मित्रांनो, ही गोष्ट आहे, अंकाई-टंकाई किल्ल्याजवळच्या ‘हडबीची शेंडी’ या सुळक्याची. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी पाहिली, त्याच वेळी त्याच्या शेजारच्या त्या सुळक्याने लक्ष वेधून घेतले होते. हा सुळका कधीतरी सर करायचा हा निश्चय आम्ही त्या वेळी केला होता. या आठवणींना जागवतच आम्ही नुकतेच पुन्हा हा डोंगर चढलो आणि त्या सुळक्याच्या माथ्याचा स्पर्शही अनुभवला.
मनमाड जवळ अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी आहे. भरपूर वास्तू, इतिहास असलेल्या या किल्ल्यांच्या शेजारीच एक उत्तुंग सुळका आहे, ज्याचे नाव ‘हडबीची शेंडी’! काही लोक याला ‘थम्स अप’ असेही म्हणतात. पण ‘हडबीची शेंडी’ हेच त्याचे मूळ नाव! लांबच लाब मोकळय़ा पसरलेल्या या भागात १२० फुटांचा हा सरळसोट सुळका दुरूनच लक्ष वेधून घेतो. हजारो वर्षांपूर्वी उफाळून आलेल्या ज्वालामुखीतून घडलेली ही कलाकृती. ऊन, वारा, पाऊस याचा मारा सोसत गेली हजारो वर्षे अवकाशाकडे लक्ष ठेवून उभी आहे.

गेल्या वर्षी जेव्हा ‘बाण हायकर्स’ने सुळके चढाईला प्रारंभ केला. त्याच वेळी हडबीची शेंडी सर करण्याच्या विचाराने पुन्हा डोके वर काढले. मग तयारी केली आणि आवश्यक साधनांसह आमचा पाच गिर्यारोहकांचा चमू एका रात्री अंकाईकडे रवाना झाला. मुंबई ते मनमाड, मग पुढे पायथ्याचे शेंडी गाव असा प्रवास करत दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही सारे त्या ‘हडबीची शेंडी’च्या पायथ्याशी दाखल झालो. चढाईच्या मार्गाचा आराखडा तयार केला. पुस्तकात दिल्याप्रमाणे कुठे काय असू शकते याबाबत थोडी चर्चा केली आणि अंगावर गिर्यारोहणाचे अलंकार चढवून चढाई सुरू झाली. लक्ष्मण होळकर प्रथमच चढाई करणार होता. आणखी एक मित्र संतोषच्या हातात सुरक्षा दोर देऊन त्याने चढाईस सुरुवात केली. हडबीची शेंडी तसा कमी उंचीचा सुळका. पण या मार्गातील सगळय़ात मोठा अडथळा हा निखळणारे दगड होता. कोणत्याच पकडीवर पूर्णपणे विसंबून राहता येत नव्हते. कधी कोणता दगड धोका देईल याचा नेम नव्हता. गेल्या अनेक वर्षांच्या पाऊस-पाण्याच्या सततच्या माऱ्यामुळे या सुळक्याची मोठी झीज झालेली होती. काही गिर्यारोहकांच्या मते पूर्वी माथ्यावर तंबू लावता यायचा, पण आज इथे जेमतेम चार-पाच लोक उभी राहण्याइतपतच जागा आहे. लक्ष्मणने चढाई सुरू केली. आम्ही त्याला खालून मार्गदर्शन करत होतो. काही मिनिटांतच तो पहिल्या टप्प्यावर पोहोचला. समोरच्या दगडाच्या एका भेगेत मारलेला खिळा दिसला. त्याला लोखंडी कडीदेखील होती. स्वत:ला त्यात सुरक्षित करण्यापूर्वी त्याने त्याला खेचून पाहिले, पण त्याचे आयुष्य संपलेले होते. नुसत्या हातानेच तो निखळून आला. तेव्हा मार्गाची नव्याने बांधणी करत गिर्यारोहक पुढे सरकले. दोर बांधला गेला होता. पण ठिसूळ खडकामुळे दोरावर पूर्णपणे विसंबून राहता येत नव्हते. आतापर्यंत ९० फुटांचा टप्पा पार पडला होता. आता अवघी ३० फुटांची चढाई बाकी होती. पण नेमक्या या टप्प्यावर चढाईसाठी आधार मिळेना. तेव्हा आम्ही चक्क दहीहंडीप्रमाणे एकमेकांना खांद्यावर घेत हा टप्पा ओलांडला. आता उर्वरित तीस फुटांची चढाई सुरू झाली. या वेळी मी पुढे होतो. थोडय़ाच वेळात मुक्त प्रस्तरारोहण करत मी हाही टप्पा ओलांडला आणि हडबीची शेंडीच्या माथ्याला माझा स्पर्श झाला. टाळय़ांच्या कडकडाटात आमचे हे यश आम्ही साजरे केले. मग सुळक्याच्या माथ्यावर भक्कम अशी मेख रोवली. त्यावर सुरक्षा दोर लावला. ज्यायोगे उर्वरित गिर्यारोहकही थोडय़ाच वेळात माथ्यावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी लांबूनच लक्ष वेधून घेणारे हे रसायन आज चाखून पाहिले होते. माथ्यावरून दिसणारा मनमाडचा परिसर. समोर उभी ठाकलेली अंकाई-टंकाई किल्ल्यांची जोडगोळी, रेल्वे रुळांचे पसरलेले जाळे, मनमाड शहर हे सारे दृश्य मनात आणि कॅमेऱ्यात साठवून आम्ही उतरू लागलो.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक