महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांना त्यांची अशी खास ओळख मिळाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्य़ातील किल्ल्यांच्या भाळी विलक्षण भौगोलिक आकार आले आहेत. कळवण तालुक्यातील मोहनदर किल्लाही अशाच एका नेढय़ाच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे.
नाशिक जिल्ह्य़ातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी देवीचे सप्तशृंगीगड नावाचे सुप्रसिद्ध ठिकाण आहे. वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो लोक वणी- नांदुरी रस्त्याने ये- जा करीत असतात. हा प्रवास चालू असताना नांदुरीच्या चौकातून अभोण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील एक निसर्गनवल सर्व जण गाडीतून माना बाहेर काढत मोठय़ा कौतुकाने पाहत असतात. हे निसर्गनवल म्हणजेच मोहनदर किल्ल्याच्या पश्चिम टोकाकडील नेढे होय. या नेढय़ासंदर्भात एक दंतकथा प्रसिद्ध असून या कथेनुसार ‘दिंडोरी, कळवण आणि आसमंतातील भागात महिषासुर नावाच्या दैत्याने आणि त्याच्या दोघा भावांनी मिळून देववृत्तीच्या लोकांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले होते. देवीने दोघा दैत्यांना ठार केल्यावर महिषासुराचा वध करणे तिला त्रासदायक वाटू लागले. कारण रेडय़ाच्या शरीरात प्रवेश करून हा बलाढय़ राक्षस राहात होता! दोघा दैत्यांना ठार केल्यावर हा तिसरा राक्षस रेडय़ाच्या शरीरात राहतो हे देवीने हेरले व त्या रेडय़ाचे शरीर उडवून लावले, त्याबरोबर महिषासुर रेडय़ाच्या शरीरातून एवढय़ा तीव्र गतीने निघाला की, त्या उड्डाणामुळे डोंगराला खिंडार पडले.’ हे खिंडार म्हणजेच मोहनदर किल्ल्याचे नेढे होय.
समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीवर वसलेल्या मोहनदर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपण नाशिकहून वणीच्या पुढचे नांदुरी गाव गाठायचे. नाशिक ते नांदुरी हे अंतर ५५ किलोमीटरचे. नांदुरीतून अभोण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या डाव्या हातास मोहनदरी गावाकडे एक फाटा जातो. हे अंतर आहे तीन किलोमीटरचे. मोहनदरी गावात आलो, की शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या इमारतीजवळ यायचे.  या आश्रमशाळेपासूनच किल्ल्याची चढाई सुरू  होते. ती सुरू करण्यापूर्वी गावातून पाणी भरून घ्यायला विसरू नये. गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवत अध्र्या अंतरावर गेल्यावर किल्ला आणि त्याच्या शेजारचा डोंगर यांच्यामधील खिंड येते. गडपायथ्याच्या मोहनदरी गावाचे लोक दररोज याच वाटेने आपल्या शेळ्या- मेंढय़ा व गुरे- ढोरे किल्ल्याशेजारील डोंगरावर चरण्यासाठी आणत असतात. त्यामुळे आपण गड चढत असलेली पायवाट एकदम धोपट आहे. या पायवाटेने आपण खिंडीत येऊन पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे जाते तर दुसरी डावीकडे जाते. आपण यातील डाव्या वाटेने गड जवळ करायचा. खिंडीतून फक्त पाचच मिनिटांची चढाई केल्यावर गडाची तटबंदी आपली वाट अडविते. या तटबंदीतून डाव्या हाताने वर गेल्यावर मोहनदर किल्ल्याच्या पूर्व अंगावरील बालेकिल्ल्यावर आपण येऊन पोहोचतो. या गडाचा विस्तार पूर्व- पश्चिम आहे. बालेकिल्ल्यावर एकमेकाला खेटून तीन कोरीव पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांशेजारी किल्लेदाराच्या वाडय़ाचा चौथरा आजही बऱ्यापैकी अवस्थेत उभा आहे. या चौथऱ्यावरून संपूर्ण गड नजरेत येतो. आजुबाजूचे सप्तशृंगीगड, अहिवंतगडाचा भव्य पसारा व एकूणच आजुबाजुचा डोंगराळ मुलुख फार छान दिसतो.
