निसर्गवेध
नीलपंख हा नावाप्रमाणे देखणा पक्षी! ‘इंडियन रोलर’ अशी याची इंग्रजीतील ओळख. जवळजवळ संपूर्ण भारतात आढळणारा कबुतराएवढय़ा आकाराचा हा पक्षी त्याच्या रंगसंगतीने लक्ष वेधून घेतो. डोक्यावर निळसर रंगाची टोपी, साधारण याच रंगातील पोट. तपकिरी-तांबूस रंगाची छाती आणि पाठ. पंखाखाली पुन्हा गडद निळा, फिकट निळा आणि पांढरा अशा तीन रंगांचे पट्टे. एखाद्या जागी स्थिर बसलेला नीलपंख जेवढा प्रेमात पाडतो, याहून तो उडू लागला, की त्याचे हे दडलेले रंग पाहणाऱ्याला थक्क करून टाकतात. असा हा नीलपंख गावा-शिवारापासून ते पाणथळीचे प्रदेश, जंगल-राई सर्वत्र आढळतो. अनेकदा तो तारांवर बसलेला दिसतो. टोळ, सरडे, पाली, अळय़ा, गवतातील कीटक हे त्याचे खाद्य. आपल्याकडील अनेक गडकिल्ल्यांवरही या नीलपंखने आम्हाला आपले हे दुर्मिळ दर्शन घडवले आहे. एखाद्या भटकंतीत त्याचे हे रंगीन दर्शन घडले, की सारी पायपीटच आनंदी, प्रसन्न होऊन जाते.