पाऊस आल्याची पहिली वर्दी घाटमाथ्यांना मिळते.
यामुळेच खऱ्या भटक्यांची पावले बरोबर या काळात अशा घाटवाटांकडे वळतात. यातल्याच वरंधच्या वाटेवर आज भटकूयात.
मोरपिसांचा पाऊस यावा
निळसर हिरव्या हळव्या रात्री
स्पर्शलिपीतच लिहिले जावे
हस्तिदंती रेखीव गात्री।
खरेच पाऊस येतो तो मोरपिसांप्रमाणे भुलवत, त्याच्या त्या हिरव्या-निळय़ा-जांभळय़ा रंगांची उधळण करत. त्याचे हे रंगच भुलवतात. ओला स्पर्श मन आतूर करतो आणि मग पाऊस पाहायला नव्हेतर तो अनुभवायला हे मन बाहेर पडते. कुठे कुठे हा पाऊस अनुभवता येतो! गावाबाहेर, डोंगरावर, दरीत, गडकिल्ल्यांवर, खळखळत्या नदीच्या काठाशी आणि धबधब्याच्या पायाशी! फुलांच्या पठारावर अन् भाताच्या शेतावर! डोंगररानी- वाडीवस्ती- वाटा अशा साऱ्यांच ठिकाणी! जिथे पावसाला तुम्ही आणि तुम्हाला पाऊस हवाहवासा वाटतो.
खरेतर पाऊस आल्याची पहिली वर्दी मिळते ती घाटमाथ्यांना! यामुळेच खऱ्या भटक्यांची पावले बरोबर या काळात अशा घाटवाटांकडे सुरू होतात. पाऊस शोधू-अनुभवू पाहतात. सहय़ाद्रीच्या रूपाने साऱ्या महाराष्ट्रालाच असा घाटमाथा मिळाला आहे. त्यावर विसावलेल्या या घाटवाटा तर जणू पावसाचे घरच बनलेल्या असतात.
अगदी नाशिक-इगतपुरीजवळच्या कसारापासून ते तळ कोकणातील अंबोलीपर्यंत. या साऱ्या घाटवाटा वर्षांकाळी पावसात बुडालेल्या असतात. कसारा, माळशेज, खंडाळा, ताम्हिणी, वरंध, आंबेनळी, कुंभार्ली, अंबा, गगनबावडा, फोंडा, अंबोली आणि अशाच कितीतरी! यातीलच वरंध घाटाची वाट आज आपल्याला खुणावते आहे.
पुण्याहून भोर मार्गे महाडकडे गेलेल्या राज्यमार्गावर हा वरंध घाट. या घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थाची शिवथरघळ आहे. या शिवथरघळीत येऊ लागलो, की आपले पाय पहिल्यांदा या घाटातच अडकतात. यातच ढग-पावसाचा खेळ सुरू असेल, तर अडकणारे पाय काही काळ घट्ट होतात.
खरेतर या पावसाचा स्पर्श भोर सोडतानाच होऊ लागलेला असतो. भोवतीच्या निळय़ा-जांभळय़ा डोंगररांगा, भुरभुरणारा पाऊस, भातखाचरांमधील लगबग ही सारी दृश्ये त्या वर्षांऋतूत भिजवून टाकत असतात. डाव्या हाताचे ‘दुर्गा’ शिखर, नीरा देवघर धरण पाहता-अनुभवता तो अधिक घट्ट होतो. वरंध घाटात पोहोचेपर्यंत हे सारे वातावरणच कुंद होऊन जाते.
घाटाच्या ऐन मध्यात वाघजाई मंदिर! या मंदिरासमोर येऊनच आपण थबकतो. इथून हा घाट आणि त्या भोवतीचा परिसर निरखू लागतो. पंचवीस-तीस किलोमीटर लांबीचा हा घाट म्हणजे सहय़ाद्रीच्या उभ्या धारेला छेदणारा. यामुळे इथून या सहय़ाद्रीचे अनेक डोंगर-पर्वत अक्राळविक्राळ रूप घेत आपल्यापुढे उभे ठाकतात. यातही वाघजाई समोरचे पर्वत तर मनात धडकी भरवतात. पण हेच राकट कातळकडे पाऊस कोसळू लागला, की पाणी पिऊन हिरवेगार होतात. मग त्यांच्या या हिरवाईवरून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत चारी दिशांना कोसळू लागतात. वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर तर एखाद्या अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. धो-धो पाऊस कोसळू लागला, की त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. हा एखादा महारुद्राभिषेक वाटू लागतो. हिरवे डोंगर आणि त्याच्याशी झटणारे ढगांचे पुंजके आणि कोसळणाऱ्या असंख्य जलधारा.. काय पाहू आणि किती साठवू असे होते.
या घाटवाटा एरवी देश कोकणात ये-जा करण्यासाठी, पण तेच पाऊस कोसळू लागला, की त्या येत्या-जात्याला थांबवणाऱ्या होतात. या वाटेवर येताना त्यांचे हे ओलेचिंब दृश्य पाहून आधी मन आणि मग शरीर भिजते. पाऊस, ढग, हिरवी गिरिशिखरे आणि त्यावरून वाहणाऱ्या त्या जागोजागीच्या जलधारा! जणू साऱ्यांनाच इथे अधिरता आलेली असते. त्या उत्तुंग नभाला जणू भूमीच्या भेटीची ओढ लागलेली असते. ही भेट घडते आणि त्यातूनच वर्षांऋतूचे हे चैतन्य उमलते.
‘या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे।’
असे म्हणणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोरांचे ‘नभाचे दान’ आणि ‘मातीतले चैतन्य’ हे अशा एखाद्या पावसाळी घाटवाटेवर अडकलो, की उमगून जाते.
निसर्गाच्या नवलाईचे हे अप्रूप घोट घ्यावेत आणि वाघजाईचे दर्शन घेत घाट उतरू लागावे. पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजे एक दुर्गच आहे. कावळय़ा ऊर्फ मनमोहनगड असे त्याचे नाव. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाक्या आहेत. तर दुसऱ्या बाजूस अशाच काही टाक्या, शिबंदीच्या घरटय़ांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली. घाटातल्या या खिंडीजवळ आलो, की तिच्या या लांबी, रुंदी आणि उंचीबरोबरच मग तिचा हा प्रदीर्घ प्रवास आठवतो आणि मग कोकणातून देशावर येण्याचा दरवाजा म्हणून याचा कुणीतरी फार पूर्वी ‘द्वारमंडप’ असा केलेला उल्लेखही मनाला भावून जातो.
हे सारे पाहता-अनुभवतानाच मधेच ढगांचा पदर या साऱ्या दृश्यावर आच्छादला जातो. त्या अदृश्यतेतही तो घाट आपल्याशी बोलू पाहतो. समोरच्या दरीत कोंदलेला पाऊस आपल्याला काही सांगू लागतो. त्याचे आतले मन रिकामे करू पाहतो. ..ही लिपी स्पर्शाची असते, ही भाषा गंधाची असते. इथे डोळय़ांचे भरून घेणे असते आणि हृदयाचा ठोका चुकवणेही! .. घाटातला हा पाऊस मन चिंब करून टाकतो!!