ट्रेनमध्ये रामेश्वरमची चर्चा सुरू असताना दक्षिणेत जायचा बेत आखला आणि बुकिंग केले, असे रामेश्वरमला आलेल्या अनुराधा कुलकर्णी सांगत होत्या. जोडून सुट्टय़ा मिळाल्या की पर्यटनाचा बेत आखण्याचा ट्रेंड सध्या रुळलाय. खास धार्मिक पर्यटन डोळ्यापुढे ठेवून हॉटेल दैविकने रामेश्वरमला आपल्या फोर स्टार हॉटेलच्या सेवेद्वारे पर्यटकांना आकर्षित केले आहे. मदुराईपासून रामेश्वरम १७० कि.मी. अंतरावर आहे. चार धामांपैकी दक्षिण धाम म्हणून रामेश्वरम प्रसिद्ध आहे. लंकेवरील विजयानंतर
प्रभुरामचंद्रांनी अगस्ती ऋषींच्या सूचनेवरून शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. रामेश्वरमच्या मंदिराचा आतील परिसर अवाढव्य आहे. स्नानासाठी विविध २२ कुंड या परिसरात आहेत. याच परिसरात अनेक मंदिरे आहेत. यात राम पादम मंदिरही आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे हे येथील एक वैशिष्ठय़.  रामेश्वरमला जाताना पाम्बन पुलावरून निसर्गाचे विलोभनीय दृष्य दिसते. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर असा हा महाकाय पूल आहे. मदुराईहून याच मार्गाने रामेश्वरमला जाता येते. मार्गात दुतर्फा बेटे आहेत. यातल्या काही बेटांवर जाता येते. रामेश्वरम हे रेल्वेचे शेवटचे स्टेशन. त्याच्या पुढे असलेले धनुषकोडी श्रीलंकेच्या सीमेलगतचे शेवटचे शहर. मात्र १९६४ च्या वादळात हे गाव उद्ध्वस्त झाले. रेल्वे स्टेशन, शाळा यांच्या भग्न इमारती पाहायला मिळतात. त्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. या वादळात बळी गेलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धनुषकोडीच्या रस्त्यावर स्मारक उभारण्यात आले आहे. त्याची अवस्था सध्या फारशी चांगली नाही. रामेश्वरहून धनुषकोडीला जाताना १२ किलोमीटर अंतर रेतीतून जावे लागते. जीपखेरीज या परिसरात जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. एकेकाळी या भागातले प्रमुख शहर असलेल्या धनुषकोडीत आज मूलभूत सुविधांचा अभाव आहे. वादळाचे भीषण परिणाम येथील जनता भोगत असल्याचे प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या द्वारकाप्रसाद पांडियान यांनी सांगितले.धनुषकोडीत बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम आहे. रामाने लंकेला जाण्यासाठी येथून सेतू बांधल्याचे सांगितले जाते असे हे ठिकाण आहे. निळेशार पाणी, शांत वातावरण असे इथले मनोहारी दृष्य असते. संध्याकाळनंतर इथे पाणी वाढत जाते. त्यामुळे संध्याकाळी येथे जाणे जवळपास कठीण होते. रामेश्वरम परिसरात विवेकानंदांचे स्मारकही प्रेक्षणीय आहे. कन्याकुमारीला जरी विवेकानंदांचे भव्य स्मारक असले तरी रामेश्वरममधील छोटेखानी स्मारकाचा परिसर सुरेख आहे. १८९३ मध्ये अमेरिकेतल्या धर्मसंसदेतील भाषणानंतर कोलंबोमार्गे १८९७ मध्ये विवेकानंदांचे पाय पहिल्यांदा या भूमीला लागले. या स्मारकाच्या वरच्या मजल्यावरून रामेश्वरम परिसरातील विविध बेटे कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून पाहता येतात. धनुषकोडीहून परतताना शेकडोंच्या संख्येने दिसणारे फ्लेमिंगो हे एक वैशिष्ठय़. जानेवारी ते मार्च असे तीन महिने फ्लेमिंगोंचे या भागातल्या बेटांवर वास्तव्य असते नंतर ते ऑस्ट्रेलियाला परततात. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून संशोधन करून वैशिष्ठय़पूर्ण माहिती देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याचे ‘दैविक ‘चे व्यवस्थापकीय संचालक देवाशिष घोषल यांनी सांगितले. स्थानिकांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती वाढवून त्यांचा जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे. शिर्डी किंवा त्र्यंबकेश्वरमध्ये अशाच प्रकारची योजना सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. पर्यटन उद्योग सध्या झपाटय़ाने वाढतोय. त्यात लोकांचे जीवनमान उंचावल्याने कामाच्या धबडग्यातून वेळ काढून सहलीला जाण्याच्या योजना आखल्या जातात. याच संधीचा फायदा घेऊन पर्यटन कंपन्या योजना जाहीर करतात.