देशातून कोकणात वाहतुकीसाठी उतरणारे अनेक घाट महाराष्ट्रात इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. नाणेघाटासारख्या प्रसिद्ध घाटवाटेबरोबरच सवाष्णी, नाणदांड, बोराटय़ाची नाळ, कावळय़ा घाट या घाटांची नावंही चटकन डोळय़ांसमोर येतात. लोणावळय़ाच्या ‘टायगर्स लीप’ पॉइंटपासून एक सरळसोट घाट कोकणातल्या भेलीव गावात उतरतो. भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ जरी या घाटाला ‘पायमोडी’ घाट म्हणत असले तरी इतिहासात हा मार्ग ‘सव घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या सव घाटावर बारीक नजर ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा, पण भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. पुण्या-मुंबईवरून एका दिवसात आणि कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा एक सदाबहार किल्ला म्हणजेच रायगड जिल्हय़ातला ‘मृगगड’ ऊर्फ ‘भेलीवचा किल्ला’.
मृगगडाला भेट देण्यासाठी गिर्यारोहकाला प्रथम खोपोली गाठावं लागतं. या खोपोलीपासून पालीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर अंबा नदीच्या पुरानं हाहाकार माजवलेलं प्रसिद्ध असं जांभूळपाडा हे गाव आहे. मृगगडाला जाण्यासाठी जांभूळपाडय़ाहून माणगाव मार्गे भेलीवला व्यवस्थित डांबरी सडक असून हे अंतर साधारणपणे १२ कि.मी.चं आहे. भेलीवकडे येतानाच आपल्याला पूर्वेकडे पसरलेली सहय़ाद्रीची अजस्र रांग दृष्टीस पडते आणि त्यापासून सुटावलेला बेलाग असा मोराडीचा सुळकाही दिसतो. भेलीवच्या मागेच मृगगडाचा तीनचार शिखरांचा छोटा डोंगर गावाला कुशीत घेऊन उभा आहे. या शिखरांपैकी शेवटच्या दोन शिखरांच्या मधल्या घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. मृगगडाची संपूर्ण पायवाट झाडीतून असल्यानं आणि मुख्य पायवाटेला अनेक ढोरवाटा फुटल्यानं पहिल्यांदा जात असल्यास गावातील माहीतगार व्यक्ती बरोबर असणं आवश्यक आहे. गावातून साधारणपणे पाऊण तासाची सोपी चढण संपते ती वर उल्लेख केलेल्या छोटय़ा घळीपाशी. या घळीतून वर जाताना एक सोपा कातळटप्पा पार करून पुढे डावीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून आपला किल्ल्याच्या छोटय़ा पठारावर प्रवेश होतो. या पठारावरून दोन वाटा फुटतात. डावीकडची खोदीव पायऱ्यांची वाट आपल्याला सर्वोच्च माथ्यावर घेऊन जाते, तर उजवीकडची कातळात खोदलेली अतिशय अरुंद अशी वाट आपल्याला किल्ल्याच्या पोटातल्या खोदीव पण कोरडय़ा टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट अत्यंत अरुंद आणि धोकादायक असून पावसाळय़ात या वाटेवरून जाण्याची जोखीम पत्करू नये. हे टाकं बघून आपण पुन्हा मागे पठारावर आलो की समोर कातळात खोदलेल्या भक्कम खोदीव पायऱ्यांवरून पंधरा मिनिटांत आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या मुख्य माथ्यावर जातानाच उजवीकडे दगडावर दगड रचून बांधलेली तटबंदी आहे. मृगगडाचा मुख्य माथा तसा लहानच असून पुढे गेल्यावर उजवीकडे देवीची एक मूर्ती एक शिवलिंग आणि एक छोटी दगडी दीपमाळ आहे. मृगगडाच्या या पहिल्या शिखरावर डावीकडे पाण्याची दोन खोदीव टाकी असून दोन्ही कोरडी आहेत. आता ही टाकी पाहिली की आपण किल्ल्याच्या मधल्या शिखराकडे जायला लागयचे. या वाटेनं जात असतानाच उजवीकडे एक छोटा उतार उतरून गेल्यावर कातळात खोदलेलं एक मोठं गुहावजा खांबटाकं असून त्यातही पाणी नाही. किल्ल्याच्या मुख्य शिखरावर आपण पोहोचलो की झाडींनी व्यापलेली काही जोती दिसतात. मृगगडाचा आकार तसा लहानच असल्यानं भेलीवमधून निघाल्यापासून दोन तासांत संपूर्ण किल्ला बघून होतो. या मुख्य शिखरावरून आपण एक छोटा उतार उतरलो की आपण किल्ल्याच्या सर्वात पश्चिमेकडच्या भागावर पोहोचलेलो असतो. या उताराच्या वाटेवरही उजवीकडे दोन कोरडी टाकी आहेत. या मृगगडाच्या या शिखरावरून पावसाळय़ात खाली दिसणाऱ्या भेलीव गावाचं आणि किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेल्या सहय़ाद्रीच्या आकाशाला टेकलेल्या रांगांचं जे काही दृश्य दिसतं त्याला खरोखरच तोड नाही! गिर्यारोहकांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. मृगगडावरील एकाही टाक्यात पाणी नसून भेलीवमधून निघतानाच पाण्याचा भरपूर साठा आपल्याजवळ ठेवावा. मृगगडाच्या या शेवटच्या टाक्यांपाशी आपली ही छोटीशी गडफेरी पूर्ण होते. पुण्या-मुंबईकडच्या ज्या गिर्यारोहकांना नेहमीच्या ठिकाणांचा कंटाळा आलाय. त्यांच्यासाठी एका दिवसाच्या ट्रेककरिता मृगगड हा सर्वोत्तम पर्याय आहे.  मृगगड पाहून झाल्यावर खोपोलीकडे परत येताना उजवीकडे मराठय़ांच्या पराक्रमानं इतिहासात गाजलेली उंबरखिंड असून एका दिवसात ही दोन्ही ठिकाणं सहज पाहून होतात.
    ल्ल  ओंकार ओक

Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू
monkey nuisance in Konkan
कोकणात माकडांचा उपद्रव टाळण्‍यासाठी देशी जुगाड
seeds worth 9 lakhs seized from farmers in Andhra Pradesh
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त