महाराष्ट्रातील हा सर्वोच्च किल्ला. नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण प्रांतातील या उत्तुंग दुर्गशिखराची उंची आहे १५६८ मीटर (५१४४ फूट) ! साल्हेरच्या उंचीच्या आकर्षणातून अनेक भटक्यांचे पाय त्याच्या या शिखराकडे धावतात. आता वर्षांऋतू सुरू होताच या उंचीला निसर्गाच्या रंगपंचमीचेही सौंदर्य बहाल झाले आहे. श्रावणाच्या या ऊन-पावसाच्या खेळात साल्हेरच्या या हिरवाईला अवकाशाच्या निळाईने जणू पांघरले आहे.