता धारगे ते कुमठळ. किर्र जंगलची ही वाट. यामुळे इथे माहितगार घेणे हे आवश्यकच होते. या गच्च जंगलातून जाताना आमच्या वाटाडय़ालाही वाट शोधावी लागत होती. आजच्या या भ्रमंतीत अनेक वन्यप्राणी दिसले. वानरे, चितळ, भेकर असे अनेक प्राणी दिसलेच, पण यात रानगव्यांचे दर्शन विशेष होते. जोडीला असंख्य सुंदर पक्ष्यांचीही आमची भेट घडली.
भटकंतीतील पाचवा दिवस आला तो आणखी एक आव्हान घेत. कुमठळ ते सॅन्ट्रेम हा टप्पा. या सॅन्ट्रेमचा स्थानिक उच्चार आहे सांत्रे. या वाटेवर जंगल, वन्यप्राणी तर सोबतीला होतेच; पण याहीपेक्षा वाटेतील ती महानदी ओलांडणे या दिवशीचे आव्हान होते. कमरेएवढय़ा वाहत्या पाण्यातून आम्ही दोर लावून ही नदी ओलांडली. तीनशे फूट लांबीचे नदीचे हे वाहते पात्र जीव मुठीत धरून एकेकाने ओलांडले. हा अनुभव आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा होता.  सहावा दिवस हा भटकंतीतील शेवटचा दिवस! सांत्रे ते पारवाड कनकुम्बी आजचा टप्पा होता. पदभ्रमणाच्या पहिल्या दिवशी सतावलेल्या जळवांनी पुन्हा आपले रक्त दाखवायला सुरुवात केली होती. आमच्या या जंगलभ्रमंतीची सुरुवात कर्नाटकातील कॅसलरॉकपासून झाली होती. यानंतर आम्ही महाराष्ट्र आणि मोठय़ा प्रमाणात गोवा राज्याच्या हद्दीतील जंगलामधून भटकलो होतो. आज शेवटच्या दिवशी या मोहिमेचा समारोप करताना आम्ही पुन्हा कर्नाटकच्या पारवाड कनकुम्बी गावात दाखल झालो. हे गाव कर्नाटकातील पण पूर्ण मराठी भाषक असलेले. मराठी बांधवांच्या सहवासातच आम्ही आमच्या या भ्रमंतीचा समारोप केला.
सहा दिवस, तीन राज्ये आणि त्यात दडलेली दोन मोठी अभयारण्ये ..या भागात आमची ही ९० किलोमीटरची पायपीट होती. डोंगर-दऱ्या, जंगल, नद्या-झरे- ओहोळ,  झाडे, पाने, फुले, पशू-पक्षी या साऱ्यांशी संवाद करणारी. ‘झेप’च्या सहवासात घडलेल्या या जंगलयात्रेने आम्हाला निसर्गाच्या अधिकच जवळ नेले. (अधिक माहितीसाठी ‘झेप’ संपर्क – देवेश अभ्यंकर (८०८७४४८२९७)