सकाळचे नऊ वाजत आलेत.. पावसानं ‘ऑलरेडी’ जोरदार हजेरी लावून हवेतला दमटपणा वाढवायला फुकटचा हातभार लावलाय.. घडय़ाळाच्या काटय़ांनी आम्हाला खिजवत पुढे पुढे पळायला सुरुवात केलीय आणि आम्ही मात्र उत्तर का दक्षिण या संभ्रमात सुतोंडा किल्ला वेडय़ासारखा भटकतोय..!
महाराष्ट्रात असलेली हिऱ्यांची खाण म्हणजे सह्याद्री! इथल्या दुर्गरत्नांच्या स्थापत्य, राकटपणा आणि सौंदर्याची तुलना अन्यत्र करणं केवळ अशक्यच. औरंगाबाद जिल्ह्यानंही या बाबतीत स्वत:चं वेगळं स्थान दुर्गप्रेमींच्या मनात मिळवलंय. दुर्गस्थापत्याचा अजोड नमुना म्हणावेत असे गिरिदुर्ग चाळीसगाव-औरंगाबाद भागात आहेत. नायगावचा किल्ला ऊर्फ सुतोंडा नावाचा एक अत्यंत अपरिचित दुर्ग असाच, औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात एकटाच उभा आहे. दुर्गप्रेमींकडून तसा दुर्लक्षित असला तरी एकदा भेट दिल्यावर मात्र आपल्या मनात कायमची छाप सोडेल असा.
सुतोंडय़ाला भेट देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील बनोटी गाव गाठायचं. बनोटी गावात यायचे मार्ग अनेक आहेत. पहिला मार्ग म्हणजे औरंगाबाद-कन्नड माग्रे बनोटी गावाला पोहोचता येतं. दुसरा मार्ग औरंगाबाद – सिल्लोड-घाटनांद्रा तिडका व बनोटी असा आहे. तिसरा मार्ग म्हणजे औरंगाबादहून फर्दापूर माग्रे सोयगाव हे तालुक्याचं गाव गाठायचं आणि तिथून जरंडी-कवटे-तिडका या मार्गाने बनोटी गाव गाठता येतं. नाशिकहून येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी नाशिक -मालेगाव-चाळीसगाव-नागद-बेलखेडा-बनोटी हा मार्ग सोयीचा आहे.
बनोटी गावातून सुतोंडा मात्र अजिबातच दर्शन देत नाही. त्याच्या पायथ्याला असलेल्या नायगाव या बनोटीपासून साधारणपणे तीन-चार किलोमीटर अंतर असलेल्या गावाला जाईपर्यंत पाठच्या रक्ताईच्या डोंगराच्या भव्यतेत हरवून गेलेला टेकडीवजा सुतोंडा एकदाचं दर्शन देतो. नायगावात एका झाडाखाली एक अतिशय सुंदर अशी विष्णुमूर्ती आहे. सुतोंडा किल्ल्याच्या भेटीत ही मूर्तीसुद्धा आवर्जून पाहावी अशीच आहे. पहिल्यांदा जात असल्यास नायगावातून माहीतगार वाटाडय़ा घेणं सोयीचं.
नायगावातून निघालं की पंधरा-वीस मिनिटांत आपण एका फाटय़ापाशी येतो. इथून डावीकडे जोगणामाईचं घरटं नावाच्या लेणीकडे जाण्याची वाट आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या या लेण्यात दोन दालनं आहेत. त्यापकी पहिल्या दालनात मांडीवर मूल घेतलेली देवीची मूर्ती असून शेजारीच गंधर्वाची प्रतिमा िभतीत कोरलेली दिसते. देवीच्या मूर्तीच्या िभतीवर नीट पाहिल्यास भगवान महावीरांची पुसट झालेली मूर्ती आहे. दुसऱ्या दालनात मात्र कोणतेही कोरीवकाम नाही. लेणी उजवीकडे ठेवून आपण पुढे गेलो की एक खांबटाके असून सध्या ते गाळानं भरलेलं आहे. लेण्यापासून सरळ जाणारी वाट गडाच्या भुयारी मार्गात घेऊन जाते, पण ही वाट अरुंद आणि थोडी अडचणीची असल्यानं शक्यतो ही वाट टाळून पुन्हा मघाशी पाहिलेल्या फाटय़ापाशी येऊन गडाची मुख्य पायवाट पकडावी. ह्या फाटय़ापाशी काही पायऱ्याही खोदलेल्या आहेत.
