नाशिक जिल्हा हा खरेतर किल्ल्यांचा प्रदेश! डोंगररांगा आणि त्यावर एकापेक्षा एक देखणे किल्ले. या किल्ल्यांच्या मालिकेतीलच एक सातमाळा रांगेतील कण्हेरगड! त्याच्या इतिहास आणि भूगोलामुळे भटक्यांचे पाय खेचणारा.
नाशिक जिल्हा! महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त डोंगरी किल्ले उराशी बाळगणारा प्रदेश म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या जिल्ह्याची बातच काही और आहे. हातगड-अचला पासून ते साल्हेर-मुल्हेपर्यंत आणि आड-पट्टय़ापासून ते गाळणा-कंकराळय़ापर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी-डोलबारी असो किंवा त्र्यंबक-वाघेराची प्रत्येकीचं खास वैशिष्टय़. पण या सगळय़ांची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग. चौदा अभेद्य अशा गिरिदुर्गाची मालिका आणि यातील एकेक दुर्ग म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं ‘ड्रीम डेस्टिनेशन’. यातील एक  कण्हेरगड! गिर्यारोहकांना फारसा परिचित नसलेला पण इतिहासातील पराक्रमगाथेमुळे आपलं नाव सुवर्णाक्षरात कोरून ठेवणारा!
नाशिकहून थेट कण्हेराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नाशिकहून ओतूर माग्रे कण्हेरवाडी या पायथ्याच्या गावामाग्रे किल्ला चढायचा किंवा वणी-नांदुरी -कळवण रस्त्यावरचं आठंबा हे गाव गाठून तिथून सादड विहीरमाग्रे कण्हेरावर जायचं. रवळय़ा-जवळय़ा, अचला-अहिवंत किल्ल्यांची जोडभ्रमंतीही या पदभ्रमण मोहिमेत करता येते. असो. सादड विहीर किंवा कण्हेरवाडी कुठूनही गेलं तरी कण्हेरा आणि त्याच्या शेजारचा डोंगर यांच्यातली िखड चढावीच लागते. दोन्ही वाटा या िखडीत येऊन मिळतात आणि पुढे दोन्हीची मिळून एकच वाट कण्हेरा माथ्यावर जाते. ही वाट अत्यंत खडय़ा चढाची आणि मुरमाड आहे. त्यामुळे कसलेल्या भटक्यांचाही दम काढते. या वाटेवर गडाचा एक बुरुज, काही खोदीव पावटय़ा आणि पाण्याचं एक टाकं दिसतं. असेच पुढं गेल्यावर उजवीकडं गडाचं छोटंसं नेढं आहे. कण्हेरगडावरची ही सर्वात सुंदर जागा असून इथे बसून आजूबाजूच्या डोंगररांगा पाहण्यात एक वेगळंच सुख आहे. नेढय़ापासून काही पायऱ्या चढून आपण वर आलो, की उजवीकडची वाट नेढय़ाच्या माथ्यावर जाते तर डावीकडची वाट बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर दोन छोटे दगडी स्तंभ उभे राहिलेले दिसतात. त्यांचं प्रयोजन मात्र कळत नाही.
नेढय़ापासून आपण पुढे आलो, की गडाची तटबंदी दिसू लागते. बालेकिल्ल्यावर प्रवेश करताचक्षणी कण्हेराचं विस्तीर्ण पठार नजरेत भरतं. कण्हेराच्या माथ्यावर सुरुवातीलाच पाण्याची काही टाकी आहेत. पुढे गडाच्या मुख्य पठारावर उद्ध्वस्त वास्तूंचे अनेक अवशेष पसरलेले आहेत. गडाच्या उजव्या बाजूच्या कडय़ाजवळ एक झेंडा असून त्याच्या जवळच एक वृंदावन आहे. वृंदावनाच्या मागच्या बाजूलाही एक पडक्या वाडय़ाचं बांधकाम दिसतं. या वृंदावनाच्या मागे गडाची माची असून तिला धोडप किल्ल्यासारखी एक खाच आहे. गडावर पाणी बेताचेच असल्याने इथे येताना पाण्याचा साठा बाळगावा. कण्हेरच्या माथ्यावरून सातमाळा रांगेचं अप्रतिम दर्शन होतं. अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मरकडया, मोहनदरी दुर्ग, धोडप, रवळ्या-जवळया, इखारा, कोळदेहेर, राजदेहेर, चौल्हेर, दीर -भावजय डोंगर, प्रेमगिरी, इंद्रमाळ इतका विस्तीर्ण आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा नजारा दिसतो.
