दर रविवारी सुट्टीला आमचा एक ट्रेक ठरलेला असतो. दरवेळी एक नवी वाट आणि नवा डोंगर-दुर्ग पकडायचा आणि चालू पडायचे. आमच्या भटकंतीच्या याच वारीत यंदा मी आणि हरिष पैठणकर, संतोष बोडके आणि नीलेश खाजगी या मित्रांनी माणिकगडाची वाट पकडली.
माणिकगडाकडे यायचे असेल तर पुणे-मुंबई रस्त्यावरील खोपोलीजवळचे चौक गाव गाठावे. या चौकमधून गडाच्या पायथ्याशी असलेल्या वडगावमध्ये एक रस्ता जातो. हे अंतर आहे ८ किलोमीटर. याशिवाय पनवेलहूनही रसायनी, वाशिवली मार्गे एक रस्ता या वडगावमध्ये येतो.
गावात येताच झाडीत दडलेल्या या कातळमाथ्याच्या माणिकगडाचे दर्शन घडते. माणिकगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ५७२ मीटर. गावातूनच गडावर जाण्यासाठी एक वाट निघते. मळलेल्या या वाटेने अध्र्या तासातच आपण डोंगरसपाटीवरील कातकरवाडीत पोहोचतो. या वाडीतूनच आम्ही एक वाटाडय़ा घेतला आणि पुढच्या चढाईला लागलो.
थोडय़ाच वेळात ती खडी चढाई सुरू झाली. आता माणिकगडाचा तो सुळका ऊर्फ माणिकगडाची लिंगी दिसू लागली. आणखी पुढे जाताच डोंगराबरोबरच भोवतालची झाडीही घट्ट झाली. यामध्ये नाना तऱ्हेचे वृक्ष-वेली. वाटाडय़ाच्या मदतीने यातील काही रानमेवाही आमच्या वाटय़ाला आला. रानमेवा
खात फिरताना पक्ष्यांचा किलबिलाटही आमची ही वाट प्रसन्न करत होता. या झाडीत एका ठिकाणी मारूतीरायाचे दर्शन घडले.
यापुढे पुन्हा खडय़ा चढणीची वाट सुरू झाली. पावटय़ांचा आधार घेत ही चढाई पूर्ण करत आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. दुहेरी तटबंदीतून आपण गडात प्रवेश करतो. या प्रवासातच काही खोदीव टाक्या, बांधकामासाठीचा चुन्याचा घाणा दिसतो. यानंतर गडाचा भग्न दरवाजा भेटतो. हा दरवाजा पडला
असला तरी त्याच्या दगडी कमानीवरील गणेशपट्टी लक्ष वेधून घेत असते. गडावर तटबंदी, पायऱ्यांचे अवशेष, काही घरांची जोती, खोदीव टाक्या दिसतात. हे सारे पाहातानाच मग भवतालातील डोंगर सुळक्यांवर नजर धावू लागते. यातच मग माथेरान, प्रबळगड, चंदेरी, मलंगगडाच्या डोंगरी टोप्या ओळख देतात. दुर्गशिखरांच्या या ओळखी पटवणे आणि त्यांना पाहण्यात माणिकगडाच्या चढाईचे सारे श्रम गळून जातात.