‘धन्य धन्य हे वसुमती।  इचा महिमा सांगो किती।
प्राणिमात्र तितुके राहाती । तिच्या आधारे।।
सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे करणारी वसुंधरा विविधरूपे नटली असली तरी वर्षां ऋतूत तिचे सौंदर्य अधिकच भाळते. ग्रीष्माची दाहकता शमविण्यासाठी तिच्यासोबत चराचर सृष्टी मेघदूतांच्या आगमनाची वाट पाहत असते आणि अवचितपणे झाकोळलेल्या नभातून बरसणाऱ्या जलाभिषेकाने आसमंतात मृद्गंध दरवळू लागतो. असे अंतराळीचे मेघोदक पृथ्वीवरील प्राणिमात्रामध्ये नवचतन्य निर्माण करते. मात्र याची प्रचिती घेण्यासाठी डोळसपणे निसर्गावलोकन करावे लागते .
भूमंडळी धावे नीर । नाना ध्वनी त्या सुंदर।
धबाबा धबाबा थोर। रिचवती धारा।।
 मेघांचे किरीट मस्तकी धारण करून शैल-माला सुशोभित होतात आणि त्यांच्या अंगा-खांद्यांवरून वाहणाऱ्या धारा आपणांस आकर्षति करतात. पर्वत कडय़ांवरून अवखळपणे कोसळणाऱ्या या प्रपातांचा घन-गंभीर नाद दऱ्या-खोऱ्यांमधून घुमू लागतो आणि अशाच काही प्रपातांच्या दर्शनासाठी आपण आतूर होऊन घराचा उंबरठा ओलांडतो.
सह्याद्रीमंडळात कोकणप्रांत व देशाकडील भाग जोडणाऱ्या कोणत्याही घाटातून विहार करताना अशा अनेक जलधारांचे विविध रूपातील मनोहारी दर्शन घडते. मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्यातील वाडा-मोखाडा-जव्हार या दुर्लक्षित आदिवासी प्रदेशातील निसर्ग, वर्षां ऋतूत चहू अंगांनी बहरलेला आढळतो. हिरव्या रंगांच्या वाफ्यांमधून झुळझुळणारे प्रवाह, वाऱ्यावर डोलणारे तृणांकुर बघत एका वळणावर आपण स्थिरावतो. समोरील दरीत एक श्व्ोतपटल गर्द हिरव्या पाश्र्वभूमीवर खाली झेपावताना दिसतो. वैतरणा नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेला ‘विहिगावचा धबधबा’ आपल्याला खुणावत असतो. यापुढेही खोडाळा चौफुल्यापासून चहुदिशांनी जाणाऱ्या रस्त्यांवरही असे अनेक निसर्गाचे आविष्कार प्रत्ययास येतात. यापकी एखाद्या धबधब्यात चिंब होऊन देवबांध येथील श्री सुंदरनारायणाच्या गणेश मूर्तीसमोर आपण नतमस्तक होतो. अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्वारे आदिवासी बांधवाकरिता कार्यरत असलेले हे निसर्गसान्निध्यातील केंद्र म्हणजे श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम दर्शवणारे एक प्रेरणास्थान आहे. वर्षां ऋतूत येथील वातावरणात संजीवनी देणारे खळाळते पाणी पाहून म्हणावेसे वाटते ..
नाना वल्लींमध्ये जीवन। नाना फळी फुली जीवन।
नाना कंदी मुळी जीवन। गुणकारके।।
सह्याद्री अशा अनेक संजीवनींचा खजिना तर आहेच, परंतु अभिमानास्पद बाब म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर विराजमान आहेत बेलाग दुर्ग, लेणी, घळी. छत्रपती शिवराय तसेच समर्थ रामदास यांच्या पदस्पर्शाने,वास्तव्याने पावन झालेली अनेक स्थाने या गिरिकंदरी आजही आपले भग्नावशेष जपत उभी आहेत. या सर्वामध्ये रौद्र निसर्गाची प्रचिती देणारे एक स्थान म्हणजे सह्य़कडय़ांच्या कोंदणात, कोयनेच्या कुशीत सामावलेली ‘हेळवाकची रामघळ’! चिपळूण – कराड मार्गावरील कुंभार्ली घाटाचे सौंदर्य निरखित थोडे आडवाटेने, कोंढावळ्याच्या धनगरवाडय़ावरील गिरीजनांशी गुजगोष्टी करीत,गर्द वनश्रीतील ही घळ आपले स्वागत करते ती तिच्या मस्तकावरून गंगौघाप्रमाणे झेपावणाऱ्या जलपटलाच्या घनगंभीर नादाने. समर्थानी शिवथर घळीसाठी केलेले वर्णन खरे तर याच घळीसाठी समर्पक ठरते..
गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालिली बळे।
धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।।
नीरव शांततेत घुमणारा तो जल-निनाद,घळीतील वातावरण अधिकच गूढ करतो. आजही गर्द वनश्रीने बहरलेला हा एकांतवास समर्थ काळात कसा असेल याचा विचार करीत आपणही समर्थाचे स्मरण करू लागतो. समर्थानी तप साधनेसाठी निवडलेल्या अशा एकांतवासातील घळी एक वेगळीच अनुभूती देतात हे मात्र तितकेच खरे!  वर्षां ऋतूत बहरलेली परशुरामभूमी म्हणजे एक नेत्रसुखद अनुभव. प्रत्येक घाटवळणांवर बदलत जाणारा निसर्गाविष्कार बघताना आपली दृष्टी अपुरी पडते. थोडय़ा आडवाटेने गेल्यास याच निसर्गात मनसोक्त रममाण होता येते. महाडच्या अलीकडील वाटेने सावित्री नदीच्या सोबतीने आपण जसे घाटरस्ता चढू लागतो तसे तिचे खोरे अधिकच रमणीय भासू लागते. पुढे तिचे पात्र आंबेत पूल ओलांडून आपण रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतो आणि मंडणगडच्या दिशेने जाऊ लागतो. काही वळणे पार करताच एका बंधाऱ्यापाशी आपली नजर जाते आणि एक विशाल जलप्रवाह आपल्याला खुणावतो. हाच प्रवाह पुढील वळणावरून खाली झेपावताना एका सुरेख प्रपाताचे दर्शन घडवतो. नीरव शांततेत त्याचा खळाळणारा आवाज वातावरणात संजीवनी आणतो.
सह्याद्रीच्या गिरिकंदरी बहरलेल्या निसर्गाचे आविष्कार बघताना अशा अनेक अवखळ प्रपातांचे विहंगम दर्शन घडते. यासाठी प्रत्येक धबधब्याखाली जाऊन भिजून िधगाणा घालण्याचीच गरज नसते. काही स्थानांचे नुसते दर्शनही नेत्रसुखद असते. फक्त ते अनुभवण्याचा समंजसपणा व निसर्गाच्या या अप्रूपाकडे बघण्याची डोळस दृष्टी असावयास हवी.