उन्हाळा हा खरेतर हिमालयातील मोहिमांचा काळ. या काळात हिमालयाच्या विविध भागात गिर्यारोहकांची पावले पडत असतात. यातील कुमाऊँ भागातील रूपकुंडचा हा ट्रेक! साहसातून निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा!
दरवर्षी उन्हाळय़ात हिमालयातील एक ट्रेक हे आमचे अनेक वर्षांचे गणित ठरलेले आहे. २०१३ साली या वारीत आम्ही रूपकुंडला जाण्याचे ठरवले. पण त्या वर्षी खूप मोठी हिमवृष्टी झाल्याने आम्हाला हा ट्रेक थोडासा उन्हाळय़ानंतर पावसाळय़ात करावा लागला. पण या ऋतूमध्येही या डोंगरवाटेने आम्हाला भुरळ पाडली आणि आम्ही हिमालयाच्या आणखी प्रेमात पडलो.
तेराजणांच्या आमच्या या संघाने बरोबर २० ऑगस्ट रोजी रूपकुंडच्या या ट्रेकसाठी प्रस्थान ठेवले. रूपकुंड हा कुमाऊँ  भागातील ट्रेक! यासाठी पुणे-दिल्ली-हृषीकेश-कर्णप्रयाग-लोहाजंग असा आमचा प्रवास ठरलेला होता. तर लोहाजंगपासून पुढे ट्रेक सुरू होतो.
ट्रेकच्या पहिल्या दिवसाचे चालणे साधारण ५ तासांचे होते. लोहाजंग ही जागा डोंगरावर आहे. तेथून निघून समोरील डोंगरावर दिदना येथे आम्हाला मुक्काम करायचा होता. लोहाजंगचा डोंगर उतरायला दोन तास लागले. त्यानंतर नीलगंगा नदी ओलांडून दिदनासाठीचा डोंगर चढायचा होता. या नदीच्या परिसरात जळवा आहेत. आमच्यातील काहींना या जळवांनी आपले अस्तित्व दाखवले. लोहाजंग ते दिदना हा ट्रेक दाट झाडीतून आहे व या दरम्यान हिमालयातील विविध पक्षी दिसतात. सुमारे तीन तासांच्या चढानंतर आम्ही दुपारी दिदनाला पोहोचलो. हवा दिवसभर ढगाळ होती आणि दुपारनंतर थोडा पाऊसही आला.
दुसऱ्या दिवशी दिदना येथून निघून अली बुग्यालच्या आधी मुक्काम करायचा होता. हे अंतर ३.३० तासांचे आहे. दिदना साधारण ८५०० फुटांवर आहे व अली बुग्याल साधारण १०,००० फुटांवर. हा प्रवाससुद्धा दाट जंगलातून आहे. वाटेत हे वनस्पती वैभव, विविध जातींची मश्रूम पाहात आणि पक्ष्यांचे आवाज ऐकत आम्ही मुक्कामी कधी पोहोचलो ते कळलेसुद्धा नाही. आता झाडी विरळ होत संपत आली होती. आमचे मुक्कामाचे स्थळ बुग्याल म्हणजे तर एक गवताचे कुरणच होते.
तिसऱ्या दिवशी आमचा मुक्काम होता वेदनी बुग्यालला. हे ठिकाण १२,००० फूट उंचीवर आहे. सुरुवातीच्या काही वेळातच ट्री लाईनच्या वर आम्ही पोहोचलो. आता खालची झाडी खूपच गर्द आणि काळपट हिरवी दिसत होती. आम्ही चाललो तिथे आजूबाजूला सर्वत्र मैलोनमैल हिरवा गालिचा पसरला होता. यावर विविधरंगी छोटी-छोटी फुले उमलली होती. या गवतात खेचरे व घोडय़ांचे कळप चरत होते. तर कुठे एखादा बकरवाल आपल्या बक ऱ्या घेऊन चालला होता. बुग्याल व वेदनो बुग्याल या दोन्ही जागा अतिशय सुंदर होत्या. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या सर्व भागात नाना जातींची रानफुले उमलतात. यावेळी तर या स्थळाचे सृष्टीसौंदर्य अगदीच बहराला येते.
चौथ्या दिवशी आमचे लक्ष्य होते बगुवाबासा. हा रूपकुंडच्या अलीकडचा शेवटचा मुक्काम साधारण १४,५०० फुटांवर आहे. सकाळी वेदनी बुग्याल येथून निघालो. सुरुवातीपासूनच चढाचा रस्ता होता. वाटेत पाथेर नाचनी येथे वनखात्याचे छोटे कार्यालय आहे. येथून पुढचा रस्ता चांगलाच चढाचा आहे तो थेट कैलू विनायकपर्यंत. येथे येईपर्यंत भरपूर दमछाक होते. आता आपण १५,००० फुटांवर येतो. इथे या उंचीवर गणपतीचे एक छोटेसे मंदिर आहे. येथून नंदाघुंटी आणि त्रिशूल या शिखरांचे अगदी जवळून दर्शन होते. तशी ती लोहाजंगपासूनच दिसत असतात. पण इथे अगदी आपण त्याच्या कुशीत आल्यासारखे वाटते.
आता तासभर चालून थोडेसे उतरत आपण बगुवाबासा येथे पोहोचणार. कैलू विनायकहून निघाल्यावर लगेच रस्त्याच्या दुतर्फा फुललेली असंख्य ब्रह्मकमळे आपले स्वागत करतात. हिमालयातील ही ब्रह्मकमळे आपले थेट बगुवाबासापर्यंत सोबत करतात. पिवळट-पांढरी (ऑफ व्हाईट) रंगाची ही फुले ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हिमालयात १३,००० फुटांवर काही ठिकाणी पाहायला मिळतात. या कमळांना वास नसतो
बगुवाबासा येथे पोहोचल्यावर आपण उंचावर आल्याची जाणीव झाली. या उंचीवर शरीराला अपाय सुरू होतात. आमच्यापैकी काहींचे थोडे डोके दुखू लागले पण त्याहून अन्य काही त्रास झाला नाही.
