पावसाळा म्हटले, की सारी सृष्टीच चैतन्याने भरून गेलेली असते. यामध्ये पक्ष्यांची दुनियाही मागे नसते. त्यांच्या हालचालींना या दिवसांत सक्रियता आलेली असते. चिपळूण परिसरात नुकत्याच केलेल्या भटकंतीत या खंडय़ानेही असेच वेडावून टाकले. छायाचित्रात दिसणाऱ्या खंडय़ाचे तिबोटी खंडय़ा (Oriental Dwarf Kingfisher) असे शास्त्रीय नाव आहे. हा पक्षी त्याच्या रंगसंगतीमुळे जेवढा देखणा तेवढीच त्याची ती तीक्ष्ण नजर आणि चपळाई पाहण्यासारखी. फांदीवर एखादी समाधी लावली आहे, असे वाटणारा हा खंडय़ा खरेतर एकाग्रचित्ताने त्याचे भक्ष्य शोधण्यात मग्न असतो. पाली, सापसुरळी, खेकडे, गोगलगाय, बेडूक असे काहीही दिसताच हे समाधी लावलेले ध्यान अचानक जमिनीच्या दिशेने सूर मारत सावज टिपते आणि त्याला घेतच पुन्हा फांदीवर बसते.

ताडोबा जंगल सफारी
ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. या जंगलात बांबू, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ आदी दुर्मिळ वनस्पतीही आहेत. ४५ प्रकारचे सस्तन प्राणी, २८० प्रकारचे पक्षी, ९४ प्रकारची फुलपाखरे, २६ प्रकारचे कोळी आणि ३० सरपटणारे प्राणी अशी ही या जंगलाची संपत्ती आहे. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. या सहलीत आनंदवन, सेवाग्राम, पवनार आदी स्थळांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी
संपर्क साधावा.