आडवाटा हिंडायचा छंद जडला, की अनेकदा नियोजित ठिकाणी जाताना वाटेतच एखादे स्थळ आपले पाय रोखून धरते. पिंपरी-दुमाला नामक एका छोटय़ा गावातील सोमेश्वराचे मंदिर पाहिल्यावरही असेच झाले.
पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथून या पिंपरी-दुमाल्यात जाण्यासाठी रस्ता आहे. पुण्याहून िपपरी-दुमाल्याचे अंतर भरते अंदाजे पन्नास किलोमीटर. गावापर्यंत थेट एस.टी.ची सुविधा नसल्याने स्वत:चे वाहन घेऊनच इथे यावे लागते. अन्यथा रांजणगावला उतरून महागणपतीचे दर्शन घेत उरलेल्या पाच किलोमीटरसाठी ‘विनोबा एक्स्प्रेस’ पकडावी!
गावात शिरल्याबरोबर वड-पिंपळासारख्या अनेक जुन्या मोठाल्या वृक्षांच्या सावलीने सुखावून जायला होते. या वृक्षांच्या कमानीतूनच त्या कोरीव सोमेश्वर मंदिराचे दर्शन घडते. इथे आडबाजूला असलेले हे ‘लेणे’ पाहून प्रथम थक्क व्हायला होते.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या बाह्य़ व अंतर्गत दोन्ही भागांवर मुक्तहस्ते कोरीव काम केले आहे. आत शिरण्यापूर्वी बाह्य़ भागावरील शिल्पांकनाकडे लक्ष जाते. विविध देवतांच्या ध्यानमुद्रा आणि सूरसुंदरींची सौंदर्यशिल्पं पाहताना एखाद्या लेण्यात फिरत असल्याचा भास होतो. दर्पणाधारी, मृदंगवादक, बासरीवादक, नर्तिका, फळांचा घोस हातात घेतलेली, पायातील काटा काढणारी, स्वत:चे सौंदर्य न्याहाळणारी अशा अनेक सूरसुंदरींची शिल्पं या मंदिरावर स्थिरावली आहेत. युगुल, मातृशिल्प, नागकन्या आणि कावडधारी, छत्रधारी पुरुषमूर्तीही यामध्ये दिसतात. या दरम्यानच नंदीवर स्वार महादेव, चामुंडा, भैरव, गणेश, ब्रह्मदेव आदी देवतांची कोष्टके आहेत. अनेक घडय़ांच्या या बाह्य़भिंतीवर या शिल्पकामाबरोबर कीर्तिमुखांचा नक्षीपटही कोरलेला आहे. राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवकालीन अनेक मंदिरांवर असे शिल्पांकन दिसते. पण ‘सोमेश्वर’मधील शिल्पांमध्ये सौष्ठवता आणि प्रमाणबद्धतेचा अभाव दिसतो.
हे सारे पाहत मंदिरात शिरावे. मंदिराला पूर्व, उत्तर व दक्षिण अशा तीन बाजूंनी सालंकृत प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांवर विविध निसर्ग रूपकांच्या शाखांची रचना आहे. तळाशी शिवगण कोरलेले आहेत. मंदिराचा सभामंडप सालंकृत अशा बारा स्तंभांवर उभारला आहे. विविध भौमितिक आकारातील या स्तंभांवर काही शिल्पंही कोरली आहेत. यात चार पायांवर बेतलेले तीन शरीरांचे एक शिल्प अवश्य पाहावे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वारही अत्यंत कोरीव आहे. गणेशपट्टीभोवती हार घेतलेल्या अप्सरांची मोठी शंृखला आहे. त्या भोवतीची कमान पाने, फुले, पक्षी आदी निसर्गरूपकांनी सजवली आहे. तळाशी पुन्हा शिवगण दिसतात. गाभाऱ्यात या मंदिराला साजेसे असेच कोरीव शिवलिंग आहे.
या मंदिर परिसरातच पुष्करणीची रचना आहे. पण त्यातले पाणी या जलवास्तूवर रुसलेले आहे. याशिवाय मंदिर परिसरात आणखी काही कोरीव शिल्पंही दिसतात. यामध्ये मंदिराच्या दर्शनी भिंतीलगत एका कोरीव आसनावर ठेवलेल्या सालंकृत विष्णू मूर्तीकडे प्रथम लक्ष जाते. शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे घेतलेल्या या विष्णूच्या पायाशी गरुड, लक्ष्मी आणि त्यापाठी सेवक-सेविका दिसतात. विष्णूभोवतीच्या नक्षीदार प्रभावळीत दशावतारांची रचना आहे. या प्रभावळीतच ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची शिल्पं आहेत.
मंदिराच्या उत्तर अंगास असलेली शेषशायीची मूर्तीही अशीच लक्षवेधी. शेषावर पहुडलेले विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मी अशा या शिल्पाच्या माथ्यावरही दशावताराचा पट कोरलेला आहे. मंदिराच्या पुढय़ातील यज्ञवराह आणि मत्स्य अवताराची शिल्पं तर विलक्षण आहेत. वराहाच्या अंगावरील झुलीतील प्रत्येक चौकटीत पुन्हा विष्णूची एकेक छोटी मूर्ती कोरलेली आहे. तर मत्स्य अवतार मूर्ती कोरताना तिला आडव्या शिवपिंडीची बैठक दिलेली आहे. याशिवाय अन्यत्रही विष्णूच्या काही मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या साऱ्या महत्त्वाच्या शिल्पांवरून इथे पूर्वी एखादे विष्णूचे मंदिर असावे असे वाटते. तसेच या सर्व शिल्पांची सुबक शैली पाहता या मूर्ती व तत्कालिन मंदिर  प्राचीन असावे असे वाटते.
सोमेश्वर मंदिराच्या काही भागास नुकतीच रंगरंगोटी केली आहे. खरे तर या अशा प्राचीन मंदिरांना असे तांबडे-निळे रंग फासून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट करू नये. अशा जीर्णोद्धाराच्या वेळी गावक ऱ्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे साहाय्य जरूर घ्यावे.
सोमेश्वर मंदिर पाहिले, की हे इतके देखणे मंदिर कोणी निर्माण केले असेल असा प्रश्न पडतो. पण याबाबतीत कुठलाच ठोस पुरावा मिळत नाही. इथले गावकरीही मग नेहमीप्रमाणे या निर्मितीचे श्रेय पांडवांना देतात. पण या मंदिराची रचना, बांधणी त्यावरील कोरीव काम पाहिले, की ते सात-आठशे वर्षे जुने असावे असे वाटते.
या सोमेश्वर मंदिराशेजारीच रामेश्वराचेही प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासमोर एक विस्तीर्ण पुष्करणी आहे. ही दोन्ही मंदिरे आणि परिसर गावक ऱ्यांनी स्वच्छ-नीटनेटका राखला आहे. जुन्या वटवृक्षांनी तो फुलवला आहे. या वृक्षांवरील असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आणि इथले मंदिरांचे शिल्पवैभव पाहताना दिवस कसा संपतो हे अंधारून आल्यावरच कळते.
  

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद