उन्हाळा सुरु झाला, की चालणारी पावले सावलीच्या शोधात हिंडू लागतात. झाडांची गरज आणि महत्व या तळपणाऱ्या उन्हातच समजते. याच वृक्षांशी जवळीक वाढवणारी आणि वैशाखातील भटकंतीला सावली देणारी ही आजची मुशाफिरी, घाटाईच्या देवराईची !

कास म्हटले, की पाऊस, धुके, ढग आणि या साऱ्या वातावरणाला आणखी धुंद करणारे ते लक्षावधी रानफुलांचे सोहळे डोळय़ांपुढे उभे राहतात. पाऊस सुरू झाला, की असंख्य पर्यटक-अभ्यासक न चुकता या पठाराची वाट पकडतात. पण याच कासच्या पठारावर ऐन वैशाखात, रणरणत्या उन्हात चला असे म्हटले, तर अनेकांना ते वेडेपणाचे वाटेल. पण या रखरखणाऱ्या उन्हातही इथे पाहण्यासारखे एक निसर्गनवल दडलेले आहे, ते म्हणजे घाटाईची देवराई!
देवराई हा शब्दच मुळी गोड, कानाला सुखावणारा. एखाद्या देवासाठी त्याच्या नावाने राखलेले जंगल म्हणजे देवराई! इथल्या झाडांना, त्यांच्या फांद्या, पाना-फुलांना कशालादेखील हात लावायचा नाही. कारण हे सारे त्या देवाचे. इथली प्रत्येक गोष्ट तो ईश्वरी अंश असलेली. असे हे देवाचे घर, जंगल, राई ती देवराई!
आमच्याकडील निसर्गाचे जतन व्हावे, त्याचा समतोल राखला जावा आणि ज्यातून आमचे पर्यावरण शाबूत राहावे यासाठी फार प्राचीन काळापासूनच आमच्याकडे ही देवराईची संस्कृती रूजली. पूर्वी प्रत्येक गावाला अशी देवराई असायची. गावाशेजारच्या या हिरव्या बेटांचे त्या-त्या गावातून श्रद्धेतून जतन केले जायचे. पण पुढे देवाबरोबरचे आमचे हे नातेही कृत्रिम झाले आणि त्यातून मग या देवरायादेखील धोक्यात आल्या. त्यांच्यावरही कु ऱ्हाड चालू लागली आणि यातून त्या हळूहळू नष्ट होऊ लागल्या. माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्षांतही टिकून राहिलेल्या काही मोजक्या हिरव्या बेटांपैकी ही घाटाईची देवराई!
साताऱ्याहून कासचे पठार २८ किलोमीटर. या पठाराच्याच अलीकडे काही अंतरावर या घाटाईसाठी फाटा फुटतो. या फाटय़ावरून ही देवराई ६ किलोमीटरवर. लांबूनच हा हिरवा पट्टा लक्ष वेधून घेतो. रस्त्याच्या कडेनेच हळूहळू झाडांची संगत सुरू होते. पायाखालचा रस्ता थेट त्या घाटाईदेवीच्या मंदिरापुढे जाऊन थांबतो. पण चालत जाणाऱ्यांसाठी अलीकडूनच एक पायरीमार्ग वर डोंगरालगत देवीकडे निघतो. एका डोंगर उतारावर ही घाटाईची देवराई. मध्यभागी सपाटीवर घाटाई देवीचे मंदिर तर तिच्या भोवतीने ही राई.
या राईत एक-दोन वाटा फिरतात. या मार्गाने जात असतानाच भोवतीची राई तिची ओळख दाखवू लागते. हजारो वृक्ष आणि त्यांच्या शेकडो प्रजाती. कित्येक वर्षे-शतकांचा हा मामला. उगवलेले झाड तुटलेच नाही. यामुळे छोटय़ा-मोठय़ा झुडपांपासून ते दोन-चार पिढय़ा जुने वाटावे अशा भल्या -थोरल्या झाडापर्यंत ही सृजनांची भलीमोठी मांदियाळी. आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, पांगारा, अंजन, कांचन, फणस, आवळा, जांभूळ, भोकर, उंबर, आपटा, बेहडा, काटेसावर, पायर आणि असेच कितीतरी वृक्ष. त्यांच्याजोडीनेच पुन्हा धायटी, खुळखुळा, करवंद, कारवी सारखी असंख्य झुडपे. या साऱ्या झाडा-झुडपांवर पुन्हा नाना लतावेली. वनस्पतीचे एखादे जिवंत संग्रहालयच!
यातील एकेक झाड आणि त्याच्या गमतीजमती पाहात आपली भटकंती रंगू लागते. कुणाची फुले पाहावीत, कुणाची फळे. कुठे काही झाडांवर पावसाळय़ात लगडलेले शेवाळ अद्याप त्याच्याशी सलगी करून असते. तर काही झाडांची पाने गळाल्यामुळे त्यांचे खराटे झालेले असतात. काहींच्या अंगाखांद्यावर वसंताचे सौंदर्य रेंगाळत असते. पळस, पांगारा, सावरीची झाडे यात आघाडीवर. करवंद-जांभळाच्या झाडांनीदेखील बहर धरलेले. काही ठिकाणी त्यांनी फळेही पकडलेली. हे सारे पाहायचे, अनुभवायचे.
..निळय़ा-जांभळय़ा रंगांच्या फुलांनी लगडून गेलेली अंजनची झाडे लक्ष वेधून घेतात. तर आंब्याची झाडे त्याच्या त्या लगडलेल्या फळांमधून त्याचे सृजनत्व दाखवत असतात. काही झाडा-झुडपांच्या अंगाखांद्यावर विविध आमरीचे (ऑर्किडस) घोस उमललेले. तर रानजाई सारख्या वेलींनी सारी रानवाटच सुगंधी केलेली. ..वैशाखाच्या या वणव्यातही सृष्टी तिचे हे सौंदर्य चराचरात फुलवत असते.
झाडांच्या दाटीतूनच विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी येत होता. अगदी तळहाताएवढय़ा सूर्यपक्ष्यांपासून ते गरुडाच्या राजभरारीपर्यंत असंख्य प्रजातींचे पक्षी इथे या देवराईत मुक्कामाला. त्यांचा तो किलबिलाट मन प्रसन्न करत असतो. वृक्षांची हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहत्या पाण्याचे झरे..सारे कसे जिवंत-सजग असे भासत जाते.
वरवर जाऊ तशी ही राई अधिकाधिक घट्ट होते. अनेक झाडांच्या फांद्या एकमेकांत घुसून त्यांचा मांडव तयार झालेला. या मांडवाखालून फिरताना जाणवणारी सावली मनाला शांत करते, निरव शांतता मन प्रसन्न करते, तर एखादी मंद वाऱ्याची झुळूक या साऱ्याला गाभाऱ्यातील समाधीचे भावही देते. देवराईत भरून राहिलेल्या ‘त्या’ सर्वात्मका सर्वेश्वराचाच तर हा स्पर्श नाही नां?