आजच्या स्पर्धात्मक युगात ‘साहस’ हा आता परवलीचा शब्द झाला आहे. कुठल्याही व्यक्तिमत्त्वाच्या विकासात या शब्दाला आता खूप महत्त्व आले आहे. यामुळे या शब्दाच्या कुतूहल आणि आकर्षणापोटी धावणाऱ्या जगाला शिक्षण-प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक आणि संस्थाही मोठय़ा प्रमाणात उदयाला आल्या. या प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या जगासाठीच ‘हाय प्लेसेस’ संस्थेतर्फे नुकत्याच एका स्पर्धेचे आयोजन केले होते, ‘गरुडभरारी’! प्रस्तरारोहण, जुमारिंग, व्हॅली क्र ॉसिंग, रॅपलिंग, राफ्टिंग, दिशावेध, सायकलिंग आणि गिरिभ्रमण अशा साहसी खेळाच्या विविध अडथळय़ांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत चारजणांच्या दहा चमूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा वरील सर्व अडथळय़ांचे डोंगर केवळ तीन दिवसांत पार पाडणार होती. संस्थेच्या ‘गरुडमाची’ या प्रशिक्षण केंद्रापासून २ मार्च रोजी या स्पर्धेला मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते सुरुवात झाली. या स्पर्धकांची सुरुवातच प्रस्तरारोहणाने झाली. यामध्ये ४० फुटांच्या खडय़ा चढाईचा समावेश होता. तो पार करून निघालेल्या या साहसवीरांसाठी पुढय़ात आणखी शंभर फुटांचा एक कडा होता. जुमारिंग तंत्राच्या साहाय्याने हा बेलाग कडा चढल्यावर ३०० फूट रुंद अंतराची दरी ओलांडण्याचे आव्हान ठेवण्यात आलेले होते. हे दिव्य पार करून पुढे सरकावे तो होकायंत्राच्या साहाय्याने पाच खुणेच्या जागा शोधून काढण्याचा दिशावेध हा स्पर्धात्मक खेळ घेण्यात आला. यानंतर मग रात्रीचे जंगलातील कॅम्पिंग, जलाशयातील राफ्टिंग, सायकलिंग आणि सर्वात शेवटी तंगडतोड गिरिभ्रमण या साऱ्या एकामागे एक येणाऱ्या दिव्यातून हे स्पर्धक परीक्षेस उतरत ४ तारखेला दुपारी पुन्हा संस्थेच्या केंद्रावर पोहोचले. या वेळी एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. साहस हे माध्यम म्हणून वापरताना लागणारी सुरक्षा आणि तांत्रिक कौशल्ये यांचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ‘हाय प्लेसेस’चे संचालक वसंत लिमये यांनी सांगितले.

गिरीप्रेमीची नागफणी मोहीम
गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या नव्या फळीतील गिर्यारोहकांनी लोणावळाजवळील नागफणी ऊर्फ डय़ूक्स नोज या सुळक्यावर नुकतीच यशस्वी चढाई केली.नागफणीचा कडा हा सह्याद्रीतील एक अवघड सुळक्यांपैकी मानला जातो. या कातळकडय़ाचा उत्तरेकडील भाग हा ९० अंशांच्या कोनात सरळ आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या कडय़ावर गिरिप्रेमींच्या नव्या फळीतील गिर्यारोहकांनी नुकतीच यशस्वी चढाई केली. अनिकेत कुलकर्णी, डॉ. सुमित मांदळे, संकेत धोत्रे, पवन हाडोळे, विवेक शिवदे, रणजित शिंदे, भूषण शेट, दिनेश कोतकर, नरेन पाटील, अक्षय पतके, संदेश गुंजवटे आदी गिर्यारोहकांनी यामध्ये सहभाग घेतला. नागफणीच्या शेवटच्या टप्प्यात असलेला ‘ओव्हरहँग’ पद्धतीचा कडय़ावरील चढाई हा यामध्ये सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा होता. खाली सदैव दिसणारी दोन हजार फूट खोल दरी आणि जोराने वाहणारे वारे या साऱ्यांना तोंड देत गिर्यारोहकांनी हा टप्पा पार करत नागफणीचा हा कडा सर केला. या मोहिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या संपूर्ण मोहिमेचे ‘गिरिप्रेमी’कडून थरारक असे चित्रीकरण करण्यात आले. सह्याद्रीच्या ऐन धारेवरील या कडय़ाच्या सर्वागाने हे चित्रीकरण करण्यात आले आहे. गिरिप्रेमीच्या या मोहिमेस एव्हरेस्ट मोहिमेचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्टवीर आनंद माळी, गणेश मोरे, भूषण हर्षे, आशिष माने, प्रसाद जोशी आणि कृष्णा ढोकळे आदींनी मार्गदर्शन केले.

चक्राता जंगल सफारी
उत्तराखंडमधील गढवाल भागातील चक्राता जंगल हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. ७५०० फूट उंचीवरील हे जंगल सूचीपर्णी आणि ओक वृक्षांचे आहे. या जंगलात अतिउंचीवरील विविध प्राण्यांबरोबरच १०० हून अधिक हिमालयातील पक्षी आढळतात. या परिसरातच लवणस्तंभही आढळतात. ‘जीविधा’तर्फे अशा या चक्राता तसेच त्याला जोडून देहरादून परिसरातील राजाजी राष्टीय उद्यानात जंगल सफारीचे आयोजन केले आहे. १ ते ८ मे दरम्यान होणाऱ्या या अभ्यास सहलीच्या अधिक माहितीसाठी ९४२१८ ३२९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ताडोबा जंगल सफारी
ट्वाइन आऊटडोअर्सतर्फे १ ते ५ एप्रिल आणि ३० एप्रिल ते ४ मेदरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबरच येथे बिबळ्या, मगर, अस्वल, हरीण, सांबर असे अनेक वन्यप्राणी आढळतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे अनेक स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षीही येथे आढळतात. ते पाहण्याची संधी या सफारीमध्ये मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क राधिका फडके – ९८३३०२६९६९, अर्चिस सहस्रबुद्धे झ्र् ९८९२१७२४६७

रायगड दर्शन
‘आऊटडोअर अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत इतिहास अभ्यासकांच्या मदतीने छत्रपती शिवरायांची राजधानी ‘रायगड दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८६९४१२७८० किंवा ७५०६३८१००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.