सायकल रेस म्हटलं की सगळ्यांना टूर द फ्रान्स आठवते, पण त्याहीपेक्षा अवघड रेस आहे ती ‘रॅम’. म्हणजेच ‘रेस अक्रॉस अमेरिका’. बारा दिवसांत चार हजार आठशे किलोमीटर अंतर सायकलवरून आख्खी अमेरिका पार करायच्या या स्पर्धेसाठी सुमीत पाटील या मराठी तरुणाची निवड झाली.

भारतातील प्रत्येक तरुण-तरुणीला अमेरिकेला जाण्याची इच्छा असते. काहींना शिक्षणासाठी जायचं असतं, काहींना नोकरीसाठी, काहींना नुसतंच टाइम्स स्क्वेअरमध्ये उभं राहून फोटो काढायची इच्छा असते, तर काहींना डिझ्ने लॅण्डला भेट द्यायची असते. पण तुम्हाला कुणी सांगितलं की एक तरुण सायकल चालविण्यासाठी अमेरिकेला जात आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? त्याहीपुढे तुम्हाला कळलं की हा तरुण अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाचा प्रवास हा विमानाने नव्हे तर सायकलने करणार आहे, तर तुम्ही त्याला ठार वेडा ठरवून मोकळं व्हाल. पण ह्य वेडेपणामुळेच तो इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू पहात आहे. अलिबागचा सुमित पाटील हा २८ वर्षीय तरुण हा इतिहासातील सर्वात कठीण ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ (फअअट) ह्य सायकल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जगात सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम जवळपास दोन हजारहून अधिक व्यक्तींच्या नावावर आहे. मात्र ही स्पर्धा आजवर जेमतेम दोनशे सायकलस्वारांनाच पूर्ण करता आली आहे. यावरूनच या स्पर्धेसाठी लागणारी कसोटी लक्षात येईल. विशेष म्हणजे हा मान मिळवणारा सुमित केवळ तिसरा भारतीय आहे. मात्र आधीच्या दोघांना ही स्पर्धा पूर्ण करता आलेली नाही, त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय होण्याचा सुमितचा मानस आहे. भारतात सायकलिंग या खेळाकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही, परंतु हल्ली तरुणांचा सायकलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. तारुण्य आणि ऊर्जा यांची योग्य वयात सांगड घातली गेली पाहिजे असे आपण म्हणतो. पण त्याला थोडी जिद्दीची फोडणी दिली की असाध्य गोष्टीही साध्य करता येतात, हे इतिहास सांगतो. म्हणूनच सुमितचा या स्पर्धेतील सहभाग फार महत्त्वाचा आहे. सुमित या स्पर्धेत यशस्वी झाल्यास सायकलिंगला वेगळं परिमाण प्राप्त होईल.
आजही सायकल स्पर्धा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येते ती फक्त ‘टूर द फ्रान्स’ ही स्पर्धा. मात्र, रॅम आणि ‘टूर द फ्रान्स’ या स्पर्धेत खूप फरक आहे. ‘टूर द फ्रान्स’ या शर्यतीमध्ये पाच हजार किलोमीटरचे अंतर १९ टप्प्यांमध्ये २१ दिवसांत पूर्ण करायचे असते. परंतु ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ स्पर्धेत चार हजार आठशे किलोमीटर अंतर एकाच टप्प्यात सलग १२ दिवसांमध्ये पार करत संपूर्ण अमेरिका पालथी घालायची असल्याने ही जगातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा मानली जाते. ‘रॅम’ अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील ओशियन पीएर येथून सुरू होऊन अ‍ॅनापोलिस, मेरीलँड (ईस्ट कोस्ट) येथील सिटी डॉक येथे संपते.
स्पर्धेच्या पात्रतेसाठी बंगळुरू ते उटी आणि परत असे एकूण ६०१ किलोमीटरचे अंतर ३२ तासांत पार करायचे होते. सुमितने हे अंतर केवळ ३० तास ५२ मिनिटांत पूर्ण केले.
या वर्षी ही स्पर्धा १० ते २१ जून या कालावधीत होणार आहे. अमेरिकेतील १२ राज्ये आणि ८८ काऊंटी पार करत साधारण १७० हजार फुटांची उंची आणि जवळपास चार हजार आठशे किलोमीटरचा हा पल्ला सुमितला अवघ्या १२ दिवसांमध्ये पार करायचा आहे. स्वाभाविकच स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज ४०० किलोमीटर सायकल चालवणे गरजेचे असते. दिवसाच्या २४ तासांत तुम्हाला ऊन, पाऊस, वारा, थंडी, चढ-उतार या सर्वाचाच सामना करत ४०० किलोमीटर सायकलिंगसोबत झोप, भूक व अन्य गोष्टी करायच्या असतात. एवढेच नव्हे तर विविध प्रदेशांतून जाताना बारा दिवसांच्या कालावधीत शून्य अंश तापमानापासून ते ४५ अंश तापमानाच्या प्रदेशातून चढ-उतार असलेल्या रस्त्यांवर सायकल चालवावी लागते. सायकलस्वार हा जवळपास १८ ते २० तास सायकलवरच असतो. स्पर्धेच्या कालावधीत दोन अधिकच्या सायकली, त्यांचे पार्ट्स, राहण्या-जेवण्याची व्यवस्था यासाठी ‘टीम अग्नी’ची स्थापना करण्यात आली असून सुमितला आवश्यक ते साहाय्य या टीमतर्फे पुरविण्यात येणार आहे. एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि सर्व सुविधांचा खर्च हा जवळपास ४० लाखांच्या घरात आहे. या खर्चापैकी सुमितच्या अनेक जवळच्या मित्रांनी त्याला हातभार लावून १० लाख रुपयांची रक्कम एकत्र केली असून उर्वरित ३० लाख रुपयांचा भार रोटरी क्लब, वरळी उचलत आहे. विशेष म्हणजे रोटरी क्लब या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एक समाजकार्य करणार आहे. पायाने अपंग असलेल्या व्यक्तींनी जयपूर फूटची मदत रोटरीतर्फे करण्यात येणार आहे. सुमित एकूण तीन हजार मैल सायकल चालवणार असून, रोटरी क्लब प्रत्येक मैलासाठी एका जयपूर फूटची मदत करण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण तीन हजार व्यक्तींना जयपूर फूटद्वारे आपल्या पायावर पुन्हा उभे राहता येणार आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमितचे वडील आरसीएफमध्ये नोकरीला असून, आई टपाल खात्यात आहे. सुमितला संगीताची उत्तम जाण असून, तो उत्तम बासरीवादकही आहे. त्यामुळे मुंबईबाहेर लांबच्या सायकल टूरवर सुमितसोबत जाणाऱ्या मित्रांना दिवसभर सायकल चालविल्यानंतर रात्री सुरेल बासरीवादनाची ट्रीट ठरलेली असते.
गेल्या चार वर्षांत सुमितने सायकलिंग करताना ५० हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर बीआरएम स्पर्धामध्ये भाग घेताना पाच हजार चारशे किलोमीटर सायकल चालवली आहे. ‘डेझर्ट-५००’ आणि ‘अल्ट्रा बॉब’सारख्या अतिउष्ण प्रदेशात सायकल चालवण्याच्या स्पर्धाचाही अनुभव सुमितच्या गाठीशी आहे. विशेष म्हणजे, आजवर सुमितने सायकलवर पार केलेले सर्व अंतर मोजल्यास ते अंतर एका जगप्रदक्षिणेहूनही अधिक भरेल.

