पक्ष्यांमधील राजेपद शोधायचे असेल तर गरुडाकडे वळावे लागते. त्याचे ते राजबिंडे रूप, स्थिर चित्त आणि तीक्ष्ण नजर या साऱ्यांमुळे त्याचे दर्शन वेगळ्याच जगात घेऊन जाते. यातलाच हा नाराच गरुड! याच्या पोटाकडील भाग पांढरा असतो. तर तपकिरी रंगाची पाठ. तो उडू लागला की, त्याच्या या पाठीवरील पांढरा ठसा उठून दिसतो. घारीपेक्षा थोडासा मोठा असलेला हा पक्षी झाडांच्या फांदीवर कित्येक वेळ समाधी लावून बसलेला असतो, पण याच वेळी त्याची नजर भक्ष्य शोधत असते. ते दिसताच तो आपल्या भक्ष्यावर अत्यंत वेगाने जात हल्ला चढवतो. आपल्या तीक्ष्ण नख्यांच्या पकडीतून तो आपल्यापेक्षाही मोठय़ा आकाराचे भक्ष्य सहज पकडू शकतो. गड-किल्ले, डोंगरदऱ्यांमध्ये सहज आढळणारा हा नाराच निसर्ग भटक्यांना अनेकदा दर्शन देत असतो. अजिंक्यतारा गडावर आमचीही त्याची अशीच अचानक गाठभेट घडली.

– मिलिंद हळबे
mrhalbe@yahoo.com