पण कण्हेराच्या माथ्यावर फिरताना मात्र त्याच्याशी ज्याची कायमची नाळ जोडली गेलीये अशा पराक्रमी इतिहासाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. इसवीसन १६७१ च्या ऑक्टोबर महिन्यात औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेर आणि बहादूर ही खानजोडी बागलाणात घुसली होती. मुघलांच्या सन्याने सर्वप्रथम महाराष्ट्राच्या दुर्गेद्राला अर्थात साल्हेरला वेढा घातला. इकडे साल्हेरच्या वेढय़ातील काही मुघल सन्य घेऊन दिलेरखानाने रवळय़ा किल्ल्याकडे मोर्चा वळवला. पण मराठय़ांनी इथे वेढा घालून बसलेल्या मुघल सन्यावर वेळी-अवेळी छापे टाकायला सुरुवात केली. अखेर कंटाळून दिलेरखानाने रवळय़ाचा नाद सोडत तो कण्हेरगडकडे वळला. या वेळी कण्हेरगडाचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचा सेनासागर पहिला. आता युद्ध अटळ आहे हे त्याला कळून चुकलं होतं. गडावरच्या मराठय़ांपुढे त्याने सवाल केला ‘निदान करावयाचे. आपले सोबती असतील ते उभे रहाणे. ” सरसर सातशे मावळा उभा राहिला. रामाजीने सिंहाच्या काळजाचे सातशे मराठे बरोबर घेत तो मुघल सन्यावर तुटून पडला. रामाजी आणि त्याच्याबरोबरच्या मराठय़ांचा तो आवेश बघून मुघल सन्याचा ठोकाच चुकला. महाभयंकर रणकंदन सुरु झालं. मराठय़ांच्या तलवारी सपासप मुघल सन्याला कापत सुटल्या होत्या. मराठय़ांचा अवतार आवरणं मुघलांना कठीण जाऊ लागलं. मराठय़ांनी पराक्रमाची शिकस्त चालवली होती. रामाजीच्या अंगात तर साक्षात रणचंडिकाच संचारली होती. देहभान विसरून तो समोर दिसेल त्या मुघल सनिकाला कापत चालला होता. रामाजीचा तो आवेश बघून दिलेरखान थक्क झाला. अवघ्या सातशे मावळय़ांनी बाराशे मुघलांना नरकाचा रस्ता दाखवला. रामाजी आणि त्याच्या मराठय़ांनी शौर्याची कमाल केली होती. विस्मृतीत गेलेला कण्हेरगड मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने इतिहासात अमर झाला. सुवर्णाक्षरात कोरला गेला होता.
रामाजी पांगेऱ्यासारख्या इतिहासात प्रचंड मोठं योगदान देऊनही विस्मृतीत गेलेल्या नरवीराचा पराक्रम आठवत कण्हेरगड उतरायला लागायचं. सातमाळा रांगेतल्या या छोटेखानी किल्ल्याने इतिहासात आपलं नाव अमर करून ठेवलं आहे. हीच धारतीर्थ पाहायला तर डोंगरयात्रा, दुर्गयात्रा करायच्या. कदाचित आजही त्या खोलवर झालेल्या जखमांच्या खुणा कण्हेराच्या वाटेवर कुठेतरी जिवंत असलेल्या दिसतील!   
ओंकार ओक

कण्हेरगड
* नाशिक जिल्ह्य़ातील सातमाळा रांगेवर
* इतिहास आणि भूगोलाचे योगदान
* चढाईस अवघड
* पाण्याची सोय नाही
* रवळय़ा-जवळय़ा, अचला-अहिवंत किल्ल्यांची जोडभ्रमंती

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी