नेपाळमध्ये नुकताच विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपाने तिथल्या जनजीवनाबरोबरच गिर्यारोहण विश्वालाही मोठा फटका बसला. काही गिर्यारोहक यामध्ये मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले तर काही बेपत्ता झाले. जवळपास सर्व मोहिमा रद्द झाल्या. या भूकंपाच्या काळातच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’च्या वाटेवर असलेल्या गिर्यारोहकाचे हे हृद्य मनोगत!

एव्हरेस्ट नाहीतर किमान त्याच्या पायाशी जात त्याचे दर्शन तरी घ्यायचे हे बहुतेक सर्व गिर्यारोहकांचे स्वप्न असते. यातूनच दरवर्षी ‘एव्हरेस्ट’ बरोबरच त्याच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’च्या मोहिमा निघतात. हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे दरवर्षी या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहिमेचे आयोजन केले जाते. यंदाही आमची ही मोहीम या सर्वोच्च शिखराच्या तळाकडे रवाना झाली होती.
माझ्यासह देवेंद्र गुरव, डॉ वैभव वनारसे, भीमा राजोळे आणि अविनाश डुंबरे असे आम्ही ५ गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झालो होतो. आम्ही सर्व तयारीनिशी २३ एप्रिल रोजी काठमांडू सोडले. लुक्लापर्यंतचा विमानप्रवास झाला आणि प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. लुक्लापासूनच हिमालयाचा तो अफाट निसर्ग खुणावू लागतो. आमचा पहिलाच मुक्काम होता, मोंजो नावाच्या गावी. या गावी जाईपर्यंत या वाटेवर आपल्याबरोबर निघालेले अन्य गिर्यारोहकही भेटू लागतात. देशोदेशीचे गिर्यारोहक जणू त्यांच्या पंढरीकडे जात असतात.
पुढचा मुक्काम नामचे बझारला होता. हे गाव येण्यापूर्वीच दीड ते दोन किलोमीटर अलीकडे ‘एव्हरेस्ट व्हय़ू पॉइंट’ नावाची जागा भेटते. जगातील त्या सर्वोच्च शिखराचे इथून पहिले दर्शन घडते. त्याला हे असे प्रथम पाहताना सगळेच हरवून जातात. कॅमेऱ्यात, मनात त्याला किती साठवू असे प्रत्येकाला होते. ‘एव्हरेस्ट’चे हे दर्शन आठवणीत बंद करतच आम्ही नामचे बझार गावात दाखल झालो. या आठवणीतच आम्ही त्या रात्री झोपून गेलो.
नामचे बझार ‘एव्हरेस्ट’च्या मार्गावरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. बाजाराचे गाव. या वाटेवरील शेवटचे मोठे गाव. संपूर्ण गाव डोंगरदरीत विसावलेले. आम्ही दुसऱ्या दिवशी ‘अ‍ॅक्लमटाझेशन’साठी म्हणून या गावाशेजारीच एका डोंगरावरावर ट्रेकसाठी गेलो. अतिउंचीवर वावरताना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते. यासाठी शरीराला सतत सक्रिय ठेवावे लागते. यासाठी या डोंगरदऱ्यांमध्ये वरखाली करणे आवश्यक पडते. आम्ही हा ट्रेक करून परतलो. वाटेत ‘एव्हरेस्ट’वर आधारित इथले एक संग्रहालयदेखील पाहिले आणि आमच्या मुक्कामाच्या जागी आलो. आज आमचा मुक्काम नामचे बझारलाच होता.
दुपारची बारा-सव्वाबाराची वेळ होती. सगळे निवांत बसले होते. अचानक मोठा गडगडण्यासारखा आवाज आला. आम्ही जागेवरच हलायला लागलो. सगळे घाबरून बाहेर आलो. सगळीकडे गोंधळ उडाला होता. धावपळ सुरू झाली होती. पाठीमागे आमचे हॉटेल जास्तच हलायला लागले तसे कळाले भूकंप होतो आहे..
काही क्षणात आमचे हॉटेलच्या भिंती कोसळल्या. आम्ही आणखी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. नामचे बजार हे मुळात उतारावरचे गाव असल्याने सुरक्षित अशी जागा नव्हती. आमच्या समोर आमचे हॉटेल पडत होते. आजूबाजूची घरेही कोसळत होती. लोकांचे आवाज, आक्रोश मनाचा थरकाप उडवत होते.
काही क्षणापूर्वी आम्ही ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’च्या या मोहिमेच्या इथला निसर्ग, हिमशिखरांच्या स्वप्नवत जगात होतो. पण या स्वप्नाला या भूकंपाने एका क्षणात जमिनीवर आणले. उद्ध्वस्त केले. अचानकपणे आमचे सारे जगच बदलले होते. या साऱ्यातून सावध होत आम्ही सुरुवातीला आम्हाला सगळय़ांना सुरक्षित केले. मग पुढच्या गोष्टींची ठरवाठरव सुरू झाली. तोपर्यंत या भूकंपाने काठमांडू आणि उर्वरित नेपाळमध्ये घातलेल्या थैमानाचे वृत्त आमच्यापर्यंत येऊन धडकले. तिथली हानीची माहिती समजल्यावर तर आम्हा सगळय़ांच्याच पायाखालची जमीन सरकली. सगळय़ांच्याच चेहऱ्यावर आता भीती दाटू लागली. नामचे बझारमध्ये उतरलेल्या अन्य गिर्यारोहकांचाही हाच गोंधळ होता. यातील काहींनी तर लगेच परतीचा निर्णयदेखील घेतला. थोडय़ा वेळातच लष्काराचा एक भोंगा वाजला. काही सैनिकही आल्याचे दिसले. मदतकार्य सुरू झाले. जखमीनी हलवले जात होते. मृतदेहांना बाहेर काढले जात होते. हे सर्व सुरू असतानाच आमच्या समोर आणखी एक इमारतच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. हे सारे पाहताच आम्ही परतीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना लक्षात आले, की आमचे सामान, पैसे, खाऊ सगळे आतच त्या पडलेल्या हॉटेलमध्येच अडकले आहे. शेवटी एकदा जीव एकवटून त्या पडलेल्या खोलीत शिरलो आणि त्या ढासळलेल्या इमारतीतून आमचे सामान शोधून घेऊन आलो. अवस्था ठीक नव्हती, पण पैसे आणि खाऊ मिळाला हे खूप मोठे होते. सर्वप्रथम घरी सुखरूप असल्याचे कळवले आणि देवाचे नाव घेत परतीला लागलो.
काही वेळातच आम्ही नामचे बझार उतरण्यास सुरुवात केली. खरेतर आमचा आताही ट्रेकच सुरू होता. पण आता या चालण्याला नव्या आव्हानाची किनार होती. जिथे जीवनमरणाचा प्रश्न येतो, तिथे अंगात नवे बळ संचारते. मलाच नाहीतर आमच्यात सहभागी अगदी नवखेही जोरजोरात पावले टाकत होते. आम्ही २ ते ३ किलोमीटर उतरलो तोच भूकंपाचा आणखी एक धक्का बसला. आमच्या भोवतीचे पर्वतही हादरले. मोठमोठे दगड घसरून खाली कोसळत आले. रस्त्यांना मोठमोठय़ा भेगा पडलेल्या होत्या. वाटेत भेटणारा प्रत्येक जणच भेदरलेला होता. साऱ्या वातावरणातच थरार भरलेला होता. आम्हाला आज मोंजो गाव गाठायचे होते. वाटेत जोरसले नावाचे गाव आहे. तिथेही गिर्यारोहकांसाठी काही हॉटेल्स बांधलेली आहेत. येताना पाहिलेली ही सर्व हॉटेल्स आता मात्र या भूकंपात पडून गेलेली होती. एक दिवसापूर्वी ज्या निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होतो, त्याचेच हे रोद्र रूप पाहून अंगावर काटा उमटत होता. थोडे पुढे गेलो तर वाटेत एका ठिकाणी एक पोर्टर डोक्यावर दगड पडून मृत्यूमुखी पडलेला दिसला. रक्ताच्या थारोळय़ातील त्याचा तो मृतदेह मनाचा थरकाप उडवून गेला. डोंगरदऱ्यातील भ्रमंतीचा हा अनुभव फार भयंकर अंगावर येत होता.
संध्याकाळपर्यंत मोंजो गावी पोहोचलो. ज्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये आम्ही राहिलो होतो. त्याच्याच आश्रयाने तिथवर गेलो. पण तेदेखील पूर्णपणे पडलेले होते. सगळीकडे निराशा भरून राहिलेली होती. पण ही अशी परिस्थितीच जगण्याचे, लढण्याचे सामथ्र्य देत होती. शिक्षण देत होती. कसेबसे जेवण केले आणि ही रात्र आम्ही तशीच बाहेर काढायची ठरवली. झोप म्हणजे काय तर अंग टेकवायचे होते. रात्री झोपेत असतानाही एकदोनदा भूकंपाचे धक्के बसले. सारी रात्रच जागून काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आवरून लुक्लाच्या दिशेने चालू लागलो. किती डोंगर – टेकडय़ा खालीवर केल्या माहीत नाही. पण जगण्याच्या इच्छेने नवे बळ येत गेले आणि कष्ट, परिश्रम, थकवा, निरुत्साह, भूक या साऱ्यांवर मात करत लुक्ला गाठले. विमानाच्या तिकिटांसाठी धावाधाव केली. पण तरीही एक दिवस थांबावे लागणार होते. आमच्या प्रमाणेच अनेक जण इथे परतण्याच्या रांगेत होते. अखेर दुसऱ्या दिवशी काठमांडूत परतलो. इथे तर सर्वत्र हाहाकारच उडाला होता. आपत्तीच एवढी मोठी होती, की सर्व यंत्रणाच कोसळल्या होत्या. सारे शहरच उद्ध्वस्त झालेले. एकही इमारत धड अवस्थेत उभी नव्हती. सर्वत्र विटा-मातीचे ढिगारे. उद्ध्वस्त इमारती, फाटलेले रस्ते, पडलेली झाडे, विजेचे खांब..! याही अवस्थेत आम्ही यूथ होस्टेल शोधू लागलो. आम्ही ट्रेकला जाताना आमचे बरेचसे सामान, कागदपत्रे या यूथ होस्टेलमध्ये ठेवले होते. ती मिळवण्याच्या हेतूने धडपडत तिथे गेलो तर ही इमारतही पडलेली होती. तिथे कुणीही व्यक्ती हजर नव्हती. विचारायचे कुणाला कळत नव्हते. अशा अवस्थेत जीव मुठीत घेऊन आत शिरलो. त्या ढिगाऱ्यातून आमचे सामान शोधले. जे मिळाले ते, आहे त्या अवस्थेत घेतले आणि विमानतळाच्या दिशेने धावलो. वाटेत पशुपतिनाथ मंदिराच्या मागे ओळीने रचलेल्या चितांवर अंत्यसंस्कार सुरू होते.  ..सारेच दृश्य मोठे वेदना देणारे होते. ज्या भूमीत निसर्गाचे ते वरदान, शांततेचा तो स्पर्श आणि मानवतेची किनार अनुभवण्यासाठी दरवर्षी यायचो तिथेच हा सुन्न करणारा अनुभव वाटय़ाला येत होता.
..विमानात बसलो, विमानाने उड्डाण घेतले आणि काही वेळातच पुन्हा तो हिमालय दिसू लागला. बोलावू लागला. त्याच्या सलगीनेच भरून आले. त्याला म्हणालो, मी येतोय पुन्हा पुढच्या वर्षी!