सुतोंडा किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवून आपण त्याला पूर्ण वळसा मारला, की तटबंदीमध्ये उभारलेला एक छोटेखानी दरवाजा आपल्याला लागतो. मागची अजिंठा रांगही एव्हाना दृष्टिक्षेपात आलेली असते. दरवाजातून सरळ गेलो की आपण गडाच्या खांबटाक्यांच्या समूहापाशी पोहोचतो. या वाटेवर एक कोरडे झाडांनी भरलेले टाके आहे. अतिशय सुंदर अशा या खांबटाक्यांना राख टाकी असं नाव असून त्याच्या समोर पीराचं स्थान आणि शेजारीच एका मशिदीची कमान पाहायला मिळते. सुतोंडय़ाचा परीघ हा अनेक खांबटाकी आणि खोदीव टाक्यांनी भरलेला आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर तटबंदी आणि वाडय़ाचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या शेजारी असणारा भव्य डोंगर म्हणजे रक्ताईचा डोंगर! जणू या छोटेखानी दुर्गरत्नाचा पाठीराखाच! सुतोंडय़ाचा भुयारी मार्ग याच रक्ताईच्या डोंगराकडे म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. किल्ल्याला रक्ताईच्या डोंगराच्या बाजूनं वळसा मारत निघालं, की वाटेवर पाण्याची अनेक टाकी दिसतात. सुतोंडा किल्ल्याच्या पोटात सीताबाईचं न्हाणं नावाचे एक अतिशय भव्य खांबटाके असून ते मुख्य पायवाटेच्या थोडे वरच्या दिशेला आहे. पण सुतोंडय़ावरील अक्षरश: जागेवर खिळवून ठेवणारा खांबटाक्यांचा समूह हा किल्ल्याच्या बरोबर पिछाडीस म्हणजे नायगावच्या दिशेला आहे. या टाकेसमूहाची भव्यता डोळे दिपवून टाकणारी आहे.
एवढं पाहून झालं की ज्यासाठी या किल्ल्याचा अट्टहास केला त्याकडे मोर्चा वळवायचा. रक्ताईच्या डोंगराच्या आपण बरोबर समोर ज्या ठिकाणी येतो तिथं एक कोरडे टाके असून त्यात एक झाड वाढलेलं आहे. हीच भुयारी मार्गाच्या सुरुवातीला असलेली खूण. इथून खाली दक्षिणेकडे म्हणजेच रक्ताईच्या डोंगराच्या दिशेला निघालं की भग्न दरवाजाचे अवशेष दिसू लागतात..आपलं कुतूहल वाढवतात. पुढे जावं तसं श्वास रोखला जाऊ लागतो आणि बघता बघता एका खंदकरूपी भुयारात आपला प्रवेश होतो. आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. एका भरभक्कम बांधणीची चाहूल लागायला सुरुवात होते. अंधाऱ्या भुयाराच्या शेवटी प्रकाशाचे किरण आत डोकावू लागलेले असतात आणि आपली वाट उघडते ती एका मानवनिर्मित आविष्काराच्या साक्षीनं.
सुतोंडा किल्ल्याच्या बांधणीचा परमोच्च िबदू म्हणजे हे प्रवेशद्वार. त्याच्या वर्णनासाठी शब्दच थिटे पडावेत. कातळ फोडून आणि तासून एक िखड तयार करण्यात आली आहे. याच िखडीचा मूíतमंत देखणेपणा म्हणजे किल्ल्याचं हे प्रवेशद्वार! जोगणामाईच्या घरटय़ापासून वर चढणारी अरुंद आणि घसाऱ्याची वाट इथंच येऊन मिळते. किल्ल्याच्या अखंड कातळात सुमारे सात फुटांचं छोटेखानी प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या तटबंदीत एक शरभशिल्प विराजमान झालं आहे! त्याच्या शेजारी एका झाडाच्या मागे एक छोटं छिद्र आढळतं. तोफगोळय़ाचा मारा करण्यासाठी ही योजना केलेली असावी. कारण िखडीचा आकार आणि दरवाजाच्या स्थापत्याची शैली आणि प्रयोजन लक्षात घेता शत्रूला इथं कोंडीत पकडणं सहज शक्य आहे याची तात्काळ जाणीव होते. सुतोंडय़ाचा हा दरवाजा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांच्या स्थापत्यापकी एक अभिनव आणि अविस्मरणीय अशी रचना म्हणावी लागेल. या दरवाजापाशी आपली सुतोंडय़ाची फेरी पूर्ण होते. इथून आपण आल्या वाटेनं परतु शकतो किंवा दरवाजातून उजवीकडे जाणारी वाट गडाच्या तटबंदीच्या खालून आपण जिथून गडावर आलो त्या छोटय़ा दरवाजात पोहोचते. या माग्रेही आपल्याला गड उतरणं शक्य आहे.  
नायगावात पोहोचताना पावलं जडवलेली असतात खरी! किल्ल्याचा सहवास अधिकच हवाहवासा वाटू लागतो. कारण या छोटेखानी किल्ल्यानं एक भन्नाट असा अनुभवांचा खजिना आपल्याबरोबर दिलेला असतो. गडाची भव्य आकाराची खांबटाकी, गडावरून होणारे अजिंठा रांगेचे निखालस सुंदर दर्शन, भुयारी मार्ग आणि जोगणामाईचं घरटं अशा अनेक वैशिष्टय़ांनी सुतोंडा भटक्यांच्या मनात घर करून बसतो.
ओंकार ओक