साहसाच्या जगात गिर्यारोहण, गिरिभ्रमण, सायकलिंग, नौकानयन, पॅराजंपिंग या अशा खेळांबरोबरच उमद्या अश्वांच्या सोबतीने सुरू असलेला एक क्रीडाप्रकार म्हणजे अश्वारोहण! जातीचे घोडे आणि हाडाचे प्रशिक्षक या आधारे हा साहसी छंद जोपासता येतो. पण या दोन घटकांच्या पातळीवरच अनेक ठिकाणी मर्यादा येत असल्याने या छंदाची पाळेमुळे आपल्याकडे फारशी रुजली-वाढली नाहीत. पण या साऱ्या आव्हानांवर मात करत घोडेस्वारीच्या प्रशिक्षणापासून ते डोंगरदऱ्यातील मोठय़ा मोहिमांपर्यंतची मजल पुण्याच्या ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने मारली आहे. याच संस्थेतर्फे यंदा उन्हाळी सुटीत अश्वारोहण प्रशिक्षिण शिबिर आणि स्पर्धाचे आयोजन केले आहे.
पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या परिसरात हे शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये ५ दिवस ते एक महिना या कालावधीसाठीचे विविध अभ्यासक्रम आहेत. या प्रशिक्षणामध्ये अश्वारोहण, त्यातील विविध प्रकार, स्पर्धात्मक खेळ आदी गोष्टी तज्ज्ञ-अभ्यासकांकडून शिकवल्या जाणार आहेत. प्रशिक्षणानंतर सहभागींसाठी विविध स्पर्धा आणि सहलींचेही आयोजन केले आहे. यंदा या अशा सहली सिंहगड, पानशेत, लवासा, पिरंगुट आदी डोंगरदऱ्यांच्या भागात जाणार आहे. या शिबिरामध्ये ५ ते ६० वयापर्यंतची कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकेल.  
अश्वारोहण हा खेळ शरीर आणि मन या दोन्हींचाही विकास करणारा आहे. यातून व्यक्तिमत्त्वाचा खऱ्याअर्थाने विकास घडतो. आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आदी गुण आत्मसात करता येतात. शारीरिक क्षमतांचा विकास इथे होतो तर निर्णय क्षमतेची कसोटी लागते.
घोडय़ावर बसणे, तो ताब्यात ठेवणे, त्यावरून  रपेट मारणे..हे सारेच तुमच्यातील साहसी-धाडसी रक्ताला वाव देणारे असते. एखाद्या उमद्या घोडय़ावर स्वार झालेला साहसवीर पाहताना आपणा प्रत्येकालाच त्याचा हेवा वाटतो. अश्वारोहणाच्या या कृतीतून जणू त्या दोघांचेही सळसळते तारूण्य भवतालावर छाप पाडत असते. असा हा खेळ आणि त्यात दडलेले हे साहस. तेंव्हा चला तर मग या सुटीत अश्वारोहण शिकायला! अधिक माहितीसाठी ९८२२६२१०१६ किंवा ९८२२०१३०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.