गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने आयोजित तिसऱ्या दुर्गसाहित्य संमेलनात यंदा दुर्गविषयक परिसंवाद, अभ्यासकांची व्याख्याने, प्रदर्शने, दुर्गदर्शन, ग्रंथदिंडी, साहसी खेळ, माहितीपट, नौकानयन आदी कार्यक्रमांचे आकर्षण असणार आहे. येत्या २५ ते २७ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विजयदुर्ग किल्ल्यावर हे संमेलन होत असून ‘किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ याची आयोजक संस्था आहे.
या संमेलनामध्ये उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या जोडीने पाच परिसंवादांचे आयोजन केले आहे. यामध्ये मराठय़ांचे आरमार, दुर्गसाहित्याचा प्रवास, शोध किल्ल्यांचा, दुर्गसंवर्धन चळवळ, कोकण पर्यटन विकासातील दुर्गाचे स्थान या विषयांचा समावेश आहे. या जोडीनेच ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे ‘विजयदुर्गचे रहस्य’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.
संमेलनाच्यानिमित्ताने भारतीय पुरातत्त्व विभाग, गोव्यातील अभ्यासक सचिन मदगे आणि प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांची किल्ले विषयक छायाचित्रांची तर प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांच्या कोकणावरील चित्रांची प्रदर्शने आयोजित केली आहेत. हे संमेलन एका जलदुर्गावर होत असल्याने भारतीय नौदलही यामध्ये सहभागी होत असून त्यांच्यावतीने ‘आयएनएस सुभद्रा’ ही युद्धनौका संमेलनस्थळी दोन दिवस नांगरली जाणार आहे.
याशिवाय विजयदुर्ग दर्शन, नौकानयन, ग्रंथदिंडी, पालखी नृत्य, गोनीदांच्या ‘हे तो श्रींची इच्छा’कादंबरीचे अभिवाचन, कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर आधारित शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम, कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम, कोल्हापूरचे मर्दानी खेळ, ‘गिरिप्रेमी’च्या एव्हेरस्ट मोहिमेवरील माहितीपट आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या संमेलनासाठी नोंदणी करणे आवश्यक असून यासाठी   विशाल देशपांडे (९८८१७१८१०४), विजय देव (९४२२५१६५३२), जितेंद्र वैद्य (९३२२५९७१३९) यांच्याशी संपर्क साधावा असे मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
निनाद बेडेकर यांना दुर्गसाहित्य पुरस्कार
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने संमेलनाच्यानिमित्ताने दिला जाणारा ‘दुर्गसाहित्य पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडेकर यांनी देश-विदेशातील शेकडो किल्ल्यांना भेटी देऊन त्यांचा अभ्यास केलेला आहे. या दुर्गभ्रमंती आणि संशोधनावर आधारित त्यांनी हजारो व्याख्याने आणि प्रदीर्घ लेखनही केलेले आहे. दुर्गकथा, विजयदुर्गचे रहस्य, दुर्गवैभव, महाराष्ट्रातील दुर्ग, साथ इतिहासाशी, शर्थीचे शिलेदार आदी दुर्गविषयक त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत.