सह्य़ाद्रीच्या कडय़ाकपारीत चालणाऱ्या गिर्यारोहणापासून ते ल्होत्से-एव्हरेस्टपर्यंतच्या मोठय़ा मोहिमांपर्यंत यशाचे झेंडे रोवणाऱ्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेतर्फे येत्या २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान सिंहगडावर गिर्यारोहण खेळातील पायभूत अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गिरिभ्रमण, गिर्यारोहण हे खेळ आता समाजात सर्वत्र लोकप्रिय होऊ लागले आहेत. मात्र ही वाढ गुणात्मक न होता संख्यात्मक होत असल्याने ‘गिरिप्रेमी’तर्फे गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांना शास्त्रशुद्धरीत्या गिर्यारोहणाचे धडे देण्याचा ‘आव्हान’ हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गतच पुढील पाऊल म्हणून या अभ्यासक्रम शिबिराचे आयोजन केले आहे.
आपल्याकडे गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी केवळ हिमालयातील तीन संस्था कार्यरत आहेत. यामुळे अशाप्रकारचे शिक्षण घेण्याची सोय, मार्गदर्शन, तंत्रसाहाय्य नसल्यामुळे महाराष्ट्रातील मोठय़ा वर्गास या प्रकारचे शिक्षण मिळण्यात अडचण येत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊनच ‘गिरीप्रेमी’ने गेल्यावर्षीपासून अशा प्रकारच्या अभ्यासक्रम शिबिराचे आयोजन केले आहे.
‘एव्हरेस्ट २०१२’, ‘एव्हरेस्ट-ल्होत्से २०१३’, ‘मकालू -२०१४’ या यशस्वी मोहिमेची मानकरी असलेली ‘गिरिप्रेमी’ ही संस्था गिर्यारोहणाच्या या क्षेत्रात गेली पंचवीसहून अधिक वर्षे कार्यरत आहे. या कालावधीत सह्य़ाद्रीतील भटकंतीपासून ते हिमालयातील मोहिमांपर्यंत असा मोठा अनुभव संस्थेच्या गाठीशी आहे. अनुभवी मार्गदर्शक, आवश्यक तंत्र-साहाय्य आणि साहित्याचे पाठबळ संस्थेच्या पाठीशी आहे. गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणातील या शिदोरीवर नवी पिढीही घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये पदभ्रमणापासून ते गिर्यारोहणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यांवर लागणारी कौशल्ये शिकवली जाणार आहेत. प्रस्तरारोहण, दोराचे तंत्र (रोप टेक्निक), रॅपलिंग, क्लायंबिंग, जुमारिंग आदी गिर्यारोहणातील तंत्रांचे शिक्षण दिले जाणार आहे. या जोडीने गिर्यारोहणात वापरावयाची साधनांची ओळख, त्यांचा वापर, नव्या जगातील जीपीएस तंत्रज्ञान, वेदर ट्रॅकर, पल्स मीटर सारख्या यंत्रणांचा उपयोगही या वेळी सांगितला जाणार आहे. सह्य़ाद्री- हिमालयातील गिरिभ्रमण- गिर्यारोहण, त्यांचा इतिहास, निसर्गाची ओळख, गिर्यारोहणातील धोके, उपाययोजना यांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे. हे सर्व प्रशिक्षण संस्थेचे अनुभवी गिर्यारोहक, मार्गदर्शक आणि तज्ज्ञांच्या मदतीने दिले जाणार आहे. सोबतीला साहसावरील माहितीपट, प्रश्नमंजूषा, खेळ घेतले जाणार आहेत.
गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या १६ ते ३५ वयोगटातील कोणीही व्यक्ती या अभ्यासक्रम-शिबिरात सहभागी होऊ शकते. या विषयी अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ८२७५४७२२८३ किंवा ९८८१२९३०८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.