सहल, ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. इथे रुजण्यासाठी, बहरण्यासाठी काही गोष्टींची सवय, अभ्यास, जाणीव, काळजी असावी लागते. या जगातील याच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची माहिती देणारी ही चौकट दर पंधरवडय़ाने.पेहराव ट्रेकिंगचे जग हे निसर्गाच्या सान्निध्यात, आभाळाच्या उघडय़ा छताखाली आणि डोंगर-दऱ्यांच्या पायवाटेवर धावत असते. तेव्हा या जगात वावरताना पेहरावाला खूपच महत्त्व असते.* ट्रेकिंग करताना कायम पूर्ण बाह्य़ांचा शर्ट-पॅन्ट घालावी.* वाटा-आडवाटांवरून, जंगल-झाडीतून भटकंती करताना बिनबाह्य़ांचे शर्ट, तोकडय़ा पॅन्ट (बर्मुडा, थ्रि फोर्थ) घालू नये.* ट्रेकला जाताना डोक्यावर टोपी आणि पायात बूट असणे आवश्यकच आहे.* ट्रेक करताना पायात कापडी किंवा खेळाचे बूट घालावेत. या बुटाचे तळवे चांगले असल्याची खात्री करावी. जेणेकरून अवघड वाटेवरून खाली-वर करताना पायांना चांगली पकड मिळेल.* चप्पल, सँडलवर ट्रेक कराल तर थोडय़ाच वेळात तुमचीच अवस्था फाटकी होईल.* भर उन्हात फिरताना टोपीबरोबरच एखाद्या मोठय़ा रुमालाने मानदेखील झाकावी.* मुक्कामी ट्रेकला जाताना मोज्यांचा एखादा जादा जोड बरोबर ठेवावा.* बाहेर, उघडय़ावर झोपताना पायात मोजे घालून तसेच कान झाकून झोपावे.* सॅक भरताना रुमाल, नॅपकिन घेण्यास विसरू नका.* भटकंतीचे स्वरूप पाहून‘गॉगल’बरोबर घ्यावा.ल्ल ट्रेकिंग हा डोंगरदऱ्यातून चालणारा खेळ असल्याने कुठलाही पेहराव हा हलका, कमी वजनाचा असावा. शरीराभोवती घट्ट कपडे घालू नयेत.