पाचव्या दिवशी सकाळी साडेसहाला रूपकुंडसाठी निघायचे होते. आज सकाळी हवा अगदी स्वच्छ होती. वर निळे नीरभ्र आकाश होते. दूरवर केदारनाथ व चौखंबा ही शिखरे दिसत होती व आम्ही त्रिशूल व नंदाघुंटी शिखरांच्या अगदी पायथ्याशीच पोहोचलो होतो. लोहाजंग येथे आल्यापासून ढगाळ हवेमुळे हिमालय दर्शन झाले नव्हते. त्याची कसर आज भरून निघाली. अडीच तासांच्या चालीनंतर रूपकुंडला येथे पोहोचलो. हे ठिकाण साधारण १६,५०० फुटांवर आहे. कुंड फार मोठे नसले तरी येथे सापडलेल्या मानवी कवटय़ा व हाडांमुळे रूपकुंडला एक गूढतेचे वलय आहे. हे मानवी अवशेष ५०० ते ७०० वर्षांपूर्वीचे असावेत असे सांगतात. रूपकुंड येथे तास-दीड तास थांबून उतरायला सुरुवात केली व बगुवाबासाच्या पुढे निघून पाथेर नाचनी येथे मुक्काम केला. मुक्कामी पोहोचायच्या आत पावसाने गाठले व दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सोबत केली.
सहाव्या दिवशी पाथेर नाचनीहून निघून वेदनी कुग्याल येथे मुक्काम केला. आता उतरत यायचे होते आणि उंचीही कमी होत होती. त्यामुळे सगळ्यांच्या चालण्याला वेग आला होता.
सातव्या दिवशी वेदनी बुग्याल व अली बुग्याल ओलांडून दिदना येथे मुक्काम केला. वाटेत फुलांचे भरपूर फोटो काढत सर्वजण आरामात दिदना येथे पोहोचलो.
आता शेवटच्या दिवशी लोहाजंग येथे पोहोचण्यासाठी तीन तासांच्या अंतरावरच्या कुलिंग येथे गेलो. आम्ही आलो तेव्हा लोहाजंग ते कुलिंग रस्ता दरडी कोसळल्याने बंद होता. आता हा रस्ता चालू झाल्याने दिदनाहून तीन तास चालून कुलिंग येथे आलो आणि जीपने लोहाजंगला ११ वाजेपर्यंत पोहोचलो.
अशारीतीने ८ दिवसांच्या चालीनंतर सर्वाचा रूपकुंडचा ट्रेक पूर्ण झाला. या ट्रेकमध्ये पावसाने रोज न चुकता हजेरी लावली. मॉन्सूनचा काळ असल्याने हवा ढगाळ असायची. त्यामुळे हिमशिखरांचे दर्शन १-२ वेळाच झाले. परंतु फुले फुलण्याचा हंगाम असल्याने भरपूर पक्षी, ब्रह्मकमळे तसेच अली बुग्याल व वेदनी बुग्याल येथे गवतावर फुलणारी विविध फुले पाहता आली.
    ल्ल  

दुर्गप्रेमी
tr455गोनीदा दुर्गप्रेमी मंडळातर्फे नुकतेच सिंहगडावर पाचवे दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने सिंहगडाच्या सर्वागीण आढावा घेणारा विशेषांक नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकात महाराष्ट्रातील गडकोट, त्यांची सद्य:स्थिती, वाटचाल आणि भवितव्य याच्या जोडीनेच सिंहगड हा स्वतंत्र विभाग रेखाटण्यात आला आहे. सिंहगडाच्या या स्वतंत्र विभागामध्ये त्याच्या उत्पत्ती, इतिहासापासून ते त्याचे पर्यटन, निसर्ग-पर्यावरण, गिर्यारोहण, स्थापत्य, सिंचन व्यवस्था, स्वातंत्र्य लढय़ातील योगदान अशा विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे. ज्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. गो. बं. देगलूरकर, पांडुरंग बलकवडे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, डॉ. विजय देव, उष:प्रभा पागे, आनंद पाळंदे, गोपाळ चांदोरकर, अभिजित बेल्हेकर, श्रीकांत इंगळहळीकर, उमेश झिरपे, दिलीप निंबाळकर, मिलिंद हळबे, सिमंतिनी नूलकर, महेश तेंडुलकर आदी अभ्यासकांचे लेख आहेत. प्रसिद्ध दुर्गप्रेमी आणि लेखक गो. नी. दांडेकर आणि पं. महादेवशास्त्री जोशी यांचे सिंहगडासंबंधी आठवणी जागवणारे लेखही या विशेषांकात समाविष्ट करण्यात आले आहेत. विषयांचे वैविध्य आणि दर्जेदार लेखनाच्या या जोडीला वेधक छायाचित्रे, रेखाटने, चित्रे, नकाशे या साऱ्यांनी हा अंक परिपूर्ण झाला आहे. या साऱ्याला चाररंगी, आर्टपेपरवरची छपाईने देखणेपण बहाल केले आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरील संग्राह्य़ अंकाच्या परंपरेत ‘दुर्गप्रेमी’चे हे आणखी एक पाऊल आहे. अधिक माहितीसाठी रामनाथ आंबेरकर (९०२९९२९५००), प्रदीप जोगदेव (९३७१९१७७६८) यांच्याशी संपर्क साधावा.