आपण मोहनदरगडाचा बालेकिल्ला पाहून झाल्यावर कोरीव पायऱ्यांच्या मार्गाने उंचवटा उतरून गडाच्या पश्चिम टोकाकडे चालू लागायचे. तिकडे जात असताना पायवाटेच्या उजव्या हातास आपणास दोन कोरडी टाकी दिसतात. पुढे आणखी एक शेवाळलेले टाके दिसते. या टाक्यापुढे गडाचे पश्चिम टोक असून या टोकावर गावक ऱ्यांनी भगवा झेंडा लावलेला आहे. या पश्चिम टोकाच्या खालच्या बाजूला गडपायथ्याहून दिसणारे नेढे दिसते. या नेढय़ासाठी मात्र इथून उतरता येत नाही. हा गड लांबीला मोठा असला तरी रुंदीने थोडका असल्याने गडफेरीस पाऊणएक तास पुरतो.
ज्या दुर्गप्रेमींना नेढे पाहायचे आहे, त्यांनी आश्रमशाळेशेजारील पाण्याच्या टाकीमागून जाणाऱ्या पायवाटेने नेढय़ाची वाट पकडावी. या नेढय़ात चढून जाण्यासाठी साधारण १२ फूट उंचीचे प्रस्तरारोहण आवश्यक असून हा टप्पा चढून जाण्यासाठी दगडातील खाचांचा आधार घ्यावा लागतो. या नेढय़ाला लागूनच एक पायवाट पुढे डोंगर माथ्यावर जाते. या माथ्यावरून मोहनदर किल्ला फार छान दिसतो.
या गडाच्या डोंगराचे मूळचे नाव ‘शिडका’ असून, पायथ्याच्या मोहनदरी गावामुळे हा किल्ला मोहनदर नावाने ओळखला जातो. शिवकाळात या गडाशेजारच्या अहिवंतगडास खूप महत्त्व होते. मोहनदर किल्ल्याच्या माथ्यावरून हा गड अहिवंतगडाच्या किती जवळ आहे हे पटकन लक्षात येते, त्यामुळे मोहनदर किल्ल्याचे एकूणच या भागातील संरक्षण व्यवस्थेतील महत्त्व पटकन आपल्या लक्षात येते. ज्या अर्थी इ. स. १६७० साली छत्रपती शिवरायांनी अहिवंतगड जिंकून घेतला त्याअर्थी हाही गड त्याच काळात स्वराज्यात दाखल झाला असला पाहिजे.

दुर्गम दुर्ग
जातीच्या भटक्यांना अपरिचित, अनगड गडकोटांच्या वाटा खालीवर करण्यास सतत आवडत असते. मळलेली वाट जणू त्यांच्यासाठी नसतेच. अशाच डोंगरवेडय़ा, दुर्गवेडय़ांसाठी भगवान चिले यांचे ‘दुर्गम दुर्ग’ हे नवे पुस्तक खूपच प्रेरणादायी ठरणारे आहे. वाटा-आडवाटांवरच्या ४० दुर्गम दुर्गाची भेट या पुस्तकातून घडते. ज्यामध्ये मोहनदर, चांभारगड, कोळदुर्ग, रामदुर्ग, नारायणगड, कात्रा, मोरदंड असे अनेक अपरिचित गडकोटांचे दर्शन घडते. या सर्व किल्लेविषयक लेखांना लेखकाच्या पावलांचा अनुभव आहे. भूगोलाचे वर्णन, इतिहासाची सोबत आणि वेळ-अंतरासारखी उपयुक्त माहितीही त्यात आहे. लेखांसोबत काही मार्गदर्शक नकाशे आणि वेधक छायाचित्रांचीही जोड देण्यात आली आहे. या साऱ्यांमुळे भटक्यांसाठी हे पुस्तक सोबती ठरते.
(‘दुर्गम दुर्ग’- भगवान चिले, शिवस्पर्श प्रकाशन, कोल्हापूर)

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Ajit Pawar appeal to the wrestlers of the district regarding the dispute in the wrestling federation pune
अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख