लडाखमुळे खरं तर खूप ट्रेक मिस झाले होते. परंतु हिमालयाचे सौंदर्य आपल्या जागी आणि सह्य़ाद्रीचे आपल्या. त्यातून नाशिक परिसर म्हणजे अनेक दुर्गशिल्पांचा खजिनाच. अध्र्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे, त्याच ताशीव कडय़ाच्या पोटातून खोदलेली वाट, ती चढून वर गेले की अनेकविध दुर्ग. हेच पाहण्यासाठी या वेळी आम्ही त्रिंबकगड-दुर्गभांडार आणि अंजनेरीचा बेत आखला.
घोटीवरून अप्पर वैतरणा धरणाच्या कडेकडेने जाणारा रस्ता, हिरवीगार झालेली भातशिवारं. या वातावरणात मग आपल्या वायुदलानंसुद्धा आकाशात ‘जेट स्मोक ट्रेल्स’ची कमान करून स्वागत केलं. घोटी, वाकी, भावली अशी गावं सोडत आम्ही निघालो. सोबतीला डावीकडे दूरवर त्रिंगलवाडी, उजवीकडे कावनईची संगत. सातुर्ली गावावरून उजवीकडे वळलं की वैतरणा आणि मुकणे धरणाच्या फुगवटय़ांच्या मधून जातो. रस्त्याच्या दोहो बाजूंनी जलाशय आणि मधोमध बांधलेल्या पुलावरून गाडी घालायची. सुंदर परिसर. त्यात सकाळची वेळ. फोटोग्राफर जागा व्हावा असाच नजारा. सोनगड-बिंडाकडून खरोलीमार्गे पहिने गावात आलो. समोरला विस्तीर्ण सह्य़ाद्रीविस्तार नजरेत सामावत नव्हता. देवाचा डोंगर, पहिने सुळके, त्रिंबकगड, कार्वी, अंजनेरी अशी सगळी रांग समोर दिसत होती. सारे नाशिकछाप. अध्र्यावर चढत गेलेले सौम्य ते मध्यम चढावाचे टप्पे आणि तिथून अचानक आकाशात उठलेले ताशीव कातळकडे. अंजनेरीच्या बगलेतून निघून त्रिंबकला वळसा देत त्र्यंबकेश्वरला पोचलो.
पाऊस सरला होता, पण बंद झाला नव्हता. मधूनच एखादी सर सभोवताल चिंब करून जाई. या पावसाने सारे रान हिरवेगार झालेले. वरुन चकाकते ऊन. त्रिंबकच्या जटामंदिराच्या मागची वाट पुढे दुर्गभांडार या त्रिंबकच्या जोडकिल्लय़ाकडे जाते. या एकांती वाटेचाच रस्ता धरला. गवत-रानफुलांनी बहरलेली वाट. या फुलांच्या ताटव्यांतून चालताना थकवा जाणवतच नव्हता. वीस मिनिटांतच आम्ही कडय़ाच्या एका टप्प्याच्या टोकाशी पोचलो, तरी किल्लय़ाचा दगडही दृष्टीस पडेना. समोर खाली दिसली फक्त एक कातळभिंत, त्याच्या टोकाला समोरच्या कातळात जाणारे एक तीन फुटी भगदाड. पण तेथपर्यंत पोचायला वाटच दिसेना. पुन्हा थोडे मागे येऊन पुसट झालेली डावीकडे गेलेली वाट घेतली आणि समोर दिसले ते अभूतपूर्व.
अतिशय अरुंद अशा खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या. अगदी अंधारात गेलेल्या, पाताळात नेतात की काय असेच वाटावे. त्यांची रचना तरी किती अनोखी. आम्ही अगदी त्याच्या माथ्यावर आठ-दहा फुटांवर होतो तरी दिसल्या नाहीत. दुर्गरचनेचा अद्भुत आविष्कार. त्या पंचावन्न पायऱ्या उतरत गेलो की समोर दिसतो तो दुसरा एक आविष्कार. अगदी माणूस जाताना सरपटतच जावा अशी रचना केलेला दरवाजा. तो पार करून त्या निरुंद कातळभिंतीवर पोचलो. दोन्हीकडे एकदम सरळ खाली सुटावलेले तीन-चारशे फूट कडे आणि पाच-सात फुटी निरुंद नैसर्गिक भिंत. तिच्यावरून चालत गेलो की समोर तसाच एक दुसरा दरवाजा. चाळीस-पंचेचाळीस पायऱ्या चढून आपण किल्लय़ाच्या दुसऱ्या कडय़ाच्या पोटात पोचतो. तिथे माथ्यावरून जाऊन टोकाशी असलेल्या बुरुजावर पाचच मिनिटांत पोचतो.
बुरुज देखील अखंड कातळात कोरलेला. बुरुजात उतरायला वाट आहे. डाव्या हाताला खोल दरी आहे. बुरुजावरून उजवीकडे खाली ब्रह्मगिरी, गंगाद्वाराचे दर्शन होते, समोर हरिहर आणि बसगड, बास संपला किल्ला. रूढ अर्थाने खरं तर किल्ला म्हणावा असे अवशेष म्हणजे एक कोरीव मारुतीची मूर्ती आणि खोदीव पायऱ्या, सरपटत जावे लागेल असा दरवाजा. विशेष काहीच नाही, पण विशेष बरंच आहे. संरक्षणासाठी सज्ज दरवाजा, पायऱ्या आणि अरुंद भिंतीचा नैसर्गिक आविष्कार. ते सगळे मनश्चक्षूंमध्ये साठवून आम्ही परत फिरलो. पुन्हा फुटाफुटाच्या छातीवर येणाऱ्या पायऱ्या, दरवाजातून सरपटणे असं करत अलीकडल्या कडय़ाशी आलो. सात वर्षांनी फुलणारी कारवी इथे बहरली होती.
संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी – http://www.pankajz.com/2014/07/blogpost_2747.html