एका विशिष्ट कालावधीनंतर शरीर तुमची कसोटी पाहात असतं आणि त्या वेळी तुम्ही तुमच्या मेंदूशी खेळायला लागता. तुम्ही जितका वेळ मेंदूशी खेळू शकाल तितका लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकता, असं सुमितचं लाडकं तत्त्वज्ञान आहे.

लहानपणापासूनच सह्यद्रीच्या डोंगररांगामध्ये भटकणाऱ्या सुमितचा फक्त सायकल चालवणे नव्हे तर सायकलिंगशी निगडित प्रत्येक गोष्टीचा दांडगा अभ्यास आहे. सुमित २००१ पासून मुंबईत प्रभादेवी येथे राहतो. रुईया महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर सुमितला लष्करात जाण्याची इच्छा होती. मात्र, अचानक झालेल्या अपघाताने त्याची संधी हुकली. तरीही यूपीएससीच्या माध्यमातून लष्करी सेवेत जाण्याची त्याची महत्त्वाकांक्षा अद्याप कायम आहे.
सायकलिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मित्र-मैत्रिणी आणि सोशल लाइफपासून दूर सध्या पुण्याला स्थायिक झाला आहे. सरावासाठी तो सकाळी सायकलने तीन तासांत महाबळेश्वरला जातो आणि दुपारी जेवायला पुण्यात परत येतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत तो विशेष पथ्य पाळत नसला तरी भरपूर पाणी पितो आणि सर्व गोष्टी खातो. भारतीय पदार्थ खूप पौष्टिक आहेत. अति तेलकट पदार्थ टाळणे आणि पोटभर खाणे, एवढंच तो पाळत असतो.
स्पर्धेमध्ये उतरल्यावर ती स्पर्धा सगळ्यांआधी पूर्ण करणाराच फक्त विजेता नसतो, तर ती स्पर्धा पूर्ण करणारा प्रत्येकजण विजेता असतो, असं सुमितला वाटतं. एका विशिष्ट कालावधीनंतर शरीर तुमची कसोटी पाहात असतं आणि त्या वेळी तुम्ही तुमच्या मेंदूशी खेळायला लागता. तुम्ही जितका वेळ मेंदूशी खेळू शकाल तितका लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकता, असं सुमितचं लाडकं तत्त्वज्ञान आहे.
या स्पर्धेद्वारे रोटरीच्या जयपूर फूटसाठी योगदान देणारा सुमित याबाबत बोलताना अधिक नम्र होतो. माझ्या सायकलींमुळे कुणी स्वत:च्या पायावर उभं राहू शकत असेल तर याहून वेगळा आनंद असूच शकणार नाही.
सलग २० तास सायकलिंग करणारा सुमित मित्रांशी बोलायला बसल्यावर तासन्तास गप्पांमध्ये रंगतो. त्यामध्ये सायकलींपासून संगीत, भौतिकशास्त्र आणि खाण्याच्या रंजक गोष्टींचे पुरेसं खाद्य त्याच्याजवळ नेहमीच असतं. घरी आलेल्या मित्रांना आवर्जून चहा अथवा हॉट चॉकलेट बनवून देणं आणि जमिनीवर बसकण मांडून सायकल टूरमधील गमती, निरनिराळे अनुभव सांगणारा सुमित पाहिला की, तो एका ऐतिहासिक मोहिमेवर निघाला आहे, यावर विश्वासच बसत नाही.