भटकंतीचा सोबती
महाराष्ट्रातील भटकंती प्रामुख्याने इथल्या गडकोटांच्या अंगाखांद्यावरूनच धावते. यातही ‘ट्रेक’चा विषय निघाला, की अनेकांना आपल्याभोवती रुळलेले गडकोट आठवतात. पण या मळलेल्या वाटांशिवाय जागोजागीचे अन्य अपरिचित दुर्गाचा शोध घेणारेही अनेकजण आहेत. भगवान चिले यातीलच एक नाव. त्यांच्या या शोधक भटकंतीतूनच एक पुस्तक आकाराला आले आहे- ‘अपरिचित गडकोट’!
महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल गडकोटांनी भारलेला आहे. इथल्या डोंगररांगांवर चार-दोन शिखराआड एकाला तरी तटबंदीचे शेलापागोटे चढलेले आहे. काही अभ्यासकांच्या मते राज्यातील या गडकोटांची संख्या पाचशेच्यावर आहे. पण तरीही मग भटकंती करणाऱ्यांची पावले मात्र ठरावीक पाच-पन्नास गडांच्या पलीकडे जात नाही. परिघाबाहेरचे हे अन्य दुर्ग शोधायचे असतील तर अंगी भ्रमंतीचे वेड असावे लागते, रग्गड तंगडतोड करण्याची वृत्ती असावी लागते. या ध्यासातून ही शोधयात्रा सुरू केली, की मग अनेक अपरिचित दुर्गही आपल्याला भेटू लागतात. जगाला फारसा माहीत नसलेला त्यांचा इतिहास-भूगोल आपल्याला दिसू लागतो. चिले यांची ‘अपरिचित गडकोट’मधील शोधयात्रा याच प्रकारातील आहे.
असावा, सेगवा, बल्लाळगड, डुंबेरगड, माणिकपुंज, कन्हेरगड, दुंधा, बिष्टागड, लघुगड, वैशागड, सुंतोडा ही अशी ३५ अपरिचित दुर्गमंडळी या पुस्तकातून त्यांच्या यात्रा घडवतात. यातील अनेकांची नावे पर्यटक तर सोडाच, पण नित्य ट्रेकिंग करणाऱ्यांनीही फारशी ऐकलेली नाहीत. अशा या अनगड, आडवाटेवरच्या गडकोटांच्या भेटीला कसे जावे, तिथे काय पाहावे, त्या परिसराचा भूगोल, त्या दुर्गाचा इतिहास अशी सारी माहिती या पुस्तकात मिळते. या माहितीला उपयुक्त नकाशे आणि सुंदर छायाचित्रांचीही जोड आहे. अस्पर्शी अशा या दुर्गस्थळांची माहिती भटकण्याचे वेड असणाऱ्यांसाठी खजिनाच ठरते. यातील एकेका प्रकरणाचे बोट धरायचे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दरीखोऱ्यात दडलेल्या या गडकोटांच्या शोधात बाहेर पडायचे. नव्या वाटांवर ही अशी पावले टाकू लागलो, की मग गंभीरगडावरचा तो मानवी चेहरा दिसेल, राजदेहेरची वनश्री सुखावेल, कंडाळय़ाचे नेढे चमकून जाईल आणि वेताळवाडीची खणखणीत तटबंदीही सामोरी येईल. शेवटी या भटकण्याच्या या छंदात काही गवसण्याचा तर आनंद असतो. असा हा आनंद देण्यात ‘अपरिचित गडकोट’ आपल्याला पुरेपूर शिदोरी देतो.
(अपरिचित गडकोट, शिवस्पर्श प्रकाशन, संपर्क- ९८९०९७३४३७)
  -फिरस्ता
  abhijit.belhekar@expressindia.com