‘पाऊस’ हा एक शब्द उच्चारल्याबरोबर जी काही अनेक चित्रे डोळ्यापुढे उभी राहतात त्यामध्येच, वर्षांसहलीपासून ते पावसाळी ट्रेकपर्यंत असे मोठे विश्वही लगेच पुढय़ात अवतरते. मृगाचा पहिला पाऊस पडून त्याचा मृद्गंध हवेत मिसळण्याच्या आत इकडे या भटक्यांच्या भावविश्वात वरंध घाट, ठोसेघर, कास, आंबोली, राजमाची, कात्रज-सिंहगड, हरिश्चंद्रगड अशा एक ना अनेक ‘ओल्या वाटा’ मनी रुंजी घालू लागतात. ओल्या वाटा, हिरवे डोंगर, कोसळत्या धारा, उसळते प्रवाह, रानफुलांचे सडे आणि ढगांच्या कुशीतून येणारा झिम्मड पाऊस! सारे – सारे कसे मन सुखावणारे, मन फुलवणारे होते. हिरवाईची ही दृश्ये वर्तमानपत्रांची पहिली पाने आणि ‘फेसबुक’च्या ‘वॉल’ व्यापू लागतात. पण हे सारे चैतन्याचे झरे वाहत असतानाच मध्येच कुठेतरी मग घसरडय़ा – निसरडय़ा वाटेवरील अपघाताच्या बातम्या येतात. कुठे कुणी धबधबे-ओढय़ात वाहून गेल्याचेही कानी येते. ढग आणि धुक्यात वाट हरवलेल्या गिर्यारोहकांच्या मदतीच्या याचना सुरू होतात. दरवर्षीचे हे ओरखडे मन खात राहतात. तेव्हा या जखमा आणि चुका होऊच न देण्यासाठी.. हे लक्षात घ्या.
वर्षां ऋतू जेवढा लोभस, भटकण्यासाठी पाय खेचणारा, तेवढाच तो परावलंबी, असुरक्षितही. बहुधा या अत्यंत टोकाच्या दोन अवस्थांमुळेच दरवर्षीचे अनेक अपघात घडतात. केवळ निसर्गाची, त्यातही अनेकदा धबधब्यांची ओढ आणि भ्रमंतीविश्वातील अपरिपक्वता यातून या बहुसंख्य दुर्घटना घडत जातात.
कुठल्याही ट्रेक, सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते. पावसाळय़ात पाऊस, ढग, धुके आणि वादळी वाऱ्यात तर एखादा अनुभवी मार्गदर्शक, माहीतगार बरोबर असणे आवश्यकच आहे. पण ऐकलेली अर्धवट माहिती आणि फसवणारे फोटो पाहत अनेक जण या वाटांवर स्वार होतात आणि मग चुकतात, फसतात; क्वचितप्रसंगी जीवही गमावून बसतात. कुठे जायचे त्या ठिकाणाची, ट्रेकची, त्यातील आकर्षणांपासून धोक्यांपर्यंत अशा साऱ्या माहितीचा अभाव, सूचना – वेळापत्रकाचे पालन न करणे, यातून मग नको त्या गोष्टी घडत जातात.
ट्रेकिंग, गिर्यारोहण, गिरिभ्रमण या शब्दांखाली चालणारी भ्रमंती आणि कौटुंबिक सहली यामध्ये मुळातच फरक असतो. डोंगरदऱ्या, चिखलमाती, पाऊस-धुके आणि निसर्गाच्या अनंत अडचणी- आव्हाने या डोंगर यात्रांमध्ये असतात. भ्रमंतीतील या आव्हानांचाच विचार न करता बागेत निघाल्यासारखे कुठल्याही डोंगराला भिडले तर अपघात न झाला तरच नवल!
निसर्गात जाऊन त्याचा आनंद घेत निरीक्षण-अभ्यास करण्यासाठी ट्रेकिंग, पदभ्रमण हे एक माध्यम आहे. मग अशा माध्यमावर स्वार होताना स्वत: आणि स्वत:भोवतीच्या वस्तू या ‘फिट’ असल्याच पाहिजेत. पण अनेक जण पायात सँडल, हातात ट्रॅव्हल बॅग आणि डोक्यावर छत्री असा जामानिमा करत या डोंगरदऱ्यात शिरतात. मग सगळीच अवस्था फाटकी होऊन बसते. पायात चांगल्या तळव्याचे बूट, अंगात रेनकोट, पाठीवर चांगल्या बंदांची पाठपिशवी (सॅक) आणि डोक्यावर टोपी असा वेश असलाच पाहिजे. असे केले तरच आधारासाठी रिकामे हात आणि भक्कम पाय वापरायला मिळतील.
सॅक भरतानाही आतील वस्तू धो-धो पावसात भिजणार नाहीत याची काळजी घेत भराव्यात. त्यामध्ये कॅमेरा, बॅटरी, मोबाईल, चार्जर अशा गोष्टींची काळजी थोडी जास्त घ्यावी. सॅकमधील वस्तूंमध्ये छोटीशी दोरी, टॉर्च, आवश्यक औषधे, रक्तगट – दूरध्वनी क्रमांक असलेले ओळखपत्र, पाण्याची बाटली, काडेपेटी- मेणबत्ती या गोष्टी ‘किरकोळ’ न मानता आठवणीने घ्याव्यात. यातली एखादी छोटी वस्तूही या आडवाटांवर मौल्यवान ठरू शकते.
