महाराष्ट्राप्रमाणेच राज्याबाहेरही अनेक गडकोट भटक्यांना सतत आकर्षित करत असतात. तामीळनाडूमधील जिंजीचा किल्ला असाच. त्याचा विस्तार, त्याचे ते तीन बालेकिल्ले, किल्ल्यातील अनेक इमारती आणि मोठा इतिहास या साऱ्याच गोष्टी इथे येणाऱ्याला खिळवून ठेवतात.
शिवाजीमहाराजांचा दक्षिण दिग्विजय म्हटल्यावर आधी आठवते ती जिंजी. जिंजीचा किल्ला पाहताना किल्ले राजमाची आणि देवगिरी नजरेसमोर येतात कारण या तिन्हीमध्ये काहीतरी साम्य निचितच जाणवते. या किल्ल्याचा विस्तार प्रचंड या सदरात मोडतो. या सर्व विस्तीर्ण प्रकाराला भक्कम जाडजूड ११.२ किलोमीटर लांबीची दगडी तटबंदी आहे. त्या पलीकडे पूर्वी खोल खंदकही होता. विस्तीर्ण आवारात देवगिरीप्रमाणे भरपूर पाण्याची सोय आणि शेती आहे. देवगिरीला एक तर राजमाचीला दोन (श्रीवर्धन आणि मनरंजन) तर येथे तीन बालेकिल्ले आहेत. येथील तीनही बालेकिल्ले काही अंतरावर आहेत. ते राजमाचीप्रमाणे चिकटून नाहीत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण अशी त्यांची नावे आहेत. या तीनही टेकडय़ा या प्रचंड आकाराच्या शीलाखंडांपासून बनलेल्या आहेत. एकावर एक गोटे रचल्याप्रमाणे आणि त्यामुळे सर्व पावसाचे पाणी झिरपून जाते. या टेकडय़ांवर नसíगक पाण्याची टाकी नाहीत. पण येथे विहिरी आणि अनेक हौद आढळतात. आज निगा नसल्याने हे हौद आणि विहिरी कोरडे ठणठणीत पडले आहेत. अर्थात बालेकिल्ल्यांवर पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे इथे भटकण्यापूर्वी आधी पुरेसे पाणी सोबत न्यावे. पायथ्याला स्वच्छ आणि शुध्द पाण्याची सोय आहे.
किल्ल्यात अर्काट आणि मग पॉण्डिचेरी दरवाजातून प्रवेश होतो. आज याचे अवशेषच आहेत. येथे व्यंकटरमणस्वामींचे सुंदर देवालय आहे. पूर्वी येथे मूर्ती नव्हती पण नुकतीच नरसिंहमूर्तीची स्थापना झाली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्रमंथनाचे सुरेख शिल्प आहे. या मंदिराचे सुरेख खांब पोर्तुगीजांनी पळवले असे सांगतात. जवळच धान्यकोठारे आहेत. बऱ्याच पुष्करिणी आहेत. तालीमखाना (शरीर संवर्धनासाठी) आहे. काही निवासी महाल आहेत. देवालये आहेत. एका राजाच्या लग्नाप्रीत्यर्थ बांधलेला कल्याण महालही सातमजली आणि अतिशय सुंदर इमारतही दिसते. या सातमजली इमारतीमध्ये वपर्यंत खापरीनळाने पाणीपुरवठा केला होता.
इथून पुढे थोडय़ाच अंतरावर राजगिरीला जाणारा पायऱ्यांचा रस्ता लागतो. हा रस्ता सात दरवाजांमधून जातो. वाटेत घनदाट जंगल आहे. काही दाक्षिणात्य शैलीची सुरेख देवालये आहेत. या राजगिरीचा वरचा भाग हा एका महाप्रचंड शिलाखंडावर बसला आहे. तेथे पोहोचण्यासाठी एक दगडी जिना आहे व नंतर एक लोखंडी पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडाचा होता. या माथ्यावर काही कोठारे, काही महाल, एक सुंदर मंदिर आहे. बहुधा विष्णूचे असावे. इथेच एक ध्वजस्तंभ आणि एक मोठी तोफ आहे. येथून आसमंत निहाळणे हा एक आगळा अनुभव आहे.
राजगिरीच्या जवळच चाद्रायण ऊर्फ चंकिली दुर्ग आहे. यावर फक्त एक प्रचंड मंडप आहे. सप्तमातृका मन्दिर आहे. जिंजीचा संपूर्ण किल्ला एका दिवसात पाहून होत नाही आणि किल्ल्याच्या परिसरात संध्याकाळी पाचनंतर फिरता येत नाही. राजगिरीवरही दुपारी तीन नंतर प्रवेश मिळत नाही. कृष्णगिरी थोडासा लांब आहे. वर जाण्याकरिता बांधीव पायऱ्या आहेत. या बालेकिल्ल्यावर एक मोठा सभामंडप आहे. येथील स्तंभांवर मूर्ती कोरलेल्या दिसतात. शिवाय येथे काही चित्रेही आहेत. आज जरी ती अस्पष्ट झाली असली तरी त्यांचे सौंदर्य जाणवते. या शिवाय येथे काही वैष्णव मंदिरे आहेत या पकी एक बाळकृष्णाचे असावे. येथे एक सुंदर महाल आहे. याच्या रचनेवरून हा राण्यांकरिता असावा असे वाटते. येथे राण्यांसाठी एक विश्रामगृह असावे. याच्या वरील मजल्यावर मुसलमानी राजवटीत बांधलेली बारादरी आहे आणि ही बारादरीपण प्रेक्षणीय आहे. या शिवाय येथे प्रचंड धान्य कोठारे आहेत. पाण्याकरिता विहिरी आणि हौद आहेत आज ते कोरडे आहेत. येथे एक तेलाची विहीर आहे. पूर्वी युध्दप्रसंगी जखमांवर लावण्याकरिता तेल आणि तूप साठवले जाई.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर आधीच दुर्गम असलेला हा गड बेलाग बनविला. त्यांनी केलेले हे बदल पाहून खुद्द इंग्रजही आचंबित झाले. इसवी सन १६९० मध्ये हा मोगलांनी जिंकला त्यावेळी येथे राजाराम महाराजांचा कुटुंबकबिला होता. तामीळनाडूमध्ये याचा उच्चार जिंजी न करता सेंजी असा करतात. त्यामुळे तेथे जाताना सेंजी असे विचारल्यास आपल्याला रस्ता मिळू शकतो. येथे जाण्याकरिता चेन्नई येथून रेल्वे आहे सुमारे पाच तास लागतात. राज्य परिवहनच्या बसही आहेत पण वेळ फार लागतो. जिंजी गावात निवासाकरिता माफक दरात चांगले लॉज आहेत. खानपानही छान आणि अतिशय स्वस्त आहे. मग कधी निघणार जिंजी पाहायला!

– सुधीर जोशी

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
pune, aditya thackeray, cm eknath shinde farming, amavasya, purnima
मुख्यमंत्री अमावस्या, पौर्णिमेला शेती करायला जातात – आदित्य ठाकरे
SANJAY RAUT
“कमळाच्या पदराखाली लपा अन्…”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “फुटलेल्या दोन गटांना…”