भटकंती, भ्रमंती, गिरिभ्रमण, गिर्यारोहण, ट्रेकिंग, हायकिंग, माऊंटेनिअरिंग अशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली चालणारे साहस विश्व आता अनेकांना वाचून-ऐकून तरी परिचयाचे झाले आहे. या जगातली ही सारी भ्रमंती चालते कशी, त्याला कुठले साधन-साहित्य वापरले जाते, त्यांचा उपयोग कसा केला जातो या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर बनू पाहणारे या क्षेत्रातील एक मोठे प्रदर्शन येत्या १९ आणि २० जानेवारी रोजी पुण्यात भरत आहे.- ‘करेज’!
२०१२ हे वर्ष गाजले ते ‘गिरीप्रेमी’ संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेमुळे! या संस्थेच्या आठ सदस्यांनी एकाचवेळी या सर्वोच्च माथ्याला स्पर्श केला आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्र  एकदम चर्चेत आले. शाळा-महाविद्यालये, विविध संस्था-मंडळे, औद्योगिक प्रकल्पांमधून ‘गिरिप्रेमी’च्या या साहसाची माहितीपट, मुलाखती, व्याख्यानांमधून चर्चा घडू लागली आहे. परंतु एखादा छोटासा गड-दुर्ग किंवा सुळक्यापासून ते हिमालयातील साहसी मोहिमांपर्यंत गिर्यारोहणाचे हे जग कसे चालते-धावते याची सर्व सामान्यांनाही माहिती देण्याच्या उद्देशाने ‘गिरिप्रेमी’ च्या वतीने या ‘करेज’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनामध्ये गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या सॅक, तंबूपासून ते विविध प्रकारचे दोर, चढाईची साधने मांडली जाणार आहेत. ऑक्सिजन मास्क, डाऊन सूट, अती उंचीवरील चढाईसाठी वापरले जाणारे बूट, क्रँपॉन्स, स्लिपिंग बॅग, गॉगल्स, आईस अ‍ॅक्स, स्वयंपाकाची साधने, सुरक्षेची साधने, प्रथमोपचाराची साधने, संपर्क यंत्रणा अशा अनेक गोष्टी त्यांची अत्यर्क कुतूहलं घेऊन इथे सादर होणार आहेत. या सर्व साधनांच्या वापराबद्दल त्यांच्यासोबतच मराठी व इंग्रजीत माहिती दिली असणार आहे.
‘एव्हरेस्ट’ दर्शन
या साधनांच्या जोडीनेच या प्रदर्शनामध्ये ‘गिरिप्रेमी’ संस्थेने नुकत्याच केलेल्या ‘एव्हरेस्ट – २०१२’ मोहिमेतील निवडक छायाचित्रेही मांडली जाणार आहेत. जगातील सर्वोच्च शिखराचे मार्गक्रमण, चढाई, त्याची ती रौद्र-थरारक रुपे या छायाचित्रांमधून उलगडतील. गिर्यारोहण क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारे हे प्रदर्शन १९, २० जानेवारी रोजी पुण्यातील महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाच्या सभागृहात भरवले जाणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.
‘गिरिप्रेमी’ संस्थेने ‘एव्हरेस्ट’च्या यशातून मराठी युवकांसाठी साहसाचा एक मार्ग उघडून दाखवला आहे. आता ही वाट अन्य शेकडो तरुणांनी धरावी यासाठीच हे प्रदर्शन- ‘करेज’!
-भूपेंद्र हर्षे