चिलिका हे भारतातील सर्वात मोठे मिश्र पाण्याचे सरोवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन आहे. २१६ पक्षी प्रजातींची इथे नोंद झाली आहे. विविध प्रकारची बदकं, थोरला रोहित, थोरला झोळीवाला, समुद्री गरुड, विविध खंडय़ा, तिरंदाज, धाकटा रोहित, काळ्या डोक्याची शराटी, काळ्या पोटाचा सुरय, डाल्मेशियन झोळीवाला व पांढऱ्या पिसांचं गिधाड असे पक्षी इथे दिसतात. त्याशिवाय दुर्मिळ इरावती डॉल्फिन व बॉटल – नोज डॉल्फिन सुद्धा दिसतात. अशा या चिलिका सरोवर परिसरात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने भटकंतीचे २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
निसर्ग टूर्सतर्फे येत्या २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
दुर्गनिबंध स्पर्धा
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे दुर्ग साहित्य संमेलन यंदा २५ ते २७ जानेवारी २०१३ रोजी विजयदुर्गवर होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी १) जलदुर्गाचे महत्त्व : काल, आज, उद्या २) शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ३) जलदुर्गावरील निसर्ग आणि पर्यावरण, त्याचे महत्त्व ४) विजयदुर्गचे सामरिक महत्त्व ५) मराठय़ांचे आरमार हे विषय आहेत. दोन हजार शब्दांपर्यंत लिहिलेले हे संशोधनपर निबंध १० जानेवारी २०१३ पर्यंत डॉ. विजय देव, सी-४०१, पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे- ४११००९ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव ( ९८२२४०१७५३) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेतील विजेत्यांचा संमेलनात गौरव करण्यात येईल.
सागरी किल्ल्यांची सफर
ट्वीन आऊटडोअर या संस्थेतर्फे १२ व १३ जानेवारी रोजी समुद्रामधील किल्ले पाहण्याची सहल आयोजित करण्यात आली आहे. पर्यटकांना यामध्ये अलिबाग, कोर्लाई आणि मुरुड- जंजिरा हे किल्ले पाहता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क आर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ आणि तर्डलकर ९८२०९९०३८९.