या पावसाळ्यात आपल्याबरोबर असंख्य छोटय़ा कीटकांपासून ते सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत असे सर्वच जण भटकायला बाहेर पडलेले असतात. दिवसा-सावधपणे यांची भेटगाठ झाली तर त्यांच्या हालचाली टिपणे आनंददायी असते. पण रात्री-बेरात्री, अडचणीच्या ठिकाणी त्यांचे भेटणे त्रासदायक ठरू शकते. विशेषत: मुक्कामाची गरज असेल तर हे सावधपण अधिक असावे लागते. याच काळात पश्चिम घाटातील घनदाट जंगलातून फिरताना जळवांची पिडा मागे लागते. अशावेळी मोजे आणि बुटांना मीठ चोळल्यास त्याचा काही प्रमाणात फायदा होतो.
वर्षां ऋतू आणि इतर हंगामात मुळातच खूप फरक असतो. या चार महिन्यात निसर्ग-पर्यावरणातला जणू प्रत्येकच घटक जागा-सक्रिय झालेला असतो. झोडपणारा पाऊस सर्वत्र पाणी-पाणी करतो, वाट अडवतो, नदी – नाले ओसंडून आडवे येतात. पावसापाठी ढग – धुक्यातही हा सारा प्रदेश बुडून जातो. कालपर्यंत उघडय़ा वाटणाऱ्या वाटा गवतात झाकून जातात. वाटेतील दगड – खडकही शेवाळ-पाण्याने निसरडे होतात. या साऱ्याच गोष्टी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या असतात. डोंगर-पर्वतांचे काठ किंवा गड-किल्ल्यांचे कडे ही एक या दिवसांत हमखास अपघाताची जागा. अनेक दिवसांच्या पावसाने हे काठ ओलेचिंब -शेवाळलेले-घसरडे झालेले असतात. समोरच्या दरीतील गंमत पाहण्यासाठी म्हणून उत्साहात या टोकावर धावणाऱ्या अनेकांचा कडेलोट झालेला आहे.
पावसातील पाण्याचे धावते जग ही आणखी एक मोहाची जागा! फेसाळत्या, वेगाने वाहणाऱ्या नदी-नाल्यात उतरणे, धबधब्याखाली उभे राहणे या साऱ्याच गोष्टी पाण्याच्या ओढीतून घडतात.. पण पाण्याची हीच ओढ पुढे काही कळायच्या आत कुणाच्या जीवावरही बेतते. ‘वॉटरफॉल राफ्टिंग’ हे असेच आणखी एक खूळ! उभ्या कडय़ावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या त्या धारेत दोरीच्या साहाय्याने खाली उतरायचे. पण वेगाने वाहणाऱ्या-कोसळणाऱ्या या धबधब्यांत केवळ पाणीच नाही, तर अनेक छोटे-मोठे दगडही वरून खाली येत असतात. ..धोक्याची हीच प्रत्येक पाऊले अनेक जण विसरतात आणि जीव गमावून बसतात. चूक कुणाचीतरी असते पण बदनाम मात्र निसर्ग होतो.
वर्षां ऋतू हा चैतन्याने भारलेला आहे. वैविध्याने नटलेला आहे. सृजनत्व दाखवणारा आहे. त्याचे स्वागत करत, त्याची अनेक गुपिते शोधत या ‘ओल्या वाटा आणि हिरव्या डोंगरां’वर जरूर जा; पण वर सांगितलेला हा धोक्याचा, सावधतेचा थोडासा विचारही करा! आपल्या उत्साहाला संयमाची जोड असेल तर नवलाईने नटलेली ही हिरवाई आपली सारीच भ्रमंती आनंदी-प्रसन्न करून टाकेल.

पावसात भटका, पण..
कुठलाही ट्रेक-सहलीला जाण्यापूर्वी त्या
स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची पूर्ण माहिती घ्यावी. अज्ञात ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक, माहितीपुस्तक घेऊनच बाहेर पडावे.
धबधब्यांमध्ये पाण्याबरोबर छोटे-मोठे दगडही अंगावर पडून अपघात होतात.
ओढे-नाले आणि धबधब्यातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहून जाण्याच्या दुर्घटनाही घडतात.
प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने असेल तर वेळापत्रक लक्षात ठेवा. स्वतंत्र वाहन असेल तर टूल किट, स्टेपनी बरोबर बाळगा.
मुक्कामी ट्रेक असल्यास निर्जन स्थळी, उघडय़ावर मुक्काम करण्याऐवजी सुरक्षित घरी किंवा मंदिरात मुक्काम करावा. झोपताना रद्दी पेपर घालून त्यावर अंथरूण घातल्यास जमिनीतील ओल लागत नाही.
ट्रेक करताना पायात कापडी किंवा स्पोर्ट्स शूज घालावेत. चप्पल, सँडलवर ट्रेक करू नये.
सॅकमधील सर्व सामान एखाद्या मोठय़ा प्लास्टिक बॅगमध्ये घेतल्यास त्याला ओल लागत नाही. कॅमेरा, लेन्स, मोबाईल, चार्जर यांची विशेष काळजी घेत त्यांना कोरडय़ा सुती कापडात गुंडाळून घ्यावे.
आडवाटेवरचे ट्रेक करताना आपल्याबरोबर दोरी, टॉर्च, काडेपेटी, मेणबत्ती, पॅकफूड, आवश्यक औषधे आणि नाव-पत्ता-संपर्क क्रमांक-रक्तगट असलेले ओळखपत्र घेण्यास विसरू नये.
मद्यपान, कर्कश गाणी, धिंगाणा टाळा.